एप्रिल २०२०

पुण्याहून थेट नूअर्क

           आमच्यासारखे लोक जाऊन जाऊन कितीवेळा परदेशी जाणार ? आमची परदेशात जाण्याची सुरवातच मुळी अगदी "लागले नेत्र रे पैलतिरी " म्हणण्यासारख्या वयात नसली तरी आम्ही शासकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतरच आणि तीही  केवळ आमच्या पुढील पिढीने परदेशात जाण्याचे धाडस दाखवल्यामुळे झालेली ! त्यामुळे आणि शिवाय दुसऱ्या वेळी व्हिसा देताना त्या खिडकीवरील अधिकाऱ्याने तुम्ही फारच वेळा अमेरिकेत जाता बुवा असे म्हणून आम्हाला व्हिसा न देण्याचा दम दिल्यामुळे   "आता नाही पुन्हा असे होणार " असे आश्वासन आम्ही देऊन बसलेलो (त्याच्या अगोदर तर त्या खिडकीवरील खडूस ललनेने तेवढ्याच कारणाने आम्हास व्हिसा नाकारलेला !)त्यामुळे "आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास " अशी परिस्थिती झालेली  अर्थात त्यामुळे अगदी मोजक्या वेळीच आमचे अमेरिकेस जाणे घडते.म्हणूनच प्रत्येक भेटीतील किंवा प्रवासातील अनुभवही अगदी रोमहर्षक नसले तरी काही कारणामुळे तरी अगदी लक्षात रहाण्यासारखे असावेत यात आश्चर्य कसले?
           २०१८ मध्ये अमेरिकेस जाण्याची मानसिक तयारी नसली तरी चिरंजीव दस्तुरखुद्द काही कारणामुळे भारतात आल्यामुळे जाताना आम्हाला घेऊनच जायचे असा त्याने निश्चय केलेला व त्यासाठी यावेळी पहिल्यांदाच पुण्याहूनच थेट नेवार्क (नूअर्क ?प्रभूबाईंइतके शहराच्या नावाच्या उच्चाराबद्दल दक्ष रहायचे म्हटले तर ) असे प्रवासाचे आम्हा तिघांचे तिकीटही त्याने काढलेले त्यामुळे आता ते तिकीट वाया जाऊ नये म्हणून तरी अमेरिकेस जाणे प्राप्तच झाले.आतापर्यंत आमचे तिकीट नेहमी मुंबई ते नेवार्क असे त्यामुळे पुणे मुंबई हा प्रवासाचा एक टप्पाच असायचा.व बहुधा पावसाळ्यातच आमचे प्रयाण होत असल्याने पुणे मुंबई हा प्रवासच सुरळीत न होण्याचा "प्रथमग्रासे मक्षिकापात:।" असा योग कधी दरड कोसळून तर कधी शेतकरी आंदोलन अश्या विविध अडचणींनी साधला जायचा कधी कधी तर चाकखुर्चीच्ग्या अनुपलब्धतेमुळेही आमचे उड्डाण चुकते की काय अशी आशा मी बाळगून होतो पण तरीही आमच्या सहचारिणीच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे काही न चालून आम्ही नुआर्कपर्यंत पोचायचेच.।
      यावेळी हा अडचणीचा पहिला टप्पाच टाळण्याची चतुराई  आम्ही दाखवली होती,म्हणजे सरळ पुण्यातूनच आमच्या विमानप्रवासाची सुरवात करायची संधी आता उपलब्ध झाल्यामुळे पुण्याहूनच थेट नूआर्क अशी प्रवास योजना आम्ही केली होती.अर्थात या प्रवासातही मुंबई आम्ही टाळू शकत नव्हतोच आणि तेथेही चांगला चार तासाचा मुक्कामही करावा लागणार होता त्यामुळे अगदीच काळजीमुक्त प्रवास घडण्याचा योग याही वेळी आमच्या नशिबात नव्ह्ता,कारण यंदाही त्या काळात वेधशाळेने पाऊस न पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे पुण्यात भरपूर पाऊस पडत होता.पुणे मुंबई मार्गावर दरडी कोसळून अथवा इतरही काही कारणाने वाहतूक कोंडी होण्याचा उपद्रव आम्हास न झाल्यामुळे त्याची उणीव भरून काढण्याचा पावसानेच चंग बांधला होता 
