मार्च ३० २०२०

देव्यपराधक्षमापन स्तोत्र

नेहमीप्रमाणे पहाटे जाग आली. सवयीने जपाला बसलो. पण सतत आद्य शंकराचार्यकृत देवी अपराध क्षमापन स्तोत्राची आठवत होत होती. मी नेहमी स्तोत्रे वगैरे म्हणणारा नाही. त्यामुळे असे का होतंय ते काही कळत नव्हतं. 

माझे वडील गुरुचरित्राचा पाठ दरमहिन्यांत करत असत. त्या सात दिवसात हे स्तोत्र तसेच करुणात्रिपदी म्हणत असत. त्यांचा आवाज ही चांगला होता व शास्त्रीय गाण्याचं पण अंग होतं. रात्रीचे आठ-साडेआठ वाजलेले असत. दिवे बंद करून देवापुढे समई, निरांजन व उदबत्ती लावलेली असे. सगळीकडेच शांतता पसरलेली असे. आई वडील सर्वात पुढे बसलेले असत व आम्ही चारही भावंडे मागे बसलेले असू. वडील मोठ्याने म्हणत असत व आम्ही फक्त श्रवणभक्ती करायचे. वडिलांचे ते भावपूर्ण म्हणणं आठवलं की आजही तात्काळ अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहतात. अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीच्या घटनांबद्दल लिहितोय मी.

मी त्या वेळेस शाळेत होतो. त्यामुळे मला शब्द वगैरे आजही आठवत नाहीयेत. आठवतंय ते चाल, नाद आणि वडिलांचा भावनेने ओथंबलेला आवाज. आजही पहाटे अचानक तेच आठवत होते. पण आज मात्र शब्द काय असावेत याचं कुतूहल निर्माण झालं होतं.  ह्या कुतूहलाने मला फार काळ जप करू दिला नाही. गुगलदेवाला शरण जाऊन http://web.bookstruck.in/book/chapter/45823 या साईटवरून शब्द मिळवले. त्या साहाय्याने वडिलांच्या चालीत स्तोत्र म्हणून पाहिले. मस्त वाटले. थोडावेळ तसाच बसून राहिलो. परत एकदा म्हणावेस वाटल्याने परत एकदा म्हणून पाहिले. निव्वळ आठवणीतल्या चालीमुळे शब्दफोड करणे जमून गेले होते.

थोड्यावेळाने स्तोत्राच्या अर्थाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मग त्याच साईटवरील अर्थ वाचून काढला. काहीतरी राहतंय, सगळा अर्थ नीट येत नाहीये अशी भावना सारखी मनात येत होती. ही रचना शंकराचार्यांनी नामस्मरणाच्या महती सांगण्यासाठी तर रचलेली नाही ना असं काहीतरी मनात येत होतं. 

नुकताच नर्मदा परिक्रमा करून मी जेमतेम आठवड्यापूर्वीच परत आलेलो होतो व त्या यात्रेत नामस्मरणाबद्दल विचारांचे बरे आदान प्रदान झाले होते. त्यामुळेच मला असं काहीतरी वाटतंय अशी मी माझ्या मनाची समजूत घालत होतो. पण शेवटी आपल्याला काय वाटते ते स्वैर भाषांतर म्हणून लिहून काढायला काय हरकत आहे असे वाटल्याने ते काल लिहून काढले. शुद्धलेखन तपासण्याची सोय फक्त मनोगतावरच असल्याने ते काम प्रथम पार पाडले. आणि आता इथे ते चिकटवतो आहे.  मनोगतच्या शुद्धलेखन सुविधेसाठी शतशः धन्यवाद.
_/\_

देव्यपराधक्षमापनस्तोत्रम्

न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो 
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथा: | 
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं 
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१|| 

