ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - ३

सामुद्रीय जीवशास्त्रज्ञ सिल्व्हिया अर्लनि काही मोजक्याच पत्रकारांना तातडीनं घरी बोलावलं. 

सिल्व्हिया अर्ल.  वय वर्षे ८५.  सामुद्रीय जीवशास्त्रातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या शास्त्रज्ञ, लेखिका आणि वक्त्या.  २५ - ३० राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पुरस्कार आणि शंभरच्यावर प्रकशित साहित्य त्यांच्या नावावर जमा होतं. 

"तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती नसेल परंतु चीननं आज एक मोठी आगळीक केली आहे.  कोव्हिड १९ साठी औषध तयार करण्याच्या नावाखाली प्रशांत आणि हिंदी महासागरातल्या सगळ्यात मोठ्या प्रवाळ भिंती नष्ट करण्याचा त्यांनी घाट घातला आहे."  सिल्व्हिया अर्ल पोटतिडिकीनं पत्रकारांना सांगत होत्या.
 
"काय झालंय मी तुम्हाला थोडक्यात सांगते.   आज जागतिक आरोग्य संघटनेच्या एका महत्त्वाच्या टेलिकॉन्फरन्समधे चीननं मागणी केली आहे की करोना व्हायरसच्या उपचारासाठी त्यांना ग्रिफित्शिया नावाच्या लाल शेवाळांची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे.  आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रशांत आणि हिंदी महासागरातल्या दोन जागा निश्चीत केल्या आहेत.  त्यांचं म्हणणं आहे की या दोन्ही ठिकाणी ग्रिफित्शिया खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून त्यांना या दोन ठिकाणी समुद्र तळ उकरण्याची तातडीनं परवानगी हवी आहे. आता यात सगळ्यात मोठी गोम अशी आहे की हे ग्रिफित्शिया शेवाळं, कोरल रीफ हॅबिटॅटस म्हणजे मोठमोठ्या प्रवाळ भिंतींवर उगवतं.  अर्थातच हे शेवाळं काढलं जात असताना, प्रवाळ सोडून नुसतं हे शेवाळं काढता येणं शक्यच नसतं.  चीनला ग्रिफित्शिया काढण्यासाठी ही परवानगी दिली गेली तर भल्या प्रचंड प्रवाळ भिंती कायमच्या नामशेष होण्याची भीती आहे.  चीननं हे उत्खनन करून शेवाळ काढण्याच्या प्रस्तावात हा प्रवाळांचा विषय खूबीनं टाळलाय.  माझ्या मते ही शुद्ध फसवाफसवीच आहे. " पत्रकार भराभर सिल्व्हियांचं बोलणं लिहून घेत होते.

"आपल्या वातावरणातलं समुद्राचं महत्त्व अजूनही आपल्या लोकांना का समजत नाहीये हेच मला कळत नाही.  पर्यावरणीय ऱ्हासामुळेच आज कोव्हिड सारखा संसर्ग मानवतेवर कोसळला आहे.  आता याचा निःपात करण्यासाठी  पुन्हा पर्यावरणाचाच ऱ्हास करण्यात कुठचा शहाणपणा आहे? समुद्रांकडून शेकडो वस्तू आणि सेवांचा पुरवठा मनुष्याला केला जातो. कार्बन डाय ऑक्साईडचं सिक्वेस्ट्रेशन ही समुद्राकडून मानवजातीला मिळणारी सर्वात मोठी सेवा आहे. यात खंड पडला तर आपलं अस्तित्वच शिल्लक राहणार नाही.  आपण समुद्रांचा असा ऱ्हास होऊ देता कामा नये.  आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचा आपण थोडा तरी विचार केलाच पाहिजे. " सिल्व्हिया अर्ल फुटफुटून बोलत होत्या.

"आम्ही जगातल्या शंभर सगळ्यात मोठ्या शास्त्रज्ञांनी मिळून आत्ताच थोड्या वेळापूर्वी, संयुक्त राष्ट्रसंघाला उद्देशून एक पत्र तयार केलं आहे.  यात चीनला अशी परवानगी देण्यानं भविष्यात उदभवू शकणाऱ्या धोक्यांची जाणीव करून दिली आहे.  वातावरण बदलाच्या दृष्टिकोनातून हे पाऊल अतिशय चुकीचं असेल आणि आम्हा सर्व शास्त्रज्ञांचा अशा प्रकारच्या परवानगीला पूर्ण विरोध आहे असंही या पत्रात सांगितलं आहे.  मी या पत्राची एक एक प्रत तुम्हाला सगळ्यांना देते आहे आणि त्याला तुमच्या माध्यमांमधून योग्य ती प्रसिद्धी द्या    अशी माझी आणि माझ्या बरोबरच्या सर्व शास्त्रज्ञांची तुम्हाला विनंती आहे.  या पत्राशिवाय जगातल्या सर्व शास्त्रज्ञ समुदायाला आणि पर्यावरणीय क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना, अशीच विनंती ट्विटरद्वारे संयुक्त राष्ट्रसंघ, बीबीएनजे आणि जागतिक आरोग्य संस्थेकडे पाठवायला आम्ही सांगितलं आहे.  हा लढा आम्ही अगदी  निकरानी आणि शेवटपर्यंत लढायचं ठरवलं आहे.  जगातल्या सर्व शास्त्रज्ञांचा आणि पर्यावरण तज्ञांचा याला कडाडून विरोध आहे."   सिल्व्हिया अर्लनी शंभर शास्त्रज्ञांच्या सह्या असलेल्या पत्रकाची एक एक प्रत एकेका पत्रकाराला दिली.   

