आईची नथ

         एक मंगळसूत्र --तेही दोन सोन्याच्या वाट्या व बाकी काळे मणी असेच --- सोडले तर दुसरा एकच दागिना लहानपणापासून आईच्या अंगावर मला पाहायला मिळाला. तो म्हणजे तिच्या कानातल्या कुड्या. आईचं माहेर कुबेर ! आणि नुसत्या आडनावानेच नाही तर खरोखरीचेच कुबेराचे वैभव तिच्या घरी नांदत होते ! जमीन जुमला भरपूर होता. पण तिच्या लहानपणीच तिचे आई वडील तिला सोडून गेले आणि आई , तिची एक मोठी बहीण आणि मोठा भाऊ या तीन अपत्यांचा सांभाळ तिच्या म्हाताऱ्या आजीलाच करावा लागला. कारण आजोबा तर अगोदरच जग सोडून गेले होते.  
     . कुबेर घराण्यात वारीची परंपरा होती.आईच्या आजोबांनी, वडिलांनी प्रत्येक एकादशीला पंढरीची वारी चुकवली नाही.वडील तर नावाने तुकाराम होतेच पण तितकेच भाविकही होते. त्यामुळे तुकाराम बुवा म्हणूनच प्रसिद्ध ! पण आजी मात्र ढालगज होती.या तीन अपत्यांचा सांभाळ त्यांच्या आईवडिलांच्या पश्चात आणि घरात पुरुष माणूस नसताना या बाईन मोठ्या करारी बाण्यान केला.घोड्यावर स्वार होऊन ही म्हातारी एकटी सर्व कुळांकडून  खंड वसूल करायची. पण या करारी म्हातारीनं नातवापुढे मात्र हार खाल्ली होती . तसा मामा खरं तर अगदीच गरीब म्हणजे शामळूच म्हणावा असा!  त्याचं लग्न आज्जीनं लवकरच लावून दिलं होतं.. पण  जहांबाज आज्जीचा अंदाज चुकला आणि  सून तशी नात्यातलीच पण फारच पाप्याचं पितर निघाली लग्न झाल्यावर सुधारेल असं वाटलं होतं पण कसले काय, वर्षभरातच तिनं राम म्हटला.
        त्यानंतर आमच्या भोळ्या सांब मामाला तो आषाढी वारीला गेल्यावर कुणी गठवलं कुणास माहीत आणि आपली न खपणारी पोरगी त्याच्या गळ्यात बांधली्, ही मामी मात्र एर्कदम खडूस निघाली. तिनं जहांबाज आजेसासूलाही गुंडाळून ठेवलं. आमच्या मामा-मामीची जोडी अगदी आजच्या सासू-सून मालिकांत दिसणाऱ्या आपल्या बायकोच्या होला हो करणारा नवरोबा आणि त्याची जहांबाज बायको अशीच होती, माझी आई भावंडात सगळ्यात धाकटी.त्यामुळे तिचे लग्न होईपर्यंत त्या खडुस मामीने मामाचा आणि सगळ्या घराचा ताबा घेतला होता.लग्नात मामाने सगळे दागिने आजीच्या हट्टामुळे माझ्या आईच्या अंगावर चढवले होते पण लग्न होताच ते सगळे पॉलिश करायला म्हणून परत नेले ते त्यानंतर कोणालाच पहायला मिळाले नाहीत.. वडिलांनी कधीच त्या दागिन्यांचा मोह धरलेला नसल्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे अगदी निरिच्छपणे दुर्लक्ष केले. अर्थात हा सगळा इतिहास आईकडूनच मला कळला. त्यामुळे सणावारी किंवा हळदीकुंकवाच्या समारंभास जायचे झाल्यास आई मोत्याच्या कुड्या तेवढ्या कानात घालायची.