-अर्थः मला ना मंत्र माहिती ना कुठलं यंत्र माहिती. तुझी स्तुती कशी करू हेही मी जाणत नाही. पूजाविधीमध्ये असलेले आवाहन, ध्यान इत्यादी, किंवा ध्यान(योग)मार्गात असलेल्या अनेक मुद्रा वगैरेही मी जाणत नाही. मी फक्त एकच जाणतो, तुझं अनुसरण करणं, जे की सगळे क्लेश दूर करणारं आहे. (संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
मला ना मंत्र माहिती ना कुठलं यंत्र.
तुझी स्तुती कशी करायची असते हेही मला कळत नाही. 
विविध पूजाविधी, त्यातील आवाहन, ध्यान वगैरे सुद्धा मला माहिती नाहीयेत.
ध्यान(योग)मार्गात असलेल्या अनेक मुद्रांचा वापर माझ्याकडून होणं ही तर फारच लांबची गोष्ट झाली.

पण मला एक मात्र (पक्कं) माहितेय की, 
सतत तुझ्या मागोमाग येणं, 
तुझं अखंडित अनुसंधान ठेवणे, 
यामुळेच सगळे क्लेश दूर होतात.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया 
विधेयाशक्यत्वात्तवचरणयोर्या च्युतिरभूत् | 
तदेतत्क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे 
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||

-अर्थः
माझ्याकडे पूजनाच्या विधींबद्दलचं ज्ञान नाही, पूजा करावी म्हटलं तर पुरेसं द्रव्य(पैसा) नाही, आणि तोही असला तरी मूलतः असलेला आळस या अशा गोष्टींमुळे मी तुझ्या चरणांपासून दूर झालो. पण हे सकलोद्धारिणि, शिवे, माते, माझे हे अपराध पोटात घाल. कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीही कुमाता नसते. (संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
ना मला पूजाविधींचं यथार्थ ज्ञान आहे;
ना माझ्याकडे पूजासाहित्य गोळा करायला आवश्यक तेवढा पैसा. 
बरं ही परिस्थिती बदलण्याची शक्यताही फारशी नाही कारण; आळस तर माझ्या रोमा रोमात भरलेला आहे.
याचा जो काही परिणाम व्ह्यायचा तो झालाय,
मी तुझ्या चरणांपासून खूप लांब फेकला गेलोय.

पण तू मला क्षमा कर. 
तू नक्कीच मला क्षमा करशील कारण;
सगळ्यांचाच उद्धार करून, त्यांचे कल्याण करण्याचा तुझा स्वभाव आहे.
हा तुझा स्वभावच, तुला, माझे अपराध पोटात घेऊन मला क्षमा करायला लावेल.
काहीही असो,
मला एक मात्र पक्कं माहितीयं की, कुपुत्र असू शकतो.
पण कुमाता असूच शकत नाही. ||२||


पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरला: 
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः | 
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे 
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||

-अर्थः 
या भूतलावर तुझे अनेक सरलमार्गी पुत्र असतील/आहेत, पण त्यांच्या मध्ये मीच असा तरल स्वभावाचा असा तुझा पुत्र आहे. माझा असा त्याग करणं तुला शोभत नाही, कारण एक वेळ कुपुत्र जन्माला येईल, पण माता कधीच कुमाता नसते. (संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
या भूतलावर तुझे अनेक सरलमार्गी पुत्र असतील; नव्हे आहेतच.
पण त्यांच्यामध्ये चंचल स्वभावाचा मात्र मीच एकमेव आहे. 
पण म्हणून मला असं तुझ्यापासून दूर लोटणे कसं बरं योग्य होईल?
नाही, तू मला दूर लोटूच शकणार नाहीस.
कारण; 
मला एक पक्कं माहितीयं की, कुपुत्र असू शकतो.
पण कुमाता असूच शकत नाही. ||३||

जगन्मातर्मातस्तवचरणसेवा न रचिता 
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया | 
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे 
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||

-अर्थः 
हे जगन्माउली, मी तुझ्या चरणांची सेवा कधी केली नाही किंवा मी तुझ्यासाठी म्हणून कधी द्रव्य वेचलं नाही. तरीसुद्धा तू तुझं निरुपम प्रेम माझ्यावर ठेवलंस. म्हणतात ना, एक वेळ कुपुत्र जन्माला येऊ शकेल, पण माता कधीच कुमाता नसते. (संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
हे जगन्माउली, मी तुझ्या चरणांची सेवा कधी केली नाही किंवा 
मी तुझ्यासाठी म्हणून कधी द्रव्य वेचलं नाही. 
तरीसुद्धा तू तुझं निरुपम प्रेम माझ्यावर ठेवलंस. 