          आम्ही ज्या दिवशी निघणार होतो त्यादिवशी तर पाऊस अधिकच जोरात पडत होता पण घरापासून लोहगाव विमानतळ येवढेच अंतर जायचे असल्यामुळे व प्रवासाची सर्व सूत्रे आमच्या मुलांवर व सर्वसत्ताधारी त्यांच्या मायवर सोपवून आम्ही म्हणजे मी बेफिकीर होतो.तरीहीकाळजी करण्याचे काम इमानेइतबारे करत होतोच ! आमचे उड्डाण संध्याकाळी साडेपाचचे होते.पुण्याहून मुंबई व पुढे तेथे चार तास थांबून नुआर्कचे जेट एअर वेजचे उड्डाण होते.पुणे विमानतळावर दुपारी३-३० च्या दरम्यान पोचावे म्हणून दोन गाड्या पुण्यातील चिरंजीवांनी सांगून ठेवल्या होत्या.पुणे सोडेपर्यंत सर्व व्यवस्थेचा तो  सूत्रधार होता.जेवणखाण आटोपून आम्ही त्या दोन गाड्या दु.एक वा.पर्यंत येतील या अपेक्षेने सामान वगैरे आवरून बसलो.पण पावसामुळे त्या गाड्या जेथे गेल्या होत्या तेथून परतच आल्या नव्हत्या त्यामुळे त्यांचा येण्याचा विचार नाही असे कळले.शेवटी उबर ओला वगैरेना फोन केले,आमची घरची गाडी  व आणखी कोणाची गाडी मिळते का याची चाचपणी झाली अखेर दोन छोट्या गाड्या मिळाल्या.सुजितचे तो स्वत: त्याची पत्नी व आमचा नातू असे तिघेजण व आम्ही दोघे व आमचे सामान या सगळ्यांना त्या अपुऱ्याच होत्या. पण कसेबसे माणसे व सामान यांचे नियोजन केले व लोहगाव विमानतळावर वेळेत म्हणजे ३-३० ला पोचलो व सुटकेचा श्वास सोडला 
       पण तेथेही आणखी एक अडचण उपस्थित होती.ती म्हणजे पावसाच्या अतिरेकामुळे विमानतळावरील संगणकाचा सर्व्हर बंद होता किंवा अतिशय मंद गतीने चालत होता.त्यामुळे आम्ही तेथे पोचून एक तास झाल्यावरही  फक्त दोन प्रवेश परवाने(बोर्डिंग पास) छापले गेले होते त्या गतीने सर्व प्रवाशांना बोर्डिंग पास मिळायला रात्रीचे बाराच वाजले असते. एकदा संगणकाची सवय लागल्यावर हाताने काम करण्याची संवय सुटलेले विमानतळ कर्मचारी (हाताने काम करायचे नसल्याने)हातावर हात धरून बसले होते आणि अतिशय मंद गतीने बोर्डिंग पास देण्याचे काम चालू होते  चेन्नईचे उड्डाण आमच्याही बरेच अगोदर असल्यामुळे एका अधिकाऱ्यास शहाणपण सुचले आणि परवाने हाताने लिहून देण्यास त्याने फर्मावले आणि कामास थोडी गती आली. .हा इतका वेळ आम्हास रांगेत उभे रहाण्याची पाळी आली असती पण सुदैवाने आम्हाला चाकखुर्च्या अगोदर मिळाल्यामुळे निदान रांगेत उभे राहून खडा पहारा देण्याचे आमचे काम टळले.हाताने काम करण्याची संवय सुटलेले कर्मचारी घाई गडबडीत सुजितचे नाव सुजित श्याम ऐवजी श्याम सुजित अश्या ढोबळ चुका करत होते.शिवाय त्यानंतर चुकीची दुरुस्ती करण्याचाही इतका आळस की पुढील कर्मचाऱ्यापर्यंत तो परवाना तसाच पाठवून चुका करणारी ललना त्याला फोन करून चुकीची दुरुस्ती करण्याची सूचना देत होती.एकूण चटपटीतपणा जो काय असेल तो फक्त वेषभूषा आणि केशभूषा यातच ! तरीही दोन तासानंतर का होईना पण प्रवेशपरवाने हातात पडून विमानात चढण्यासाठी आम्हाला रवाना करण्यात आले.
