मार्च २८ २०२०

सम

टीपः ही साधारण १९९१ च्या दरम्यान लिहिलेली आणि मग गेली एकोणतीस वर्षे नाहीशी झालेली कथा. परत सापडली.
======================================================

कर्रर्रर्र कर्र कर्रर्रर्र कर्र कर्रर्रर्र कर्र
संथ लयीत झोपाळ्याच्या काथ्याचा दोर करकरत होता. उंचेपुरे, देखणे शंकरबुवा विचारात गढून गेले होते.
उजव्या पायाच्या टाचेचा रेटा देऊन त्यांनी झोपाळा थांबवला. चित्रपट चालू असताना मध्येच पांढरा पडदा गळून पडावा आणि चित्रकिरण मागच्या पोकळीत मुक्तपणे फिरत राहावेत तसे त्यांना वाटले.
शंकरबुवांना आपण ती तार नेऊन दिल्यापासून ते सरबरल्यासारखे वागताहेत हे पोस्टमन आत्मू चोडणकराने एव्हाना दहा ठिकाणी सांगून टाकले होते. पण शंकरबुवा कुणाला धूप घालणार नाहीत याची खात्री असल्याने कुणीही त्यांच्या अंगणात पाऊल घालायचे धाडस केले नव्हते.
"म्हाताऱ्याचे फिरले असेल डोसके. आधीच तो प्रतिजमदग्नी. त्याच्या वाटेस कशास जा? " हे गणपतीच्या देवळात रिकामटेकडा बसलेल्या जनार्दनभटाचे बोलणे सगळ्यांनाच पसंत पडले होते. त्या सर्वांनी मग "शंकरबुवांचा पोरगा म्हणे... ", "ती सावित्री म्हणून कोणशी भावीण... " अशा कुजबुजी सुरू केल्या होत्या. शंकरबुवांचे घर गणपतीच्या देवळापासून भरपूर पंधरा मिनिटांच्या अंतरावर होते. त्यामुळे ही गप्पीदास मंडळी निर्धास्त होती.
हात मागे बांधून ओसरीवर येराझाऱ्या घालणाऱ्या शंकरबुवांना काय झाले आहे हे समजत नव्हते. साऱ्या जगातले रंग भराभरा ओसरून जावेत आणि सगळे काळे-पांढरे दिसू लागावे तसे त्यांना वाटत होते. पण प्रयत्न करकरूनही निर्भेळ पांढऱ्या रंगाचा एकही चतकोर त्यांना सापडत नव्हता.
टेंबलाईच्या देवळाच्या मागील बाजूस असलेल्या कमळतळ्यात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाच्या साक्षीने शंकरने सावित्रीला कवेत घेतली आणि लाजाळूच्या पानासारखी ती मिटूनच गेली. त्याच्या डोक्यात ज्वालामुखी गर्जू लागला. तिने डोळे मिटून आपले रक्तवर्णी ओठ वर केले आणि सर्वत्र गडद धुके पसरले. आदल्या दिवशी त्याने गायलेल्या पूरियाचे स्वर काळाची बंधने धुडकावून पुढे झाले आणि त्या दोघांना वेढून राहिले.
सावित्रीला तिच्या बापाने मुंबईला नेली तेव्हा पाण्यात बुडत असलेल्या मांजरासारखा शंकर गुदमरला. पण दात रोवून ओठ रक्तबंबाळ झाले तरी त्याने बाहेर आवाज उमटू दिला नाही.
आपल्या आईवेगळ्या पोराचे दोहोचे धार हात झाले म्हणजे आपण सुटलो असे बोलणे हरभटांनी उठता बसता सुरू केले होते. गडद अंधारात बुडून गेलेल्या प्रवाशाला सगळ्या दिशा सारख्याच. शंकरने हीही दिशा बिनतक्रार स्वीकारली.
हरभटांचे डोळे मिटायच्या आत पार पडलेल्या त्या लग्नसोहळ्यात जन्माने भटजी असूनही शंकरने असंख्य चुका केल्या. शेवटी तूपभरली पळी यशोदेच्या हातावर ओतून त्याने आपला हात जाळात घातला.