त्यावरून मी नक्की म्हणू शकतोय की,
एक वेळ कुपुत्र जन्माला येऊ शकेल, 
पण कुमाता कधीच असू शकत नाही.॥४॥

परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया 
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि | 
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता 
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||

-अर्थः
वयाची पंच्याऐशीहून अधिक वर्षे सरली, मी इतर सगळ्या देवांचा आणि विविधप्रकारच्या सेवांचा (देवाच्या सेवांचा, उपासना इ.चा) त्याग केला- का? तर मला तुझी कृपा हवी आहे म्हणून. आणि आता जर तुझी कृपा झाली नाही, तर हे लंबोदरजननी, मी निरालंब(निराधार) असा आता कुणाला शरण जाऊ? (संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
वयाची पंच्याऐशीहून अधिक वर्षे सरली.
केवळ तुझी कृपा व्हावी या एकमेव अभिलाषेपोटी मी तुला सदैव अनुसरत राहिलो.
पण त्या नादात मी सर्व देवदेवतांच्या पूजा अर्चा उपासना करायचो विसरून गेलो.
आणि येवढे करून, आता जर तुझी कृपाही माझ्या वाट्याला आली नाही तर मी या वयांत कुठे जाऊ?

सर्वांचे अपराध आरामात पोटात घेऊ शकशील, एवढे मोठे पोट असणाऱ्या लंबोदरजननी, तुझ्याशिवाय मी कोणाला शरण जाऊ?
तुझ्याशिवाय मला कोणता आधार शिल्लक राहिला आहे बरे? ॥५॥

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा 
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकै: | 
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं 
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ ||६||

- अर्थः
या श्लोकाचा अर्थ नीट शोधला पाहिजे) पण वरवरचा अर्थ- तुझ्या नामाचे वर्ण (नावात येणारी अक्षरे) कानात नुसती शिरली तरीही, वायफळ बडबड करणार्‍याची वाणी मधुपाकासमान गोड होते आणि जो रंक आहे तो चिरकाळ कोटिसुवर्ण(मुद्रा) भोगू लागतो. हे केवळ तुझ्या नामजपाचे फल. पण तुझ्या अशा या जप करण्यास योग्य अशा जपविधीचा महिमा कोण जाणतो? (कुणीच नाही)
(संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
एखाद्या गरिबाला कोट्यवधी सुवर्णमुद्रा दिल्या व त्याने त्या कशाही खर्च करूनही जर त्या थोड्यासुद्धा कमी झाल्या नाहीत तर आपल्याला ते किती आश्चर्यकारक वाटेल नाही का?
किंवा सतत निरर्थक बडबड करणाऱ्या माणसाचे बोलणे जर एकदम मिठ्ठास व अर्थपूर्ण झाले तर आपल्याला तो मोठा चमत्कार वाटल्याशिवाय राहील का?

अगदी तसेच तुझे संपूर्ण नाम नव्हे तर तुझ्या नामातील काही अक्षरे चमत्कार घडवून आणतात. त्यातले एखादे अक्षर जरी नुसते कानावर पडले तरी असे काहीतरी भव्यदिव्य घडून आणण्याची ताकद त्यात असते. 