        विमान मुख्य इमारतीपासून बऱ्याच अंतरावर उभे होते व पाऊस २०१८ मध्येही त्यादिवशी भविष्यात म्हणजे २०१९ मध्ये पडणाऱ्या पावसाची चुणुक दाखवत होता पण याबाबतीत आमची काळजी घेऊन विमानतळ कर्मचारी छत्र्या घेऊन उभे होते आणि त्या छत्र्याही अगदी ऐसपैस ज्यामुळे आम्ही अंगास पाण्याचा एक थेंबही न लागता विमानात शिरू शकलो .
          एवढ्या मोठ्या विमानात अगदी मोजके म्हणजे वीस पंचवीस प्रवासी होते.आमचे उड्डाण अगदी अर्ध्या तासाचेच असल्यामुळे एवढ्या प्रवासासाठी खान पान पुरवण्याची आवश्यकता जेट एअर वेजला वाटली नसावी आणि आम्हालाही तशी आवश्यकता नव्हती.मुंबईत ६-३० ला पोचलो.आता चार तास विमानतळावर बसायचे कारण पुढच्या उड्डाणाची वेळ रात्री १०-३० होती आता चार तास विमानतळावर इकडे तिकडे हिंडायचे ,विमानतळावरच्या चहाची किंमत ऐकून धाडस झाले तर चहापान करायचे   अश्या मनस्थितीतीत आम्ही असताना   आमचा वेळ वाया जाऊ नये अशी सोय पुणेकर विमानतळ कर्मचाऱ्यांनी अगोदरच करून ठेवली होती.आमच्या चाकखुर्ची चालकानी आमच्या अगोदरच्या उड्डाणाची माहिती असल्याने आता तुमचे सामान तुम्हाला पुन्हा परत घेऊन ते पुन्हा सामानाच्या चाळणीतून न्यावे लागेल असा इशारा दिला.हे चालक या सर्व गोष्टींना सरावलेले असल्यामुळे पुण्यात झालेल्या गोंधळामुळे जरी पुण्यात आमचे सामान पुढच्या उड्डाणाकडे वळवले जाईल असे आश्वासन दिले असले तरी तसे होत नाही असे त्यानी अगदी खात्रीपूर्वक सांगितले आणि याचा प्रत्यय सामान ज्या मार्गाने पुढच्या उड्डाणाकडे नेले जात होते त्यातून आमची एक बॅगच बरोबर आमच्या चाकखुर्च्यांच्या समोरच येऊन पडल्यावर आम्हाला आला अर्थातच ते सर्व सामान गोळा करून पुन्हा योग्य ठिकाणी नोंदणीपत्रक तयार करून ते योग्य ठिकाणी जाईल हे पहाण्याचा उद्योग करावा लागला व त्यात दोन तीन तास व्यवस्थित व्यतीत झाले.आम्हा खुर्ची धारकाना काही काळ खुर्ची ऐवजी विमानतळावरील स्वच्छतागृहे व आसनांचा लाभ घेणे येवढाच उद्योग त्या काळात करणे शक्य होते.
           त्यामुळे आमच्याबरोबरचे सर्व प्रवासी सामान वाहून नेणाऱ्या पट्ट्याजवळ थांबले व आपापल्या बॅगा घेऊन पुन्हा चेकिंगसाठी गेले आमच्या मात्र उरलेल्या बॅगा गुप्त झाल्या होत्या,त्यामुळे त्या पुढच्या प्रवासास गेल्या असाव्यात असा समज करून घेण्यात फारसा अर्थ नव्हता.आम्ही मुंबईपर्यंत जेट एअरवेजने आलो होतो व पुढे नेवार्कला मात्र युनायटेड ने जाणार होतो त्यामुळे आमच्या चाकखुर्चीचालकानीही आमचा ताबा त्या उड्डाणाच्या चाकखुर्चीवाल्यांकडे दिला  या हस्तांतरणानंतर बक्षिशी कोणाला द्यायची हा पेच नेहमीप्रमाणे आम्हाला पडला पण तशी अपेक्षा त्यानी न दाखवल्यामुळे आणि शिवाय आम्ही मुलाबरोबर जात असल्याचा फायदा घेऊन या गोष्टी आमच्या अखत्यारीत नाहीत असे दाखवले,त्यानंतर जेट एअरवेजला फोन लावल्यावर आमच्या उर्वरित बॅगा युनायटेडकडे गेल्या असाव्यात पण त्या आमच्याच आहेत याची खात्री करून घ्यावी अशी सूचना मिळाली,त्याची खात्री सुजितने