लॉक्ड इन : आयुष्यातली एक अपूर्व संधी !

गेली ३० वर्ष मी घरून काम करतोय त्यामुळे जे लिहिलंय तो सगळा स्वानुभव आहे. लॉक्ड इन ही आयुष्यातली एक अपूर्व संधी आहे. कोणतीही घटना ही कायम वस्तुस्थिती असते, तिच्याकडे जो संधी म्हणून पाहतो त्याचं आयुष्य उजळतं, जो आपत्ती म्हणून बघतो त्याला फक्त वेळ कधी संपते याची वाट बघावी लागते.


' जीवन म्हणजे इतकी वर्ष ' अशी अत्यंत चुकीची धारणा आयुष्यात कोणताही बदल घडू देत नाही, कारण जीवन म्हणजे ' एक दिवस गुणिले काही हजार वेळा ' असा हिशेब आहे. थोडक्यात ज्याला आयुष्यात रंग भरायचेत त्याला आजच्या चोवीस तासांच काँपोझिशन बदलायला लागतं. जर आजच्या चोवीस तासात तुम्ही गाण्यासाठी एक तास दिलात, तरच तुमच्या जीवनात गाणं प्रवेश करेल आणि मग ते रोजच्या आजमधे भिनत तुमचं आयुष्य बदलेल. आज तुम्ही जितका जमेल तितका योगा मन लावून केलात तर त्या स्ट्रेचमुळे मोकळं झालेलं शरीर तुम्हाला उद्या योगा करायला उद्युक्त करेल. अशा प्रकारे तुम्ही आजच्या चोवीस तासांच्या काँपोझिशनमधे जितका बदल घडवाल तितकं तुमचं आयुष्य बदलेल.


शिवाय आयुष्यात मजा यायला ते कायम इंटर-अ‍ॅक्टिव हवं, म्हणजे मला क्रिकेटची आवड आहे असं म्हणणाऱ्याला जगात सामने सुरू व्हायची वाट बघावी लागते. हेच तुम्ही स्वतः टेबल -टेनिस खेळत असाल तर तुमचा फोरहँडचा बसलेला फटका, जगातल्या कोणत्याही प्लेअरचा कुठलाही फटका बघण्यापेक्षा, तुम्हाला खचितच जास्त आनंद देतो. शिवाय तुम्हाला खेळात कौशल्य प्राप्त करायची संधी देतो. तद्वत, नुसतं वाचन जितका आनंद देईल त्यापेक्षा तुमचं स्वतःच लेखन तुम्हाला कैक पटींनी जास्त आनंद देतं; पण त्यासाठी लेखनकला अवगत करायला लागते आणि काही तरी सांगण्यासारखं अनुभव समृद्ध जीवन असावं लागतं. कवितेचा व्यासंग आणि स्वतःचा अनुभव कवितेतून मांडणं हा एक वेगळाच कैफ आहे. त्यासाठी शब्दसमृद्धी, लयीचं भान, अनुभवाची उत्कटता अंगी भिनवावी लागते.


पाककला हा जीवनातला एक नितांत रम्य विषय आहे. पत्नीकडून पोळ्या करायला मी आता शिकणार आहे. पोळी जमली की निम्मं आयुष्य सार्थकी लागल्याचा फील येईल. आपल्या आवडीच्या पाककृती पत्नीसमवेत करण्याची मजा काही औरच आहे.


इतर संकेतस्थळांवरचे  लॉक्ड इनवरचे दिवस मोजणारे लेख पाहिले, अशा प्रकारे वेळ घालवणं म्हणजे केवळ कालापव्यय आहे. ते सगळे पर्याय काहीच करायला नसताना ठीक आहेत, पण हा कालावधी वाढला (आणि तीच शक्यता जास्त आहे) तर त्यातून यथावकाश डिप्रेशन येईल आणि हाती आलेली अपूर्व संधी निसटून जाईल.


व्यक्तीचं जीवन हे वृक्षाप्रमाणे बहरत जायला हवं, रोज नवं काही तरी शिकावं, नव्या विषयाचा मागोवा घ्यावा, आपला असलेला स्किल सेट आणखी कारगर करत न्यावा असं मला वाटतं आणि निदान मी तरी तसा जगत आलोय. या निमित्तानं हा लेख कदाचित तुमचंही जीवन बदलू शकेल.