मार्च २० २०२०

करोना विषाणू

सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विज्ञानकेंद्र या माहितीस्थळावरून प्रसिद्ध झालेला हा लेख विज्ञानकेंद्राच्या आणि लेखक जयंत गाडगीळ यांच्या संमतीने इथे देत आहे. तिथले या विषयावरचे इतरही लेख इथे लौकरच देण्याचा मनोदय आहे.
मा. प्रशासक, इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेले लेखन इथे पुनर्प्रसिद्ध करण्याचे नियम याआड येऊ नये असे वाटते. तरीही योग्य तो निर्णय आपण घ्यालच.
एरवीही मनोगतींनी विज्ञानकेंद्राच्या उपक्रमांची माहिती घ्यावी अशी इच्छा आहेच.


या करोनाचे काय करायचे ?

गेल्या काही महिन्यांमध्ये आढळलेल्या आजाराचा विषाणु म्हणजे करोना 19. म्हणजे करोना जातीचे इतर विषाणु यापूर्वीच माहिती होते. हा नवा अवतार. तो वेगळा करून त्यावर औषधे शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यावरचे औषध यथावकाश बाजारात येईलही. मात्र यावरून हे नक्की लक्षात येईल की आज त्यावर सिद्ध झालेले असे औषध नाही. त्यामुळे जेव्हा विशिष्ट औषध हे रामबाण आहे अशा थापा मारणारे संदेश व्हायरल होतात त्यावर अंधविश्वास ठेवून डोळे मिटून ते सारे उपाय वापरायला लागायचे काही कारण नाही.
मात्र घबराट माजवायचे कारण नाही. त्या विषाणूचा संसर्ग आपल्याला होऊ नये म्हणून पुरेपूर काळजी आपल्या सर्वांना नक्कीच घेता येईल. चुकून असे विषाणु आपल्या अंगावर आलेच तर काय करायचे हेही ठरवता येईल. मुख्य म्हणजे नुसतेच घाबरून काहीही साध्य होणार नाही. काही श्रध्दाळूंना नुसते भक्ती करून किंवा देवाचे चिंतन करून पुण्य लागते असे म्हणतात, तसे नुसती चिंता करून व्हायरसबद्दल प्रतिकार शक्ती वाढणार नाही.नक्की काय करायचे?

आपण हातानी इकडे तिकडे स्पर्श करतो. तेव्हा जर असे विषाणु असतील तर ते मारावे लागतील. हे विषाणु वेगवेगळ्या द्रव पदार्थांमध्ये मरू शकतात. त्यातील बरेचसे द्रव पदार्थ आपल्या त्वचेलाही घातक ठरतात. पण आपल्या त्वचेला चालतील अशी रसायने म्हणजे स्पिरिट, साबण व अपमार्जके (डिटर्जंट). या पदार्थानी विषाणुचे आवरण तुटून तो मरतो. म्हणून बाहेरून आल्यावर, किंवा लोकांच्या संपर्कात आल्यावर चांगल्या साबणाने हात धुवावे. वृध्दांना मदत करणे, लहान मुलांना उचलून घेणे या कारणाने सतत स्पर्श करावा लागत असेल तर सतत हात धुणे शक्य नसल्यास हँड सॅनिटायझरने हात निर्जंतुक करावे.
हे सॅनिटायझर खूप पैसे देऊन विकतच आणायला हवे असे नाही. एखाद्या दिवशी थोड्या काळासाठी विकत घेणे परवडेल. पण आठवडाभर घरातल्या सगळ्यांनी असे सॅनिटायझर विकत घेणे खर्चिक ठरेल. मात्र सगळ्यांना घऱच्या घरी करणेही शक्य होणार नाही. म्हणून जाणकार व्यक्ती आणि समाजसेवी संस्थानी ना नफा ना तोटा तत्त्वावर तो करून माफक दरात विकणे व वाटणेही शक्य होईल. अशा सॅनिटायझरची कृती आम्ही लवकरच सादर करू.काही गोष्टी टाळता येतील का?

संसर्ग झाल्यावर तो नष्ट करण्यापेक्षा तो संसर्ग होणे टाळता आले तर ते अधिक शहाणपणाचे ठरेल.
कोणाला संसर्ग झाला आहे हे आपल्याला आधीच माहिती नसते. म्हणून हस्तांदोलन टाळावे. वेगवेगळ्या माणसांना मोठ्या प्रमाणावर भेटणे, त्यांच्याशी स्पर्श होईल असे खेळणे, खूप आणि अनोळखी लोकांच्यात जाणे टाळावे. याचे कारण असे की यातील एखादा माणूस संसर्ग असलेला निघाला तर ते नंतर काही दिवसानी सरकारी यंत्रणांच्या मदतीने कळेल. त्या माणसाच्या संपर्कात कोणकोण आले आहे हे शोधणे अवघड होईल व यामुळे या साथीचा प्रसार व्हायला आपण कारण ठरू.
सार्वजनिक सभा, नाटके, अगदी शाळा कॉलेजसुध्दा बंद आहेतच. पण म्हणून रिकाम्या वेळात घरीच थांबावे. इकडेतिकडे लोकांना भेटत बसू नये. एखादा सण एखाद्या वर्षी साजरा नाही केला म्हणून आकाश कोसळणार नाही. आपले वाढदिवस वगैरे खूप लोकांना बोलावून साजरे केलेच पाहिजेत असे नाही. त्यामुळे आपण असे कार्यक्रम करू नयेत. काही लोकांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करून असे कार्यक्रम ठरवले, तरी आपण ते टाळावे.
करोना संसर्गाला हातभार लावून देशावर देखरेखीचा, उपचाराचा व नंतर मृतांना सरकारी मदत देण्याचा भार टाकणे टाळणे हीसुध्दा देशसेवाच आहे.या साथीकडे गांभीर्याने का बघायचे?

आपल्याला जे माहिती आहे त्यानुसार जानेवारीच्या आधीपासून हा विषाणु असल्याचे, त्यापासून आजार होत असल्याचे व मृत्यूही ओढवत असल्याचे दिसू लागले होते. पण असे काही नाहीच असे सांगितले. मग तो आटोक्यात असल्याचे सांगितले. असे सुमारे दोन महिने गेल्यावर जगभर तो पसरल्याचे कळाले व या साथीने गंभीर रुप घेतल्याचे लक्षात आले.
साध्या गणिताने पाहिले, तरी हे समजून घेता येईल. एक माणूस एका आठवड्यात 25 माणसांना भेटतो व त्यांना संसर्ग देतो, असे मानले. ती 25 माणसे पुढे प्रत्येकी 25 नव्या माणसांना संसर्ग देतो. व ती माणसे असा संसर्ग देणे चालू ठेवतात. (व मूळची माणसे पुढे संसर्ग फैलावण्याचे थांबवतात असे हिशेबाच्या सोयीसाठी गृहित धरू.
तर 25 गुणिले 25 असे करीत गेल्यास सहा आठवड्यात सुमारे अडीच कोटी लोकांना आजार होऊ शकतो.
संसर्ग झालेला माणूस जितक्या कमी लोकांना भेटेल तितके हे कमी धोकादायक ठरेल.Post to Feed
Typing help hide