करून घेतल्यावर आमच्या एका बॅगेसह आम्ही युनायटेडच्या खिडकीवर विमानाचे प्रवेशपरवाने (बोर्डिंग पास )घेतल्यावर पुन्हा सुरक्षाचाचणी वगैरे उपचार पार पडून आमची विमानात शिरण्याची वेळच आली व आत प्रवेश करेपर्यंत ११ वाजले व ११/२० ला वैमानिकाने धावपट्टीवर विमान हलवण्यास सुरवातही केली  थोडक्यात मुंबईस द्रुतगति मार्गावरून विलंबित गतीने न जाता विमानाने अतिद्रुत गतीने जाऊनही आम्हास एक तास उशीरच झाला होता त्यामुळे मुंबई विमानतळावर आमचा वेळ कसा जाईल याची काळजी ही अशी घेण्यात आली त्याचे श्रेय पावसास की बंद पडलेल्या आंतरजाल सेवेस की आणखी कोणाला द्यायचे याचा विचार करण्याचे आता कारणच उरले नाही. आणि आता १५ तासाचा तुरुंगवास सुरू झाला होता,
           . कमीतकमी खर्चात विमानप्रवास होण्याच्या दृष्टीने काढलेल्या तिकिटावर केलेल्या विमानप्रवासात आपण किती वेळा स्वच्च्हतागृहाकडे गेलॉ व खाद्यपेये कितीवेळा पुरवली गेली (तेही आपण त्या कालात झोपेच्या गुंगीत नसलो तर ) यापलीकडे आपल्या आसनासमोरील पडद्यावर आपल्याला हवा असणारा एकादा चित्रपट पहायला मिळण्याचा कपिलाषष्ठीचा योग कधी कधी आलाच तर त्या चित्रपटाचे नाव एवढ्याच गोष्टी प्रवासानंतर लक्षात रहाण्याची शक्यता असते.अश्या प्रवासात एकदा एलिझाबेथ एकादशी तर एकदा पिकु पहाण्याचा योग आला होता  या वेळीही असाच काही योग येतो का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याचा विचार केला, माझ्या या योजनेत विघ्न येण्यास एक कारण घडले म्हणजे "आधीच उल्हास (या म्हणीची पुनरावृत्ती कितीदा होणार कुणास ठाऊक ---- कारण आधीपासूनच सगळा उल्ह्हासच होता) तश्यातला प्रकार ! कारण आश्चर्य म्हणजे समोर चित्रपट अथवा इतर गोष्टी दिसत असताना माझ्या समोरील गृहस्थाला आपल्या लॅप्टॉपवर काहीतरी शोध घेण्याची उबळ आली. अर्थात त्याला माझी काही हरकत असण्याचे कारण नव्हते पण त्याच्या लॅप्टॉपचा प्रखर प्रकाश माझ्या डोळ्यावर येऊन मला माझ्या पटलावर काही पहाण्याची  किंवा ते न जमलेच आणि झोप घ्यावीशी वाटली तर ती मिळण्याची शक्यता कमी झाली..सुदैवाने काही वेळाने त्याने तो नाद सोडला हे माझे भाग्य !  तोपर्यंत सौ.ने तिच्या पडद्यावर निम्मा चित्रपट पाहिलाही होता.त्यामुळे आता मला स्वतंत्र चित्रपट किंवा तत्सम काहीतरी शोधून पहाणे प्राप्त झाले.Bend it like Beckham  पाहिला येवढे तरी आठवते.आणि बॅंक चोर अर्धवट पाहिला.मधून मधून झोप लागत असावी.यावेळी चाकखुर्चीवाल्यांनी मेहरबानी केली होती म्हणजे अगदी पुण्यापासून जणु आम्ही चाकखुर्चीवरूनच प्रवास केला की काय असे वाटावे इतक्या तत्परतेने चाकखुर्च्या उपलब्ध होत होत्या अर्थातच नेवार्कलाही तोच अनुभव आला शिवाय तेथे चिरंजीव बरोबर असल्याने सामनाची अदलाबदल करायला सौ.ला वाव नव्हता आणि चाकखुर्चीवाल्याला किती डॉलर द्यायचे हा यक्षप्रश्नही मनात नव्हता. सगळेच बरोबर असल्याने ओला कॅब लगेच मिळून पहाटे सहालाच आम्ही घरी पोचलोदेखील !

Post to Feed
Typing help hide