अस्मिता आणि असहिष्णुता

               नुकताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठी भाषादिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व शाळातून मरठी विषय आवश्याक करण्याचा आदेश दिला आहे.खरे तर शिवसेनेची स्थापनाच मराठी या मुद्द्यावर झाली होती आणि माननीय बाळासाहेबांच्या काळातही मराठी भाषेत फलक लावण्यासाठी बऱ्याच फलकांची मोडतोडही झाली होती. तरीही अजून पुण्यासारख्या अस्सल मराठी शहरातही दुकानावरच नव्हे तर अगदी मराठी माणसाच्या घरावरील नावेही इंग्रजीतच असलेली आढळतात ही वस्तुस्थिती. अगदी आमच्या आयडियल कॉलनीतल्या एका घराचे नाव आर्चिड (ऒर्किड नाही बरं का) आणि दुसऱ्या घराचे क्लोव्हर !
      कलर्स मराठी वाहिनीवर ""सूर नवा ध्यास नवा " या कार्यक्रमाने अनेक रसिकांना आकर्षित केले होते. .कार्यक्रम कसा आहे यावर चर्चा न करता त्यातील मला जाणवलेली एक बाब म्हणजे जे कलाकार मराठी भाषिक नाहीत अश्या कलाकारांच्या मराठी वरील वा मराठी गीते गाण्याच्या प्रभुत्वाविषयी परीक्षकांचे कौतुकोद्गार !.सुमित राघवन स्वत:स महाराष्ट्रीय म्हणवून घेतात.त्यांचा सगळा जन्म महाराष्ट्रातच गेलाय अगदी दूरदर्शनवर त्यांचा प्रवास मराठी मालिकेपासूनच सुरू झालाय , तरी त्यांच्या मराठीवरील प्रभुत्वाचे इतके कौतुक केवळ त्यांचे आई वडील मराठी भाषक नव्हते या एका कारणासाठी करणे फारसे योग्य आहे असे वाटत नाही.तीच गोष्ट अय्यर या गायिकेविषय़ी. तिचेही वास्तव्य आणि जन्मही महाराष्ट्रातला आहे म्हणजे तिला मराठी चांगले बोलता,वाचता,लिहिता येणे क्रमप्राप्तच आहे. ( पण तसे तिला येत नाही हे तिच्या प्रतिसादावरून कळते)कार्यक्रमात राजू नदाफ व आणखी एक  औरंगाबादचा मुस्लिम धर्मी गायक    यांचे कौतुक करताना  "तुझी मातृभाषा मराठी नसून---" असा सूर परीक्षक लावतात.
     आपल्या भाषेच्या बाबतीत आपण मराठी भाषक  सहिष्णुतेची अगदी परिसीमा आहोत असे म्हणता येईल.परक्या व्यक्तीशी बोलायला सुरवात करताना आपण प्रथम इंग्लिशमध्येच सुरवात करतो,(म्हणजे आपले इंग्लिश फार उच्च दर्जाचे वगैरे असते म्हणून नाही) पण ते शक्य नसेल तर मग आपण हिंदीत सुरवात करतो. म्हणजे मुंबईत गेल्यावर टॅक्सीमध्ये बसताना आपण "टॅक्सी खाली है क्या ?" असेच विचारतो येवढेच काय पुण्यातही रिक्षा खाली है क्या असेच विचारतो.दुकानदाराने हिंदीत बोलण्यास सुरवात केली तर आपणही आपले राष्ट्रभाषा प्रेम लगेच व्यकत करू लागतो.  खरे तर महाराष्ट्रात जन्मल्यावर व अनेक वर्षे वास्तव्य झाल्यावर त्यांचे मराठीवर प्रभुत्व जरी नसले तरी मराठी व्यवस्थित बोलता येणे अपेक्षितच आहे..माझे मुस्लिम मित्र उत्तम मराठी बोलतात. ,उलट त्यांचे हिंदीच "भागते भागते आया अन धबाकदिशी पड्या " असे होते.( माझी बहीण बडोद्यात रहायला लागल्यावर दोन वर्षात गुजराती भाषेत उत्ताम भांडू लागली .खरा भाषेचा कस भांडताना लागतो म्हणून या गोष्टीचा उल्लेख केला. ) कदाचित सध्या बऱ्याच मराठी भाषकांना स्वत:लाच मराठी व्यवस्थित बोलता येत नसल्यामुळे   अश्या मुस्लिम किंवा तमिळ गायकांनी मराठी गीते उत्तम म्हणावी याचे कौतुक वाटत असावे.  मराठी वाहिन्यांवरील शुद्धलेखन वाचून तर कीव येते तर संवादही तसेच असतात. "मला मदत कर" या वाक्याचे आता कायम "माझी मदत कर " असे हिंदी रूपांतर झाले आहे.    
      अमेरिकेत गेल्यावर तर काय तेथे तर कोणालाच मराठी येत नसणार याविषयी आपल्याला शंकाच नसते या उलट तेथील गुजराती माणूस मात्र कोणीही भारतीय दिसला तर सुरवात "केम छो" नेच करणार. (आणि आता तर काय स्वतः ट्रंप त्यात सामील झाले आहेत)ही गुजराती अस्मिता म्हणायची की त्याना इंग्लिश येत नाही म्हणून ते नाइलाजाने असे करतात असे त्यांचे समर्थन करायचे ? मराठी नेतेही महाराष्ट्रातील अन्यभाषिक मतदारांना कळावे म्हणून आपल्या मोडक्या तोडक्या हिंदीत (हिंदी संपूर्ण भारताची भाषा करावी म्हणणाऱ्यांनाहि हिंदी फार चांगले बोलता येते अशातला भाग नाही ) बोलतात त्यावेळी हा सहिष्णुतेचा भाग आहे असे त्यांचे प्रतिपादन असते मराठी अस्मिता त्यावेळी कोठे लुप्त होते कोण जाणे !