जाळाचा चटका बसल्यावर आपले आधीचे सगळे जळून गेले, आता या बावरलेल्या हरिणीगत दिसणाऱ्या यशोदेवर त्याचा काहीही भार पडता कामा नये अशी त्याने खूणगाठ बांधली.
त्याच्या लग्नाचीच काय ती खोटी असल्यासारखे हरभटांनी लौकरच डोळे मिटले. नवराबायको मिळून शेतकामाचा गाडा ओढू लागले.
यशोदा एकाद्या नाजूक काचचित्रासारखी होती. तिने स्वतःला शंकरमध्ये विरवून टाकले. भूतकाळ शंकर जवळजवळ विसरून गेला आणी कडक उन्हाच्या तलखीत नदीच्या पाण्याच्या गारव्यात तरंगत राहावे तसे संसारसुख अनुभवू लागला.
पडत्या पावसात त्याच्या नवजात अर्भकाला घेऊन सावित्रीने त्याच्या अंगणात पाऊल घातले. असल्या पावसात इरले-छत्री न घेता आलेली ही कोण बाई म्हणून तो कुतूहलाने अंगणात आला. यशोदेने येऊन त्या दोघांना घरात नेले तरी तो तिथेच उभा होता. नखशिखांत भिजून खाली मान घालून तो घरात आला तेव्हा यशोदेने न बोलता कोरडा पंचा त्याच्या हातात दिला आणि खुणेनेच खुंटीवरचे धोतर दाखवले.
बाळ-बाळंतीण चुलीजवळ शेकत होती. चुलीवर भात रटरटत होता.
महिन्यातून बत्तीस दिवस अर्धपोटी असलेल्या कुटुंबातून आलेल्या यशोदेला या घरात आल्यावर सुखाचा ठेवाच गवसला होता. तिने काहीही खळखळ न करता यातून मार्ग काढला आणि मुलाला आपल्याकडे ठेवून घेतले.
दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सावित्री नाहीशी झाली.
बिब्ब्याचा चरचरीत डाग बसावा तसे शंकरला झाले. यशोदेने ज्या सहजपणे मुलाला स्वीकारले त्यामुळे तर त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले. यशोदेने मोठ्या कौतुकाने बारसे केले आणि 'हा माझ्या गेलेल्या बहिणीचा मुलगा. तिच्या नवऱ्याने संभाळायचा नाकारला म्हणून मी आणला' असे सगळ्यांना सांगून टाकले.
अभिराम दिसामासाने वाढू लागला तरी शंकरच्या मनातला त्याच्याबद्दलचा दुरावा काही गेला नाही. आपण अनुभवलेल्या स्वर्गीय सुखाचे प्रतीक म्हणून हा हाडामासाचा गोळा समोर यावा हे त्याला चरचरत राहिले.
यशोदा आजारी पडली.
वैद्य बाबल्याकाकाला तिच्या आजाराचे निदान झाले नाही. तालुक्याच्या डॉक्टरलाही झाले नाही. सर्व्हिस मोटारीतून जिल्ह्याच्या गावाला नेण्याच्या तयारीत असतानाच तिची ज्योत मालवली.
जाताजाता अभिरामला पोटच्या पोराप्रमाणे जपेन असे वचन तिने शंकरकडून घेतले. शरमेने खाली मान झुकलेल्या शंकरने ते दिले.
तिचे अंत्यसंस्कार उरकल्या उरकल्या आपली मालमत्ता येईल त्या किंमतीला विकून तो पोमेंडीला येऊन स्थायिक झाला. नवा डाव मांडताना त्याला कुठलेच मळभ नको होते.
शेतीवाडी संभाळून त्याने भजनीबुवाचा पेशा पत्करला. फाटकगुरुजींकडे शिकलेल्या गाण्याचे वळण अजून गळ्यावरून उठले नव्हते.
अभिराम शाळेत जाऊ लागला. त्याला रत्नागिरीच्या शाळेत नेण्या-आणण्यासाठी शंकरबुवांनी जानू कांबळ्याची बैलगाडी ठेवली.
शंकरबुवांचे नाव साऱ्या जिल्ह्यात गाजू लागले. कोणताही महत्त्वाचा उत्सव त्यांच्या भजनाशिवाय पार पडेना.