समुद्राच्या प्रत्येक लत्तेमध्ये जसा समुद्र ओतप्रोत भरलेला असतो तसा तुझ्या नामातील (क्षर नसलेल्या) प्रत्येक अक्षरात तू भरून राहिलेली असतेस हेच तर त्याचे कारण आहे हे एव्हाना मला माहीत झालंय.
असे प्रत्येक अक्षर माते तुझ्यासारखेच असते म्हणून तर त्याला मातृक असे म्हणतात ना गं?
तुझ्या नामातील एखादे अक्षर नुसते कानावर पडले, तरी त्यातून एवढे सामर्थ्य  निर्माण होत असेल, तर ते अक्षर जर मी वाणीने उच्चारले तर त्यातून कितीतरी अधिक शक्ती बाहेर पडेल ना गं?
पण त्याचे गणित मांडण्य़ाच्या फंदात मी कशाला पडू?
जर ती अक्षरे आपल्याच वाणीने उच्चारून आपल्याच कानाने ऐकली तर काय होईल याची तर मला गणनाच करता येणार नाही.
अशा तुझ्या नामाचा जर जप मोठ्याने केला व आपल्याच कानाने ऐकला तर काय होईल हे याचा विचार करायला लागलो तरी माझी मती गुंग होऊन जाते.

आणि असा जप अखंड करण्याचा विधीच जर एखाद्याने सुरू केला तर मात्र;
असे काही तर घडून येईल, ज्याचा अर्थ प्रत्यक्ष वेद सुद्धा जाणू शकणार नाहीत. 
कळीकाळाची शक्ती सुद्धा त्यापुढे फिक्की पडेल.
ते असं काही असेल की, कळीकाळाची शक्ती म्हणजे सूर्यापुढे एखादा काजवाच. 
एकंदरीत ती सगळी प्रक्रिया, त्या प्रक्रियेचे परिणाम, 
सगळंच अवर्णनीय, अपौरूषेय आणि अवर्चनीय असेल. 

(अवांतर: हे सगळे समजून घेण्यासाठी एकमेव आशेचा किरण शिल्लक राहतो. 
तो म्हणजे प्रत्यक्ष असा जपविधी करून त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.
थोडंफार असंच काहीसं ज्ञानेश्वर माउलीही हरिपाठात सांगताहेत असं वाटतं.

नारायण हरी उच्चार नामाचा
तेथे कळीकाळाचा रीघ नाही ॥२५.२॥
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी
तें जीवजंतूंसी काय कळे ॥२५.३॥)

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो 
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपति: | 
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं 
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटी फलमिदम् ||७||

अर्थ- 
फार सुंदर अर्थ आहे. शंकराचं वर्णन केलंय- शंकर चिताभस्म लावतात, वैराग्यास योग्य असं अन्न सेवन करतात, दिगंबर राहतात, जटा वाढवलेल्या आहेत, गळ्यात भुजंगरूपी हार धारण करतात, पशुपती आहेत, भुतांचे नाथ आहेत- असे असूनसुद्धा त्यांना सगळे जगदीश म्हणतात. हे, त्यांनी तुझ्याशी विवाह केला याचंच तर फळ आहे.
(संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
शंकर चिताभस्म लावतात.
वैराग्यास योग्य असं अन्न सेवन करतात.
दिगंबर राहतात.
जटा वाढवतात.
गळ्यात भुजंगरूपी हार धारण करतात.
ते पशुपती आहेत.
भुतांचे नाथ आहेत.
पण तरीही सर्वजण त्यांना जगदीश म्हणतात!!!!!

खरंच प्रथम दर्शनी हे अनाकलनीय वाटतं.
पण मला मात्र त्यात फारसं आश्चर्य वाटत नाही.

हे आई, त्यांनी तुझ्याशीच विवाह करून, तुझे अखंड साधिन्य मिळवले त्याचंच तर हे सगळं फळ आहे.

