पिठाची गिरणी

पिठाच्या गिरणीत जाऊन आता जमाना झाला आहे. आज का कोण जाणे पण मला
गिरणीची आठवण झाली. आईकडे जी गिरणी होती ती थोडी लांब होती. एखादे दळण असेल
तर आई एकटीच जायची. पण २ ते ३ दळणे असतील तर आम्ही दोघी बहिणी आईबरोबर
जायचो. दळणं टाकून परत घरी यायचो. दळण टाकताना किती वेळ लागेल असे विचारावे
लागे. मग दळणवाला जितका वेळ सांगेल त्याप्रमाणे परत जावे लागे. त्या
पीठच गिरणीत सर्वत्र पीठ पसरलेले असायचे. गिरणी मध्ये दळणे टाकणारा तर
पिठामध्ये पार बुडून जाई. त्याच्या मिशा, डोळ्याच्या पापण्यांवरील केस पण
पांढरे होत. तिथे जो दळणवाला होता त्याचे कपडे नेहमी पिठासारखेच पांढरे
शुभ्र असायचे. त्याच्या डोक्यावरही नेहमी पांढरी शुभ्र टोपी असायची. माझ्या आठवणीत गिरणीवाल्याचे नाव गुलाब होते.

त्याचा चेहरा काही वेळेला हसरा तर काही वेळेला त्रासदायक झालेला असायचा.
गिरणीमध्ये बायका जेव्हा दळणाचा डबा ठेवून जात तेव्हा जाताना अनेक सूचनाही
देऊन जात. पीठ बारीक दळ, जाड दळ, भरड दळ. सगळ्यांच्या
सूचना लक्षात ठेवून बरोबर त्याप्रमाणे ते दळण तो दळून द्यायचा. पीठ कमी
भरले की लगेच बायका म्हणायच्या काय रे तुझी गिरणी पीठ खूप खाते. काही वेळा
पीठ इतके काही व्हायचे की तो दिलेला डबा भरभरून वाहून जायला लागायचा. मग ते
पीठ दाबून दाबून ठेवायला लागायचे. गिरणीवालाही सूचना द्यायचा की धान्य डबा
भरून आणू नका. डबा अर्धा भरेल इतकेच आणा. आईकडे पिठे जेव्हा वेगवेगळ्या
धान्याची आणायला लागायची तेव्हा आम्ही तिघी मिळून जायचो. अर्धा किंवा एक ते
दोन किलोचे पीठ असेल तर त्या पिशव्या आम्ही धरायचो. पिठामध्ये हरबरा
डाळीचे पीठ, तांदुळाचे पीठ असायचे. शिवाय थालीपिठाची भाजणीही असायची. ती
मात्र भरड दळायला सांगायची आई. आई आंबोळीचे पीठही दळून आणायची.

हे डबे हिंडालियमचे, स्टीलचे किंवा पत्र्याचे असत. पोळीसाठी गव्हाचे दळण
तर असायचेच. शिवाय भाकरीसाठी बाजरी आणि ज्वारीही असायची. ताजी तयार पिठे
साधारण महिना दोन महिने पुरतील इतके आणायचो. अशा या ताज्या पिठाची चव काही
निराळीच ! दळण टाकताना पण गिरणीवाल्याला सावधानता बाळगायला लागायची. एकदा
गहू टाकले
गिरणीत की मग एकापाठोपाठ एक गव्हाची दळणे दळून ठेवत असे. गरम पिठावर
डब्याचे झाकणही अलगद ठेवावे लागे.डब्याचे झाकण अलगद किंवा थोडेसे तिरपे
ठेवले नाही तर वाफ धरून पीठ ओले होण्याची शक्यता व्हायची. गिरणीत
गेले की कोणते दळण चालू आहे ते विचारावे लागे. गिरणीवाला प्रत्येकाचे डबे
पाहायचा आणि ठरवायचा कोणते दळण आधी लावायचे ते. खूप गर्दी झाली की दुसरी
गिरण चालू करायचा. गिरणीत पीठ टाकले की गिरणीवाला एका लोंखडी जाड
खिळ्यासारख्या दिसणाऱ्या वस्तूने गिरणीच्या आजूबाजूला एका विशिष्ट लयीत
आपटायचा. तो असे का करायचा ते नाही समजायचे. चौकोनी घमेल्यासारखे दिसणाऱ्या
भांड्यात तो धान्य टाकायचा आणि मोठ्या नळातून पीठ बाहेर पडायचे. त्या
नळाभोवती एक कापड चहुबाजूने लावलेले असायचे आणि त्याखाली तो रिकामा डबा
ठेवायचा. पीठ पडायला लागले की तो हातावर पीठ घेऊन आईला दाखवायचा. मग आई पण
ते पीठ चिमटीत घेऊन पिठाचा अंदाज घ्यायची व त्याप्रमाणे बारीक की जाड
पाहिजे ते सांगायची.

दिवाळीत चकलीची भाजणी दळून आणण्याकरता खूपच
गर्दी होत असे. दळणाचे डबे तयार करताना आधी धान्य चाळून व पाखडून घ्यावे
लागे. माझ्या लग्नानंतर आयायटी पवईत जी गिरणी होती ती खूप लांब होती.
विनायक सायकलवर दळण घेऊन जायचा. अंधेरीत राहायला आल्यावर तिथेही गिरणी लांब
होती. मग मी दळणाचे काम माझ्या कामवाल्या बाईला सांगत असे. डोंबिवलीत
राहायला आल्यावर घराच्या समोरच गिरणी होती.तर अशी ही गिरणी लोप पावत चालली
आहे.