एप्रिल १७ २०२०

ऋणं कृत्वा --- !

        चार्वाकाचे सर्वात सुप्रसिद्ध वाक्य म्हणजे " ऋणं कृत्वा घृतं पिबेत् "  ज्यामुळे तो जास्त प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहे. या वाक्यामुळे चार्वाक खरे तर महान अर्थशास्त्रज्ञ समजला जायला हवा.कारण ज्या भारतात चार्वाक जन्मला त्या भारतातच नव्हे तर जवळजवळ सर्वच देशांचा अर्थव्यवहार "ऋणं कृत्वाच चालला आहे.शिवाय आपल्यावर ऋणाचा भार असूनही आपण इतर देशांना अगदी रशियासारख्या-- सुद्धा ऋण द्यायला कचरत नाही. आणि त्यात कसा आपलाच फायदा आहे हे पटवणारेही अर्थशास्त्रज्ञही आहेत.किंग फिशर चे मल्ल्या,वगैरेनी हे आपले ब्रीदवाक्यच मानले आहे. त्या बाबतीत ते चार्वाकाचे बाप शोभतील कारण चार्वाकाने ऋण परत फेडू नये असं काही सांगितलं नाही.         
          मला मात्र कुणाकडे पैसे मागायचे म्हणजे अगदी संकट वाटते पण माझे काही मित्र या विषयात अगदी तज्ञ आहेत.व त्यांना नाही म्हणणेही मला अवघड जात असल्याने माझे दुहेरी नुकसान होते. कारण त्यांच्याकडून त्यांनी घेतलेले माझे पैसे मागायलाही मला अवघड जाते.
    मी नुकताच नोकरीला लागलो तेव्हां माझा पहिला पगार त्यावेळी रोखीनेच हातात पडला आणि त्या नोटांचा आनंददायक स्पर्श मी पुरता घेतो न घेतो तोच अतिशय केविलवाणे तोंड करून मला कधी पाण्याचा पेला किंवा चहाचा कप आणून देणारा एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी माझ्याकडे आला आणि म्हणू लागला ,"साहेब,जरा नड होती " त्याची नड कसली हे मला लक्षात आले नाही त्यामुळे मी अगदी भॉळ्या भावनेने "कसली नड ?" असे विचारले.खरे तर असा प्रश्न आपल्याला ऐकूच आला नाही असे दाखवून झपाट्याने पुढे जायचे असते हा धडा मी गिरवला नव्हता.त्यामुळे लाजत लाजत " जरा पाच रुपये हवे होते.बायको आजारी आहे म्हणून "त्याचाही पगार आजच झाला असताना त्याला माझ्या पैशाची गरज का भासावी हे मला समजेना त्यामुळे मी जरा तावातावानेच "अरे तुझा पगार आजच झाला ना?" असा त्याच्यावर खेकसलो."तो सगळा संपला की साहेब ,ज्याची त्याची देणी होटी ते सगळे वसूल करून गेले,म्हणजे या पगाराचा वायदा त्याने इतक्या जणांना केला होता की आता त्याच्याजवळ काहीच शिल्लक नव्हते आणि आता हा महिना कसा काढणार होता मला समजेना.अर्थात त्याचा महिना कसा जाणार यापेक्षा माझा महिना कसा जाणार याची काळजी मला करणे भाग होते. त्यावेळी पाच रुपयेही खूपच मौल्यवान असल्याने शेवटी सौदा दोन रुपयावर तुटला.अर्थात दोन रुपये ही त्याच्या दृष्टीने फारच क्षुल्लक रक्कम असल्याने ती परत करण्याचा सवालच नव्हता.
      सोलापूरला बदली होऊन गेल्यावर मात्र माझा दर्जा जरी फारसा वाढला नसला तरी- कर्मचाऱ्यांचा मात्र एकदम वाढलेला दिसला.कारण सुरवातीचे काही दिवस जाऊन जरा घसट वाढल्यावर तेथील कर्मचाऱ्याने अशीच मागणी केल्यावर पूर्वानुभवानुसार पाहिजे असतील चार दोन रुपये असे वाटून मी विचारणा केल्यावर मात्र त्याने एकदम पन्नास रुपयाची मागणी केली व मला मोठ्याच कठिण पेचात टाकले.मी जरा कांकू केल्यावर त्याने माझ्यावर उपकार केल्यासारखे दाखवून आपली मागणी तीस रुपयावर आणून ठेवण्याचे सौजन्य दाखवले.