              लग्नानंतर काही दिवसांनी काढलेला आई आणि वडिलांचा एक फोटो घरात होता. तो अगदी टिपिकल जत्रेत काढलेला फोटो होता-- म्हणजे पार्श्वभूमीस एका मोठ्या राजवाड्याचे (बहुधा आमच्या संस्थानाचे असावे) दृश्य, त्यापुढे खुर्चीवर वडील बसलेले, त्यांच्या डावीकडे आई मान खाली घालून उभी राहिलेली, तिच्या शेजारी एका टेबलावर पुस्तके ठेवलेली, आणि त्या पुस्तकांवर तिने हात ठेवून आपले सरस्वती हे नाव सार्थ केलेले. या फोटोत या कुड्यांव्यतिरिक्त आणखी एक दागिना तिच्या अंगावर दिसत होता, तो म्हणजे टपोऱ्या मोत्यांची नथ. मला समजू लागल्यावर मी एकदा आईलाच विचारले, "अग आई, तुझी ही नथ कुठे गेली? " यावर आईने नेहमीप्रमाणे, "ते मला नाही माहीत. ह्यांनाच जाऊन विचार. " असे उत्तर दिले. अर्थात वडिलांना विचारण्याचे धाडस माझ्याच्याने काही झाले नाही. माझे वडील म्हणजे अगदी जमदग्नीचा अवतार होते आणि त्यांचा हात बराच कडक होता. त्यामुळे बऱ्याच वेळा माझ्या हातून चूक झाली आणि त्यांचा मार खाण्याची पाळी आलीच तर त्यांनी हात उगारलेला माझ्या पाठीला अथवा पार्श्वभागाला लागण्यापूर्वीच मी, "दादा, घाई लागली--- " असा आकांत सुरू करायला लागलो की त्यामुळे त्याना हसू फुटून ते चड्डी ओली करण्यापूर्वी माझी रवानगी घराबाहेर करायचे. या सगळ्या पार्श्वभूमीमुळे आईच्या नथीचे रहस्य त्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी त्यांना काही विचारणे ही गोष्ट माझ्या कुवतीबाहेरची होती. शिवाय त्या गोष्टीस माझ्या लेखी फारसे महत्त्व त्या काळात तरी नव्हते.
           पुढे कधी तरी बोलता बोलता वडिलांच्याच तोंडून कळले की ती नथ बरेच दिवस आई घालत होती, पण एकदा त्यांना पैशाची फारच निकड पडली तेव्हा ती नथ त्यांना गहाण टाकावी लागली आणि त्यावर त्यांनी शंभर रुपये घेतले होते. त्या काळात शंभर रुपयाची किंमत आजच्या भावाने किती असेल याचा विचारच करायला हवा कारण वडिलांच्या लग्नात सोने सोळा रुपये तोळा होते, आणि वडिलांना पगार महिना आठ रुपये होता. आश्चर्य म्हणजे हे शंभर रुपये त्यांनी ज्यांच्याकडून घेतले होते ते त्यांचे प्रत्यक्ष गुरूच होते. त्यांनी माझ्या वडिलांना हायस्कूलमध्ये शिकवले होते. औन्ध संस्थानातील हे हायस्कूल श्री. श्री. विद्यालय म्हणून प्रसिद्ध होते. प्रसिद्ध म्हणण्याचे कारण म्हणजे याच विद्यालयात साने गुरुजी, ग. दि. माडगूळकर असे नामवंत विद्यार्थी काही काळ शिकत होते. त्याच विद्यालयात आता वडीलही शिक्षक होते. त्यांचे गुरुजी म्हणजे प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक श्री. मधुकर पाठक यांचे वडील. श्री गोपाळराव पाठक.
        मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते की प्रत्यक्ष आपल्या गुरुवर्यांकडे माझ्या वडिलांनी पैसे कसे काय मागितले. किंवा गुरुवर्यांनीच आपला विद्यार्थी अडचणीत आहे म्हणून त्याला न मागताच पैसे दिले असावेत अशीही शक्यता आहे. पण त्याचबरोबर त्यासाठी नथ गहाण ठेवून घेण्याइतका परकेपणा का दाखवला? किंवा त्या काळच्या लोकांच्या स्वभावाचाच हा भाग होता की काय, की नातेसंबंधातही ते व्यवहाराबाबत दक्ष असत? अगदी माझ्या आत्याच्या यजमानांकडून घेतलेल्या पैशांवर वडिलांनी व्याज दिलेले मी त्यांच्याच तोंडून ऐकले आहे. पाठक मास्तरांनी (त्यावेळी मास्तर हाच शब्द आदरार्थी होता ) वडिलांना एवढे मात्र सांगितले होते की त्यांनी (म्हणजे माझ्या वडिलांनी) केव्हाही १०० रु. घेऊन यावे आणि ती नथ सोडवून न्यावी. मात्र वडिलांची मिळकत इतकी कमी होती की एवढी रक्कम शिल्लक टाकून आपल्या बायकोची नथ सोडवून घ्यायचे त्यांना त्यानंतर अनेक वर्षे गेली तरी जमले नव्हते.
       त्यानंतर पाठकमास्तरही सेवानिवृत्त झाले. ते बरीच वर्षे भारताचे हाय कमिशनर आणि आमच्या औंधच्या महाराजांचे चिरंजीव, बॅ. अप्पासाहेब पंत, यांच्या मुलांचे खाजगी शिक्षक होते, आणि त्यांच्याबरोबर परदेशातही गेले होते. ते नंतर परत आले आणि आपल्या चिरंजीवांबरोबर पुण्यात राहू लागले. आणि त्याच सुमारास म्हणजे १९५८ च्या जून महिन्यात मला फर्गसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मी ११वीची परीक्षा देईपर्यंत आमची परिस्थिती पाहता कॉलेजला प्रवेश घेणे हे आपल्याला शक्य माही असे मी मनोमन ठरवले होते कारण वडिलांचा तुटपुंजा पगार. मोठे कुटुंब आणि मी सर्वात मोठा मुलगा अशी परिस्थिती. म्हणजे मॅट्रिक होताच नोकरी करून घर संभाळणे किंवा निदान स्वत:ला तरी संभाळणे अशीच अपेक्षा माझ्याकडून होती. मोठी बहीण नोकरी करत होती पण तिचाही पगार कोठे लुप्त होत होता कळत नव्हते, त्यामुळे चांगले मार्क पडले तरी आणि आपल्याला कॉलेजला जायला मिळावे अशी इच्छा असली तरी  तशी शक्यता कमी वाटत होती. 
         पण माझी किंवा आमच्या कुटुंबाची भाग्यदेवता अचानक आमच्यावर प्रसन्न झाली, म्हणजे आमच्या त्या दुर्लक्षित गावाचे आणि त्या विद्यालयाचे भाग्यच जणू फळफळले. स्थापना झाल्यापासून त्या विद्यालयात न घडलेला चमत्कार घडला आणि त्या विद्यालयाचा मुलगा एस. एस. सी. च्या (म्हणजे त्यावेळीची ११वी) परीक्षेत पहिल्या तीस नंबरात आला. आणि तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो. 