H याउलट द.भारतीय म्हणजे विशेषत: तमिळ भाषिक हिंदीत बोलले तर कदाचित प्रत्युत्तर देणारच नाहीत किंवा "I don’t know Hindi" असे स्पष्ट सांगतील.महाराष्ट्रात राहूनही "I don’t know Marathi"असे उत्तर द्यायला त्यांना काहीही अयोग्य वाटत नाही. ही त्यांची असहिष्णुता म्हणायची की भाषिक अस्मिता ? अमेरिकेत भारतीय रहिवाश्यांत रहाताना माझ्या नातवांच्या तमिळ भाषिक बालमित्रांना हिन्दीत न बोलता इंग्लिशमध्येच बोलण्याचा त्यांचा आग्रह पाहून त्याबद्दल सुनावले असताना त्यानी सरळ ‘ I hate Hindi" असे उद्गार काढलेले मी पाहिले आहे. म्हणजे ते भाषेच्या बाबतीत असहिष्णू आहेत असेच म्हणावे लागेल.स्वभाषेचा अभिमान म्हणावे तर ते त्यांच्या तमिळ मित्रांशीही इंग्लिशमध्येच संभाषण करत.
       बहुतांश दक्षिण भारतीयांना कितीही त्रास सोसावा लागला तरी हिंदी भाषा शिकावी  असे कधीच वाटत नाही.माझे एक हुबळीवासी मित्र मराठी व कानडीही उत्तम बोलत असल्याने आमचे व त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.माझ्या मुलाच्या घराजवळ रहाणाऱ्या कन्नड कुटुंबास त्यानी आपल्या घरी यावे असे फार वाटते कारण त्यांच्या पत्नीस कानडीव्यतिरिक्त इतर भाषा येत नाही त्यामुळे त्याच्याबरोबर मी गेलॉ तरी मला कन्नड संभाषण ऐकणेच भाग पडते अश्या वेळी आपल्याबरोबर एक कानडी न जाणणारा गृहस्थ आहे याचे भान त्यांना नसते .एकदा स्वत: ते गृहस्थ असताना आम्हा तिघांचे इंग्रजीत संभाषण होऊ शकले तरीहि भारतीय राजकारणावर बोलताना मी तेथे असूनही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करू नये याचीसुद्धा शुद्ध त्या गृहस्थाना नव्हती अर्थात त्यामुळे त्यांचा समाचार घेणे मला भाग पडले. माझ्या मराठी कानडी मित्रवर्यांनी दुसऱ्या दिवशी मला त्याबद्दल फटकारले नाही हे माझे नशीब ! 
        विश्व धर्म परिषदेस स्वामी विवेकानन्द जात होते तेव्हां त्यांच्या बोटीतच काही ख्रिस्चन पाद्रीही प्रवास करत होते.ते आपापसात बोलत असताना हिन्दु धर्मावर बोलून त्याविषयी कुचेष्टेने बोलू लागले.ती चर्चा स्वामीजी ऐकत होते .काही वेळ ती ऐकल्यावर स्वामी शांतपणे त्या मंडळींकडे गेले आणि त्याना उद्देशून म्हणाले " इतका वेळ आपली चर्चा मी ऐकत होतो.एक हिंदु धर्मीय शेजारी आहे यचा जराही विचार न करता आपण जी टीका करत आहात ती पूर्णपणे अयोग्य आहे. यापुढे मात्र माझ्या धर्मावर टीका केलीत तर मी कोठलाही संयम न बाळगता आपणास समुद्रात फेकून देईन" तेव्हां ते सर्व ख्रिस्चन धर्मोपदेशक चुप बसले.त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या धर्म परिषदेत आपल्या भाषणाने सर्व धर्मियांची मने जिंकली व हिंदु धर्माची महती सर्व जगास पटवून दिली. 
   . या घटनेपूर्वी कोणा हिंदु धर्मियाने असे रोखठोक उद्गार काढण्याचे धाडस केले नव्हते.आपण हिन्दु धर्मीय (ज्यात मीही आलो) आम्ही  हिंदु धर्म फार महान आहे असे म्हणतो व त्याचबरोबर हिंदु धर्मीय फार सहिष्णु   असे आपली पाठ थोपटून घेतो पण त्याच धर्माचे लोक एके काळी त्याच धर्मातील काही व्यक्तींची सावली अंगावर पडणेही अशुभ मानत होते त्या व्यक्तींना अस्पृश्य मानत होते ज्ञानेश्वरांचा छळ त्यांच्याच जातीतिल माणसांनी जास्त केला.याचा आपल्याला विसर पडतो, आजही जातीय वाद एवढा प्रबळ झालाय की हिंदु धर्मातीलच सर्व जाती एकमेकाविषयी साशंक असतात.नुकताच विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण महासंघाने असा वाद काही काळ उभा केला होता व तो नंतर जरी थांबवण्यात आला तरी त्यातून असहिष्णु वृत्तीचे प्रदर्शन झालेच.यावर हे असहिष्णुतेचे नव्हे तर अस्मितेचे उदाहरण आहे असाही दृष्टिकोण व्यक्त होऊ शकतो.सध्या धार्मिक  सहिष्णुता या विषयावर अधिक बोलणे अवघड झाले आहे.
    अस्मिता हे असहिष्णुतेचेच सोज्वळ नाव  आहे असे समजायचे काय ?