न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे 
न विज्ञानापेक्षा शशिमुखिसुखेच्छापि न पुनः | 
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै 
मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||

-अर्थ: 
थोडंसं उलट्या क्रमानं आलंय खरं, पण- मला मोक्षाची इच्छा नाही, या संसारात वैभव मिळावे अशी इच्छा नाही, मला विशेष ज्ञान मिळावं अशी अपेक्षा नाही की चंद्रमुखी स्त्रीचं सुख मिळावं अशीही इच्छा नाही. म्हणून, हे जननि, माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे, की माझा संपूर्ण जन्म, तुझ्या आणि शिवाच्या नामस्मरणात जावो.
(संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
आई, मला आता मोक्षाची इच्छाच राहिली नाहीये.
संसारातलं वैभव, चंद्रमुखी स्त्री, लोकांना विशेष वाटेल असे ज्ञान वगैरे सारख्या गोष्टी तर मोक्षापुढे फारच क्षुल्लक आहेत. 
त्याबद्दलची माझी इच्छा तर केव्हाच मेलीय.

मी असं म्हणतोय कारण; 
वरील सर्व गोष्टींच शब्दांत वर्णन करता येतंय. 
त्यांच्याबद्दल मनांत काहीतरी कल्पना करता येतीय.
त्यामुळेच ते फारसं भव्यदिव्य नाहीये हे माझ्या आता लक्षात आलंय.

त्याच्यापेक्षाही सर्वोत्तम व भव्यदिव्य असं काही असू शकतं, 
तसंच ते इतकं अतुलनीय असतं की, ना त्याचे वर्णन करता येते, ना त्याची कल्पना करता येते, ना ते शब्दाने सांगता येतं.

असं जे काही असते, ते, जर निव्वळ नामस्मरणाने मिळत असेल तर मी नामस्मरणाव्यतिरिक्त इतर गोष्टी कशाला मागत बसू?
आई,
खरंच सांगतो, तुझ्या व शिवाच्या नामस्मरणात माझा उरलेला जन्म जावो एवढंच मी मागेन. 
बाकी माझी काही इच्छाच राहिलेली नाहीये.

नाराधितासि विधिना विविधोपचारै: 
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभि: | 
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे 
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||

-अर्थः - 
मी तुझी विधिवत उपचारांनी किंवा रुक्षचिंतनपर वचनांनीही आराधना केली नाही . श्यामे(कालिकामाता) तूच मज अनाथावर तुला उचित वाटेल ती कृपा कर.
(संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
तुझ्या विधिवत उपचारांत आता माझं शरीर रमत नाही.
त्यामुळे शरीराने काही करावंसच वाटत नाही आहे.

मनाने तुझे चिंतन करणे खूप आनंददायी वाटायचे. 
पण तुझे चिंतनही दिवसेंदिवस रूक्ष होत चाललंय.
त्यामुळे तुझे चिंतन करणेही आता कंटाळवाणे व्हायला लागलंय.
त्यामुळे आतातर तुझे चिंतन करायचेही थांबलंय.

या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्या शरीराला व मनाला आलंबन घ्यायला कोणताच आधार शिल्लक राहिलेला नाहीये.
या शरीराचे व मनाचे, मी काय करायचे? तेच कळेनासे झालेय.
खरंच मी निराधार झालोय.
मी अगदी अनाथ दीनवाणा झालोय.

मला हे हवंय, हे नकोय, असं काहीच तुझ्याकडे मागायची इच्छा मला उरलेली नाहीये.

आई,
आता, तुला जे योग्य वाटेल त्यापध्दतीने तू माझ्यावर कृपा कर.
त्याबाबत माझी कोणतीही तक्रार असणार नाही. 
तू जे काही करशील ते मी मनापासून स्वीकारेन.

आपत्सु मग्न: स्मरणं त्वदीयं 
करोमि दुर्गे करुणार्णवेशि 
नैतच्छठत्वं मम भावयेथा: 
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ती ||१०||

-अर्थः - 

हे करुणासागर दुर्गे, आपत्तींमध्ये मी तुझंच स्मरण करतो. यात कुठलीही लबाडी नाही (केवळ आपत्ती असली की मला तुझी आठवण येते असं नाही) पण तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या लेकराला जशी आईच आठवते, तद्वत मी तुझं आपत्तींमध्ये स्मरण करतो. 
(संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
आई, जेव्हा जेव्हा माझ्यावर आपत्ती कोसळते, तेव्हा तेव्हा मी तुझ्याकडे धाव घेतो.
पण त्याचा अर्थ असा नव्हे की इतरवेळेस मी तुला विसरलेला असतो.