         त्यावर्षीपासूनच पहिल्या तीस नंबरच्या मुलांना दरमहा पन्नास रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची योजना निघाली आणि पुढे प्रोफेशनल कोर्ससाठी दरमहा शंभर रु. अशी. त्यावेळच्या परिस्थितीत ही रक्कम मला कॉलेजात प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पुरा करायला पुरेशी होती आणि त्यामुळे मला फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेता आला. प्रवेशासाठी जाताना अर्थातच आमच्याकडे पैशाचा ठणठणाटच होता. इकडून तिकडून काही पैसे गोळा करून आम्ही महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलो. सुदैवाने माझे एक दूरचे काका त्यावेळी पुण्यात होते आणि फर्गसनच्या त्यावेळी उपप्राचार्य असणाऱ्या प्रा. डॉ. माइणकरांचा आणि त्यांचा परिचय होता. त्यामुळे  आम्ही प्रवेश घेण्यापूर्वी त्यांच्या घरीच गेलो आणि त्यांनी घरीच प्रवेश अर्जाचा नमुना मागवून तो माझ्याकडून भरून घेतला. त्याबरोबर त्यावेळी महाविद्यालयाची आणि वसतिगृहाची अशी एकूण फी १७६ रु. भरायला सांगितले. पण माझ्या वडिलांकडे तेवढेही पैसे त्यावेळी नव्हते..प्रा. माइणकरांनी, " मग तुमच्याकडे आता किती पैसे आहेत? " असे विचारल्यावर त्यांच्याकडे फक्त २१ रु. निघाले. त्यावर त्यांनी पण "काही हरकत नाही. बाकीचे पैसे नंतर पाठवून द्या. " असे म्हटले एस.एस.सी.ला पहिल्या तिसात आलेला विद्यार्थी आपल्या  महाविद्यालयात प्रवेश करतो ही गोष्ट कदाचित त्याना  भूषणास्पद वाटत असावी असा दिलासा माझ्या वडिलांना मिळाल्यामुळे मी फर्गसोनियन झालो.  
       अशा प्रकारे प्रवेश आटोपल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या गुरुंकडे म्हणजे श्री. मधुकर पाठक यांचे वडील श्री. गोपाळराव पाठक यांच्याकडे मला नेले. १९५५-५६ च्या सुमारास श्री. मधुकर पाठक चित्रपटक्षेत्रात धडपड करत पुण्यात स्थायिक होण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ते एरंडवण्यात म्हणजे फर्गसन महाविद्यालयापासून चालत जाण्याच्या अंतरावर रहात होते. असेही असेल की त्यावेळी तेवढे अंतर चालत जाणे म्हणजे काही अवघड गोष्ट आहे असे आम्हाला वाटत नव्हते. कारण रिक्षाने जाणे परवडतही नव्हते. आम्ही कोठलीही पूर्वकल्पना न देता एकदम श्री. पाठक यांच्या घरातच शिरलो तेव्हा मधुकर पाठक चित्रपटाच्या कामासाठी बाहेर गेलेले होते पण घरात त्यांचे वडील, मातू:श्री व बाकी कुटुंबीय होते आणि त्यांनी आमचे अगदी आपुलकीने स्वागत केले.
     मी परीक्षेत मिळवलेल्या यशाचे त्यांनाही मोठे कौतुक वाटले आणि त्यांच्या शिष्याचा मी मुलगा याचा अभिमानही त्यांच्या चर्येवर दिसत होता. "गजानन, आता जेवूनच जायचे बरंका" असा प्रेमळ आग्रह वडिलांचे गुरू आणि गुरुपत्नीने केला आणि तो मोडणे आम्हाला शक्य नव्हते. तेवढ्यात श्री. मधुकरही आले. ते त्यावेळी 'मुक्काम पोस्ट ढेबेवाडी'च्या जुळवाजुळवीत होते. वि. गो. नमाडे तो चित्रपट काढत होते. आल्यावर त्यांच्याशीही गप्पा झाल्या. ते माझ्या वडिलांचे विद्यार्थी आणि माझे वडील त्यांच्या वडिलांचे विद्यार्थी असा गुरुशिष्य मिलाप त्यावेळी झाला. जेवणानंतर निघताना सर्वच पाठक कुटुंबीयांनी पुन्हा येण्याचा प्रेमळ आग्रह केला. बाहेर पडताना पाठक मास्तरांनी पुन्हा एकदा माझ्या वडिलांना आठवण करून दिली, "गजानन, तुझ्या बायकोची नथ माझ्याकडे आहे बरंका आणि अजूनही केव्हाही १०० रुपये देऊन ती घेऊन जाणे". माझ्या प्रवेशासाठी उरलेले दीडशे रुपये गोळा कसे करायचे याच चिंतेत वडील असल्याने बायकोची नथ आपल्या गुरुवर्यांकडेच राहिली तरी त्यांना त्याची फारशी दिक्कत नव्हती. नाहीतरी त्या नथीशिवाय आईने सगळा संसार पार पाडला होताच.
