एप्रिल २०२०

मॅच-फिक्सिंग

(क्रिकेटमधलं मॅच फिक्सिंग जेव्हा २००० साली दिल्ली पोलिसांना दिलेल्या हॅन्सी क्रोनिएच्या कबुलीतून जाहीर झालं, त्यावेळी - १२ एप्रिल २००० या दिवशी - मी ही कथा लिहिली होती 'लोकमत. पुणे'मध्ये .)

गुलमोहर सोसायटीच्या कमानीतून मी कमीत कमी वेगानं आत गाडी वळवली, जवळ-जवळ थांबलोच म्हणा ना. असं केलं ना की तिथे खेळणाऱ्या मुलांचं लक्ष वेधलं जातं (गाडीचा हॉर्न न वाजवताही. हे महत्त्वाचं. फक्त आपल्यात थांबायची तयारी हवी.).... बोलर आपण लांबच लांब आपला रन-अप धुंडाळत जातो. मिड-ऑफचा लाँग-ऑफ होतो आणि फॉरवर्ड शॉर्टलेगचा बॅकवर्ड. जेव्हा जेव्हा एखादी गाडी आत वळते, तेव्हा तेव्हा असंच फील्ड सेटिंग बदलतं. 
आज मात्र असं काहीच घडलं नाही. मी थोड्याशा आश्चर्यानंच बघितलं. तीन स्टंप्स जागेवरच होते. एक बॅटही शेजारी पडलेली होती. मुलं बहुधा बॉल शोधायला गेली असावीत असा विचार करत मी जिना चढायला लागलो. घरी गेल्यावर बाल्कनीत बसून चहा पिता-पिता पोरांचं क्रिकेट बघता येईल की नाही? बॉल हरवला असला तर तो शोधायला किंवा नवीन बॉल आणायला किती वेळ लागेल, असा विचार करत मी घरात शिरलो. शेजारच्या घरातनं त्याच वेळेला आपल्या हातात काहीतरी घेऊन गेलेला विनीत मात्र माझ्या नजरेतून काही सुटला नाही. अर्थात मी त्याला काही विचारण्याआधीच तो गायब झाला.
चहाचा कप घेऊन जेव्हा मी बाल्कनीत आलो, तेव्हा मात्र खेळ सुरू झालेला होता. मी मनातल्या मनात 'हुश्श' करणार एवढ्यात माझं लक्ष विनीतकडे गेलं. हे साहेब चक्क सोसायटीच्या भिंतीवर चढून हातात मोबाईल (बहुधा बहिणीचा खेळातला) घेऊन बसले होते. एरवी स्वतः कप्तान असल्याच्या थाटात बोलिंग करताना सतत ऑर्डर्स देणारा, बॅटिंग करताना स्वतःला नाबाद म्हणणारा आणि क्षेत्ररक्षण करताना उगाचच आरडाओरडा करणारा विनीत नुसताच बसलेला? कमानीच्या दुसऱ्या बाजूच्या भिंतीवर असेच आमचे चिरंजीव पिंटूही बसलेले होते. दोघांच्याही हातात मोबाईल फोनसदृश काही तरी चीजवस्तू होत्या.
उरलेली तीन-चार मुलं मात्र खेळत होती. एकानं बॉल टाकला. तो बॅटसमनच्या पायावर आपटला. 'हाउज दॅट' म्हणून अपील झालं. विनीतनं भिंतीवरूनच 'नाही, आऊट नाहीये' असं सांगितलं. इकडे पिंटू आपला फोन कानाला लावून 'सिक्स बॉल्स, फोर रन्स' असं ओरडला. 'तुला जिंकायचं आहे का? ' अशी विनीतनं त्यावर पृच्छा केली. 'होय! ' आमच्या पिंटुरावांनी त्यावर उत्तर दिलं!
'अरेच्च्या! हे काय नवीन? ' असा प्रश्न माझ्या मनात आला आणि अचानक एकदम लख्ख प्रकाश पडला.  सकाळीच पिंट्यानं मला विचारलं होतं,
