संचारबंदी १८९९

संचारबंदी १८९९

येसू वहिनी, मी, बाळ आणि बाबा चौघेच होतो त्या रात्री घरी!
इंग्रजांनी जाहीर केलेली संचारबंदी, बाबांनी पाळायला हवी होती! 
संसर्गजन्य प्लेगचे भूत भागुरला येऊन पोहोचले तेव्हा असहाय लोकांना मदत करायला म्हणून ते सतत बाहेर असायचे. 
निर्मात्याचा (जर असेलच असे कोणी वरती) हा अजब न्याय, 
की जो मदतीला म्हणून गेला होता तोच आता स्वतः प्लेगग्रस्त होऊन घरी खिळलेला! 
बाळ कायम त्यांच्यासोबत माडीवर झोपायचा, पण बाबांना जेव्हा स्वतः ला प्लेगची लक्षणं दिसायला लागली तसे ते माडीवर एकटे राहून बाळला खाली ठेवू लागले होते.

सरत्या वेळे बरोबर बाबांची अवस्था बिकट होत जात होती. 
ते "पाणी, पाणी!!!" करीत किंचाळत होते. 
प्लेगने ग्रस्तलेल्यांना पाणी द्यायचे नाही, अथवा जीवास अधिक धोका असतो, हे माहीत होते आम्हाला!
पण त्यांना पाणी नाकारले असता ते भान हरपून विध्वंसक बनत होते... 
हाती येईल ते आम्हालाच फेकून मारत होते.
त्यांना बांधून, कोंडून ठेवण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नव्हता माझ्याकडे... 

जड पावलांनी माडीचा लाकडी जिना उतरताना माझा मलाच विश्वास नव्हता बसत की सोळा वर्षांच्या मी त्या रोगाने हिंस्र झालेल्या माझ्याच जन्मदात्याला बांधले होते. 
पण बहुधा प्रसंगच माणसाला धीर देत असावेत.. 

वरती माडीकडे पाहताना तिथून येणाऱ्या बाबांच्या आर्त किंकाळ्या असह्य होत होत्या. अशातच माझे लक्ष ओढल्या जाणाऱ्या सदऱ्याकडे गेले. 
तो बाळ होता. 
त्याच्या डोळ्यांमधले पाणी एव्हाना माझ्या ओळखीचे होते. 
होय! 
त्यालादेखील प्लेग मध्ये होणाऱ्या सगळ्या यातना व्हायला लागल्या होत्या. 
ह्यावेळेस मी वरती पाहिले ते माडीच्या सुद्धा खूप खूप वरती, मदत नाही, बहुधा जाब विचारत होती माझी नजर.. 

माडीवरील आवाज सरत्या रात्री सोबत क्षीण क्षीण होत गेला होता होता आणि बाळाच्या वेदना वाढत गेल्या होत्या!