      त्यानंतर मी बरेचदा पाठकांकडे गेलो. बहुतेक वेळा पाठक गुरुजी त्यांच्या पत्नी, त्यांच्या सूनबाई (श्री. मधुकर यांच्या सौ. ) आणि छोट्या नाती घरात असत. कधीही गेलो तरी ती प्रेमळ माणसे मला जेवल्याशिवाय जाऊ द्यायची नाहीत. आणि त्याचबरोबर पाठक मास्तर शेवटी भरतवाक्याप्रमाणे म्हणायचे, "तुझ्या आईची नथ आमच्याकडे आहे. केव्हाही शंभर रुपये दे आणि घेऊन जा. तसा मी गजाननला शब्द दिला आहे. "
      त्यावेळी मला एस. एस. सी. ला गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळाली होती आणि पहिल्या सहा महिन्याची शिष्यवृत्ती एकदम तीनशे रुपये हाती पडल्यावर एकदम मला पाठक मास्तरांचे ते शब्द आठवले आणि आईची नथ आता आपल्याला त्यांच्याकडून परत मिळेल कारण त्याना द्यावयाला शंभर रु. आता आपल्याकडे आहेत हा विचार मनात चमकला. तसाच तडक त्यांच्याकडे गेलो त्यांच्या पायावर मस्तक ठेवले आणि माझ्या शिष्यवृत्तीविषयी सांगितले. त्यांना खूप आनंद वाटला आणि मी आलेल्या पैशातून काही भेटवस्तू दिल्याचाही त्यांना अतिशय अभिमान वाटला आणि कौतुकही वाटले आणि "अरे आता तुझ्या आईची नथ तुला घेऊन जायला काहीच अडचण नाही. " असा त्यानीच विषय काढल्यावर मीही त्यांना त्याचसाठी आलो असल्याचे सांगून शंभर रुपये त्यांच्या हातावर ठेवताच माझ्या वडिलांच्या गुरुवर्यांनी ताबडतोब आतल्या खोलीत जाऊन एका गुलाबी कागदात गुंडाळलेली ती इतिहासप्रसिद्ध नथ बाहेर आणली आणि माझ्या हातात ती ठेवत म्हणाले, "माझ्या गजाननच्या मुलाने त्याच्या आईची नथ सोडवली आणि तो ती घेऊन जातोय याचा मला अभिमान आणि आनंद आहे. " मी पुन्हा त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि आनंदाश्रू आवरत बाहेर पडलो.त्यानंतर माझ्या आईने ती नथ पाहून व नाकात घातल्यावर तिच्या व वडिलांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंदाचे वर्णन करणे मला शक्य नाही.माझ्या आयुष्यातील अतिशय मोठ्या आनंदाचा क्षण तो होता हे निश्चित !
     या गोष्टीला अनेक वर्षे झाली आणि त्यातील माझ्याव्यतिरिक्त इतर सर्व पात्रे काळाच्या पडद्याआड गेली, मात्र अजूनही पाठक मास्तरांनी आपल्या शिष्याकडून नथ गहाण का ठेवून घेतली, हे कोडे मला उकलले नाही.   मी नथ परत घ्यायला गेलो त्यावेळी त्यानी दिलेल्या त्या शंभर रुपयाची किंमत निदान दसपटीने तरी वाढली असताना आपण दिलेला शब्द पाळण्यासाठी शंभरच रुपये घेऊन ती त्यानी परत केली  आजच्या  नियत बदण्याच्या जमान्यात ही गोष्ट सांगण्यासारखी आहे असे मला वाटते.