"बाबा, मॅच फिक्सिंग म्हणजे काय हो? "
मी वर्तमानपत्र वाचत असताना हा उलट्या बाजूनं नको त्या बातम्या तेवढ्या नेमक्या वाचत असतो! त्यातून क्रिकेटची बातमी म्हटल्यावर कशी सोडेल?
"मॅच फिक्सिंग म्हणजे आधी ठरवून खेळणं. आधी कोण जिंकणार हे ठरवायचं आणि मग त्याप्रमाणं खेळायचं. "
तसा मी संस्कारप्रिय असल्यामुळे त्यातला 'बेटिंग' हा मुद्दा वगळलाच.
"काय, बघताय ना आजचा खेळ? " शेजारच्या बाल्कनीत नुकत्याच आलेल्या परुळेकर मामांचा आवाज आला.
"हो ना! पोरांनाही कळलं वाटतं बेटिंग? "
"कळलं? अहो, त्या क्रोनिएचं पूर्ण संभाषण पाठ झालंय आमच्या विनीतचं! सांगत होता, 'आता यापुढे प्रत्यक्ष कप्तान म्हणून खेळण्यापेक्षा असाच बाजूला बसून 'गेम हँडल' करेन.' आता बोला! "
"काय म्हणता? "
"तर हो... काय नको ते शिकून येतात. आता कसं समजावायचं त्यांना? "
"अहो मामा, लहान मुलं आहेत. शिकतात नवीन फॅडं आणि टिकतात ती दोनच दिवस! "
"पाहा बुवा! 'मॅच जिंकण्याच्या बदल्यात पिंट्याकडून सगळा गृहपाठ करून घेईन' असं म्हणत होता विनीत!"
मी फक्त हसलो.
"मला वाटलं गंमत वाटतेय मुलांना. चांगलं सोडून वाईट मात्र लवकर शिकतात. थांबा जरा, बघतोच त्याला... "
आमच्या गप्पांमध्ये खालची मॅच संपल्याचं माझ्या लक्षातच आलं नव्हतं. कोण जिंकलं ही उत्सुकता मला होतीच. पिंट्या घरात शिरला (आणि बहुधा विनीतही त्याच्या घरात). मी काही बोलणार एवढ्यात आत जाऊन तो दोन वह्या हातात घेऊन आला.
"शहाण्या, हात-पाय तरी धू!" मी म्हटलं.
"बाबा, आम्ही आज मॅच फिक्सिंग खेळलो, " तो माझ्या बोलण्याकडे (नेहमीप्रमाणे) संपूर्ण दुर्लक्ष करत म्हणाला, "पण तुम्ही कुठे मला सांगितलं होतं की असं आधी ठरवून खेळण्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी द्यावं लागतं? आता विनीतचं होम-वर्क कोण कॉपी करणार? "
मी काही बोलणार एवढ्यात बेल वाजली. बघतो तर विनीत दारात!
त्याच्या चेहेऱ्यावर मामांचे दोन धपाटे स्पष्ट लिहिलेले दिसत होते.
"ए पिंटू, " आपला आवाज कसाबसा फोडत तो म्हणाला, "नको रे बाबा हे मॅच-फिक्सिंग. आजोबा म्हणतात, अशा लोकांना चांगली शिक्षा द्यायला हवी. "आपली वही घेऊन तो निघून गेला.
पिंट्या हळूच माझ्याकडे आला आणि म्हणाला,
"मला पण नको बाबा... किती बोअरिंग! ठरवून आऊट होताच येत नव्हतं! "
... आमच्या गल्लीतलं मॅच-फिक्सिंग असं संपलं. आमची गल्ली छोटी, मुलं छोटी, पैजाही छोट्याच! (... आणि शिक्षाही छोट्याच!)
दिल्लीतल्या मॅच-फिक्सिंगचं काय?

- कुमार जावडेकर

Post to Feedक्रिकेट आणि तबलिगी जमात
स्पॉट फ़िक्सिंग

Typing help hide