सुदैवाने ही रक्कम हप्त्याने का होईना परत करण्याचा प्रामाणिकपणा मात्र त्याने दाखवला.अर्थात या प्रामाणिकपणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली त्याने मला इतके वाकवले की त्यानंतरही माझ्याकडे अगदी बॅन्केतील खात्यातून काढावे तितक्या नियमितपणे चाळीस पन्नास रुपयांची मागणी नियमितपणे अगदी माझी बद्ली होईपर्यंत नोंदवण्याची दक्षता दाखवली.(त्यावेळी पंतप्रधान बॅन्क खाते योजना अमलात आली नव्हती) भाग्य माझे की बदली झाल्यावर देखील मनिऑर्डरने पैसे पाठवून देण्याची विनंती करण्याची शक्कल त्याला सुचली नाही.
    सोलापुरातच एक प्राध्यापक मित्र मात्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटले की अगदी हसत हसत "काय कसं काय ?" असं विचारत व त्यावर "ठीक आहे" हे ठरलेले उत्तर मिळाल्यावर एकदम ," मग काय एकादी फायवर मिळेल का ?" असं एकदम विचारत.या फायवरचा अर्थ पहिल्यांदा माझ्या टाळक्यात शिरलाच नाही पण मग हाताची पाच बोटे दाखवत रुपयाची खूण करत त्यांनी अर्थ स्पष्ट केला.अर्थात त्यावेळी खिशात तेवढेही पैसे असण्याची क्वचितच शक्यता असे पण चुकून पाचाची नोट हाताला लागलीच तर ती त्यांच्या खिशात जात असे. मात्र पगार झाल्यावर ते इमाने इतबारे परत करत असत हे मात्र खरे.
       एकूणच जागतिक अर्थव्यवहार पाहिला तर आमच्यासारखे पगारदार ,किंवा अगदी हातावर पोट असणारे मजूर सोडले तर सर्व व्यवहार हे कर्जावरच चालले आहेत असे दिसते."ऋण काढून सण करणे " म्हणजे काहीतरी अयोग्य वागणे असे आमच्यावर लहानपणापासून बिंबवण्यात आले."अंथरूण पाहून पाय पसरावे " याचाही अर्थ तोच. याउलट अमेरिकेत एकदा नोकरीला लागला की सगळे स्र्थ्स्स्रोत "कर्ज घ्या कर्ज असे मागेच लागतात जणु आणि कोणतीहीही व्यक्ती सगळ्या गोष्टी कर्जावर घेऊन प्रत्येक महिन्यात त्या कर्जाचे हप्ते भरते. "गुड डॅड बॅड डॅड नावाच्या पुस्तकात त्या लेखकाने हाच धडा गिरवायला सांगितला आहे.आता आपल्याकडेही तोच प्रघात सुरू झाला आहे. मात्र आपल्याकडे सामान्य माणसाला कर्ज देताना बॅंका इतके निर्बंध घालतात की बरेचदा  ते कर्ज   नको म्हणण्याची पाळी येते पण त्याचबरोबर असामान्य व्यक्तींना मात्र "कर्ज घ्या "असे त्या मागे लागतात कर्ज फेडणे अशक्य झाल्यावर देश सोडून पळून जाणे ज्याना जमणार नसते ते बिचारे आत्महत्या करतात कर्ज देण्याच्या अतिरेकामुळे आणि त्यातील अनियमिततेमुळे बॅंका बुडतात आणि ज्या सामान्य लोकांनी पै पै करून पैसा जमा केलेला असतो ते आपलाच पैसा मिळवण्यासाठी बॅंकांसमोर रांगा लावतात आणि त्याना कामापुरते किंवा त्याहूनही कधी कधी कमीच पैसा मिळण्याचे भाग्य लाभते.
          .देशसुद्धा कर्जबाजारीच  असतात .मधून मधून कर्जरोखे काढून आमच्यासारख्या कर भरणाऱ्यांना अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून ते खपवून त्यावर देशाचा कारभार ते चालवतात  आणि अश्या पद्धतीने एकादा देश दिवाळखोर झाला तर इतर देश त्याला कर्ज देऊन त्याचा कर्जातून गळा सोडवतात अर्थात ते तेवढ्यापुरते संकट टाळणे असते थोडक्यात काय चार्वाकाला शिव्या घालणारे प्रत्यक्षात त्याच्या वचनाचाच आदर्श समोर ठेऊन वागत असतात..


Post to Feedरिझर्व्ह बँक आणि सरकार
धन्यवाद !

Typing help hide