एखादं लहान बाळ, आईच्या अवती भोवती खेळत, बागडत असतं. ते काही सदा सर्वकाळ आईला चिकटून बसत नाही.
पण तहान- भुकेने व्याकूळ झालं की मात्र तेच बाळ सगळं सोडून तुझ्याकडे धाव घेतं.

माझंही तसंच होतंय.
मी काहीही करत असलो तरी तुझे भान मला सदैव असते.
पण आपत्ती येताच मात्र हातातलं सगळं सोडून, मी तुझ्याकडेच धाव घेतो.
तुझ्याशिवाय मला आहे तरी कोण? 
शिवाय, तू तर करुणेचा सागर आहेस.
मग तुला सोडून दुसरीकडे कुठे जायची मला गरजच काय?????

जगदम्ब, विचित्रमत्र किं 
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि | 
अपराधपरम्परापरं 
न हि माता समुपेक्षते सुतम् ||११|| 

-अर्थः - 
आणि हे जगदंबे, माझ्यावर तुझी परिपूर्ण अशी करुणा/कृपा आहे यात नवल ते काय? कारण मुलाने कितीही अपराध केले तरीही आई त्याची उपेक्षा कधीच करत नाही. 
(संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
आई,
काही काही वेळेस मला असं वाटतं की, 
मी हा असा अपात्र असूनही तू माझ्यावर कृपा कशी काय करू शकतेस?
खरंतर, मला दोन फटके मारून शिक्षा करायचे सोडून, तू जेव्हा असं काही करतेस ना, तेव्हा तर ते मला फारच विचित्र वाटते.

पण मला आता त्याचं उत्तर कळलंय.
लेकाचे अपराध आई नेहमीच पोटात घालते, ते उगीच नाही.
आज नाही तर उद्या, त्याच्यात नक्कीच सुधारणा होईल या अपेक्षेने ती त्याची उपेक्षा करत नाही, त्याला दूर लोटत नाही. 
तर त्याला सुधारणेची संधी देत राहते.
पण आता मात्र मला मिळालेली ही संधी वाया घालवायची नाही आहे.

मत्समः पात़की नास्ति 
पापघ्नी त्वत्समा न हि 
एवं ज्ञात्वा महादेवि 
यथायोग्यं तथा कुरु ||१२||

-अर्थः - 
हे देवी, माझ्यासारखा पातकी या जगात दुसरा कुणीही नाही. पण हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरंच आहे की तुझ्यासारखी पापांचा नाश करणारी दुसरी कुणीही नाही, त्यामुळे हे माझे भाव जाणून तुला माझ्याबाबतीत जे योग्य वाटेल ते तू कर.
(संदर्भ:http://web.bookstruck.in/book/chapter/45823)

स्वैर भाषांतर :-
आई, 
माझ्यासारखा पातकी या जगात दुसरा कुणीही नाही, हे अगदी खरं आहे.
पण सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारी तुझ्यासारखी दुसरी कुणीही नाही, हेही तेवढंच खरं आहे. होय की नाही?
मग आता हे सगळं लक्षात घेऊन, तुला जे काही योग्य वाटेल ते कर.
नव्हे ते तू करणारच आहेस.
आणि तू जो काही निर्णय करणार असशील तो मला मान्य असणारच आहे.

||इति श्रीमत्परमहंस-परिव्राजकाचार्य श्रीशंकराचार्यविरचितं देव्यापराधक्षमापनस्तोत्रं सम्पूर्णं ||

Post to Feedधन्यवाद !
कोणताही मंत्र फारतर मनाची एकसंधता साधतो
अहाहा
धन्यवाद
माझा प्रतिसाद
मला वाटते

Typing help hide