भल्या पहाटेची गोष्ट. अभिराम लौकर उठून हायस्कूलच्या सहलीला जयगडला गेला होता. शंकरबुवा 'जय जय राम कृष्ण हारी' वेगवेगळ्या रागात घोळवत आंगण लोटत होते.
विस्कटलेल्या शरीराच्या सावित्रीला अंगणात उभे पाहताच भर समुद्रात नावेला भगदाड पडावे तसे त्यांना झाले. काही एक ऐकून न घेता त्यांनी तिला हाकून घातले. पोटच्या पोराला एकदातरी दुरून का होईना पाहू द्यावे म्हणून तिने विनवण्या केल्या. पण शंकरबुवांनी त्या कानाआड केल्या.
टिपे गाळीत थरथरत परत चाललेल्या सावित्रीची मूर्ती मात्र त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली.
पुढील शिक्षणाकरता अभिराम मुंबईला गेला. ते स्वतः जाऊन त्याची व्यवस्था लावून आले.
आणि त्यांचे बलदंड शरीर एकट्याने खपत राहिले.
घरात बाईमाणूस नसल्याने आसपासच्या घरांशी संपर्क येण्याचा महत्त्वाचा दुवाच अस्तित्वात नव्हता. त्यातून ज्यांनी चांभारचौकशा करण्याचा प्रयत्न केला त्यांना बुवांनी हरप्रयत्ने लांब ठेवले होते.
सावित्रीचा वा यशोदेचा विचार त्यांच्या मनात येत नव्हता असे नव्हे. पण आपले अस्तित्व संपले आहे, उरला आहे अभिरामचा बाप अशी स्वतःची समजूत घालत त्यांनी तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न चालू ठेवला.
अभिरामचे शिक्षण संपले आणि कोणतीही नोकरी मिळायच्या आत तो चित्रपटगायक म्हणून प्रसिद्धीस आला.
हीन अभिरुचीच्या अर्थहीन गाण्यांत त्याला कसला रस वाटतो हे शंकरबुवांना कळेनासे झाले.
'अरे गाणे कसे पाहिजे, तर तोडीचा जडभार साज सहजगत्या पेलत त्या चीजेबरोबर खेळत राहता यायला हवे' आपला आवाज ऐकू जाणार नाही याची खात्री असलेले त्यांचे मन आक्रोशत राहिले.
वर्ष वर्ष अभिरामची बोटभर चिठीही येईनाशी झाली. प्रसिद्ध पार्श्वगायक अभिराम बर्वे याच्याबद्दल केसरीत चुकूनमाकून आलेल्या चार ओळी त्यांच्या समईत तेल घालत राहिल्या.
आणि आज कुणा सुचित्रा नावाच्या बाईकडून आलेली तार सांगत होती की अभिराम एका मोटार अपघातात मृत्यू पावला होता आणि त्याचे अंत्यसंस्कार उरकले गेले होते.
डोक्यावरचा सूर्य सरकत क्षितिजापार झाला तरीही शंकरबुवांच्या येराझाऱ्या थांबल्या नाहीत. चूल, भांडी, तांदूळ सवयीने त्यांच्या येण्याची वाट पाहत राहिले.
अडचणीच्या प्रसंगी त्यांना आधार देणारे स्वरही आज बेपत्ता झाले होते. सर्वत्र काळ्या रंगाचा संचार चालू होता.
आपल्याकडे कुणीतरी आले आहे असा त्यांना भास झाला.
पायरी उतरत त्यांनी अंगणात पाऊल घातले तेव्हा गोठ्याजवळच्या गंजीपाशी सावित्री, यशोदा आणि अभिराम उभे असलेले त्यांना जाणवले.
प्रत्येकाच्या हातात पांढऱ्या रंगाचा तुकडा होता. नव्हे, त्यांच्या शरीरांतूनच पांढरा रंग पाझरत होता.
शेजारी उभ्या असलेल्या मारव्याच्या स्वरांच्या खांद्यावर हात टाकून शंकरबुवा पुढे झाले.
आणि सर्वत्र उसळता आभाळी निळा रंग दाटून आला.

Post to Feedछान

Typing help hide