मार्च २०२०

इथे सगळेच एलियन्स

इथे सगळेच  एलियन्स 
 
मानवांच्या ग्रहावर राहूनही मी परकाच ,
कारण इथे सगळेच एलियन्स 
 
पापण्यांच्या धरणामागे भरलेला  असला जरी अश्रूंचा  डोह,
म्हणे  इथे धरणाची भिंतही ओली होऊ द्यायची नाही ,
का तर कुणी तुम्हाला त्यावरूनही जज करेल ,
कारण इथे सगळेच एलियन्स 
 
भावनांचा वसंत घेऊन जन्माला आलो 
वाटले सुगंध भरभरून उधळून टाकावा 
म्हणे थोडी झुळूकही बाहेर पडू द्यायची नाही 
का तर कुणी तुम्हाला त्यावरूनही जज करेल ,
कारण इथे सगळेच एलियन्स 
 
कत्तल झालेल्या भावनांच्या सांगाड्याच्या घरात  मी राहतो 
 त्यामुळेच असेल कदाचित  माझेच शब्द मीच विसरून जातो 
इथे घरातले जुने सांगाडेहि बाहेर  टाकून द्यायचीही मुभा नाही 
का तर कुणी तुम्हाला त्यावरूनही जज करेल ,
कारण इथे सगळेच एलियन्स 
 
कुणी म्हणाले देवाकडे जा, त्याला सांग  तुला काय वाटते 
तर देव म्हणाला तुझ्या सांसारिक तक्रारी तुझ्याजवळच ठेव 
आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता  तुझ्याच भावनांच्या सांगाड्यावरून तूच चालत राहा 
इकडे आड तर तिकडे विहीर, 
कारण इथे सगळेच एलियन्स 
 
पुन्हा पुन्हा वाटतो अभिमन्यूच जवळचा 
सुटणार नसलेल्या चक्रव्युव्हाचा वेध घेणारा 
अगम्य नियमांच्या जगात  चक्रव्युव्हाच रहस्य शोधणारा 
आपल्याच लोकांमध्ये परका झालेला 
 कारण इथे सगळेच एलियन्स 
 
ही कविता वाचताना कुणी यात बघेल व्याकरणाचे नियम 
शोधले कुठेच जुळत नसलेला हवाहवासा यमक 
शोधेल कुठेच गवसत नसलेली ठेक्याची चाल 
कसे शब्द सापडतील ? कसा यमक जुळेल?  कशी चाल गवसेल ?
जगण्याच्या धडपडीत ,  माझ्यातल्याच कवीचा मी केंव्हाच खून केलाय 
कारण इथे सगळेच एलियन्स 
 
फॉरवर्ड करावीशी वाटली जरी हि कविता , तर  सावधान 
वाचणारा म्हणेल बरा सापडला दुबळा 
शोधतच  होतो बऱ्याच दिवसापासून  एक कचरा कुंडी  
 माझ्याच घरातले भावनांचे जुने सांगाडे टाकायला 
नको असले तरी शोधेल तुम्हालाच जज करण्याची युक्ती 
कारण इथे सगळेच एलियन्स 
 
बाकीच्या कवींप्रमाणे वाटले आपणही लिहावे  कवितेच्या शेवटी आपले नाव 
शांत करावी कुणाच्या मनाची प्रश्नाची तळमळ 
पण नको, त्यावरूनही कुणीतरी जज करेल 
कारण इथे सगळेच एलियन्स

Post to Feed


Typing help hide