अवघड काळात निर्णय कसा घ्यावा? कर्ण व श्रीकृष्ण संवाद

हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे.

महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले -

"माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?"

"मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही.
याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही."

"एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला. खरंतर त्यात माझा काहीच दोष नव्हता. पण तरीही त्या गाईच्या धन्याचा शाप मला झेलायला लागलाच."

"द्रौपदीच्या स्वयंवरात तर सूतपुत्र म्हणून चक्क माझी बदनामीच केली गेली."

"कुंतीनेही मला माझ्या जन्माचे रहस्य सांगितले. पण कधी सांगितले? सर्वात शेवटी. तेही तिच्या इतर मुलांना माझ्यापासून वाचवण्यासाठी."

"मला आजवर जे जे काही मिळाले ते फक्त दुर्योधनाच्या औदार्यामुळेच मिळाले आहे.
असे असताना, मी त्याची बाजू घेतोय, हे चुकीचे कसे काय असू शकते?"

** भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले,
"कर्णा, माझा जन्म तुरूंगात झाला होता."

"जन्म झाल्यावर मृत्यू होतो. पण कंसाच्या रूपाने, माझं मरण माझ्या जन्माच्याही अगोदरापासून माझी वाट बघत होतं."

"ज्या रात्री माझा जन्म झाला, त्याच दिवशी माझी आई वडिलांपासून ताटातूट झाली. "

"लहानपणापासून तू तलवारी, रथ, घोडे, धनुष्य-बाणांचे आवाज ऐकतच मोठा झाला आहेस. मला फक्त गायींच्या कळपामध्ये गायींचे हंबरणे ऐकायला मिळाले. त्याच्यासोबत मिळालाय गोमूत्र व शेणाचा वास. मला चालायलाही येत नव्हतं, त्या वयांत माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले आहेत."

"सगळ्यांच्या अडचणींना मीच कारणीभूत आहे, असंच लोकांना नेहमी वाटत असे.
ना मला योग्य शिक्षण मिळाल होतं, ना माझ्याकडे सैन्य होतं. अशा परिस्थितीत मी काय करू शकत होतो? त्यामुळे जरासंधापासून सगळ्यांना वाचविण्यासाठी मला माझा संपूर्ण समुदाय यमुनेच्या किनाऱ्यावरून लांब समुद्रकिनारी हालवावा लागला. पण मला मात्र त्यावरून पळपुटा ही पदवी कायमची चिकटली."

"जेव्हा तुमच्या शिक्षकांकडून तुमच्या शौर्याचे कौतुक केले जात होते तेव्हा मी मात्र शिक्षणाला पारखा झालेलो होतो. मला सांदिपनीं ऋषींच्या आश्रमात प्रवेश कधी मिळाला माहितेय? सोळाव्या वर्षी. हे काय वय आहे शिक्षणाला सुरवात करायचे?"

"तुम्हाला तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करता आलंय. पण जिच्यावर माझं खरंखुरं प्रेम होतं, तिच्याशी मी नाही लग्न करू शकलो. माझं लग्न अशा मुलींशी झालंय की ज्यांना मी पसंत होतो. पण माझ्या पसंतीचे काय? तुरूंगातून सुटलेल्या अभागी स्त्रियांबरोबर मला लग्न करावे लागलंय. ते ही, निव्वळ त्यांच्या आयुष्याचं मातेरं होऊ नये म्हणून. आणि ही जबाबदारी माझ्या गळ्यात का आली? तर मीच त्यांची तुरूंगातून सुटका केली होती. वारे खासा न्याय!!!"

"जर दुर्योधन युद्धात जिंकला तर तुला त्यातले बरेच श्रेय मिळेल. पण धर्मराजाने युद्ध जिंकल्यास मला काय मिळणार आहे? केवळ युद्धाचा दोष मला चिकटणार आहे आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व समस्यांबद्दल बोलताना माझ्याकडे बोट दाखवले जाणार आहे."

"कर्णा, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येकाच्या जीवनात आव्हाने ही असतातच. ही आव्हाने नेहमीच न्याय्य असतात किंवा सोपी असतात असं मी म्हणत नाहीये."

"योग्य काय? व अयोग्य काय? हे आपल्या अंतर्मनाला बरोबर ठाऊक असते. त्यानुसार योग्य तीच प्रतिक्रिया आपणाकडून अपेक्षीत असते. मला एवढेच कळते की, आपल्यावर किती अन्याय झाला, आपली किती वेळा बदनामी झाली वगैरेची सावली आपण घेत असलेल्या निर्णयावर पडली नाही पाहिजे."

"आपण पदोपदी आपल्या मनाला हे सांगितले पाहिजे की, माझ्यावर झालेला अन्याय, मला दुसऱ्यांशी अन्यायाने वागण्याची सवलत देत नाही. आपल्यावर झालेला अन्याय जेवढा मोठा, तेवढ्या प्रमाणात आपल्या मनाला हे समजवण्याची आपली जबाबदारी वाढत असते."

"एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला लागते. आपल्या जीवनांत अवघड प्रसंग येतात व जातात. पण ते प्रसंग आपले नशीब घडवत नसतात; तर त्या अवघड प्रसंगात आपण घेतलेले निर्णय आपले नशीब घडवत असतात."
-----------------------------------------------------------
कोरोना नव्हे तर घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय आपले व भारताचे नशीब घडवणार आहे.