***

ज्यावेळेला डॉक्टर मॅककार्थी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून बाहेर पडत होते, त्याच वेळेस सीआयएचे संचालक रिचर्ड केंडाल आत प्रवेश करते झाले. 
"रिचर्ड मी तुला इतक्या तडकाफडकी बोलवायचं कारण तुला माहिती आहे? " अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रिचर्ड केंडाल बरोबर हस्तांदोलन करता करता विचारलं. 
"अध्यक्ष महोदय अगदी खरं सांगू का, माझी बुद्धीमत्ता कायम माझा पाठलाग करत असते आणि मी तिला कायमच गंडवत असतो. " रिचर्डनी एक डोळा मिचकावत म्हटलं आणि ते आणि राष्ट्राध्यक्ष दोघेही त्यावर खळखळून हसले. 
"रिचर्ड, काल सकाळी जागतिक आरोग्य संघटनेच्या कॉन्फरन्समधे चीननं प्रशांत महासागरात आणि हिंदी महासागरात ग्रिफित्शिया नावाचं शेवाळं काढण्यासाठी परवानगी मागितली आहे.  तुझं याच्यावर काय मत आहे?" राष्ट्राध्यक्षांनी सरळ मुद्द्याला हात घातला. 
"अध्यक्ष महाराज आमच्या कडेही ही बातमी कालच आली आणि आम्ही लगेच त्याच्यावर एक टाचण तयार केलंय आणि  आत्ता  तुम्हाला दाखवायला मी हे माझ्या बरोबर घेऊन आलोय." 
"उत्तम.  पुढे बोला. "
"आमची अगदी खात्रीलायक माहिती अशी आहे की हे ग्रिफित्शिया वगैरे सगळं नाटक आहे.  चीनला प्रशांत महासागरात एक आणि हिंदी महासागरात एक असे दोन संरक्षण तळ   बनवायचे आहेत.  या दोन्ही जागा संरक्षणाच्या दृष्टिने अतिशय मोक्याच्या आहेत.  या ठिकाणी उभ्या करायच्या प्लॅटफॉर्म्सची  बांधणी चीनच्या नाविक जहाज बांधणी कारखान्यात मागच्या काही महिन्यांपासून सुरू आहे. हे अतिशय आधुनिक प्लॅटफॉर्म्स आहेत आणि यांवर अत्याधुनिक रडार आणि मिसाईल यंत्रणा बसवण्यात येणार आहे असं समजतं."

"आणि या प्लॅटफोर्म्सचा उद्देश? " राष्ट्राध्यक्ष.

"प्रशांत महासागरातल्या तळावरून जेव्हा पाहिजे तेव्हा अमेरिकेला सरळ लक्ष्य करता येईल आणि हिंदी महासागरातून भारत,      मध्य पूर्वेचे देश आणि आफ्रिका सगळेच टप्प्यात येतात. उद्देश क्रमांक दोन या दोन्ही महासागरातून होणारी मालवहातूक ते जेव्हा पाहिजे तेव्हा रोखू शकतात" रिचर्डनी सांगितलं.

"हं... आपली भूमिका? "

"एक तर राजकीय वजन वापरून कुठल्याही परिस्थितीत आपण चीनला ही परवानगी मिळू देता कामा नये. दुर्दैवाने चीनला अशी परवानगी मिळालीच तर अतिशय वेगवान रितीनं ते या प्लॅटफॉर्म्सची उभारणी करतील. त्यामुळे होणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर बारिक लक्ष ठेवून त्यानुसार अतिशय चपळ रणनिती आखावी लागेल.  तिसरी गोष्ट म्हणजे तातडीनं आपला हवाई बेटांवरचा संरक्षण तळ आपण मजबूत केला पाहिजे. उच्च प्रतीची मिसाईल यंत्रणा तिथं बसवली पाहिजे.  चौथी गोष्ट म्हणजे चीनवरचं आपलं आयातीचं परावलंबित्व आपण कमी केलंच पाहिजे."
"ठीक रिचर्ड, समजलं.  आणखी एक.  चीनचे हे प्लॅटफॉर्म कार्यरत होण्याआधीच त्यावर घातपात घडवून ते उडवून दिले तर?"
" हं... अगदी नक्कीच विचार करता येण्यासारखी ही सूचना आहे सर.  प्रशांत महासागरातली त्यांनी निवडलेली जागा ही ज्वालामुखींच्या रिंगणाच्या, रिंग ऑफ फायरच्या मध्यभागी आहे.  तिथे ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामी काहीही घडू शकतं. आवश्यकता पडली तर..." दोघेही यावर दिलखुलास हसले. 

***

तिन्हीसांजा उलटून जाऊन अंधार पडला होता.  भूतानच्या मुख्य बुद्ध मठातलं वातावरण अतिशय शांत गंभीर होतं. ध्यानासाठी मुद्दाम तयार केलेल्या प्रचंड मोठ्या हॉलमध्ये मंद दिवे तेवत होते.  उदबत्तीचा दरवळ हॉलभर हलकाच पसरला होता. समोरच्या बाजूला असलेल्या बुद्धाच्या मोठ्या मूर्तीच्या चेहेऱ्यावर नेहेमीप्रमाणेच गहन स्मित पसरलेलं होतं.  भुतानचे राजे जिग्मे खेसर नाम्ग्येल वांगचुक, भूतानचे मुख्य धर्म प्रवर्तक, हिज होलीनेस जे खेन्पोंच्या समोर आजही बसले होते.  

"गुरूवर्य, जगात मागच्या दोन तीन दिवसात विचित्र घडामोडी घडतायत.  हे चित्र काही चांगलं नाही.  ही विनाशाची नांदी नाही ना? आपल्याला काय वाटतं? "
"राजन, या सगळ्या घडामोडींच्या मागे आसक्ती आहे, भोग आहे.  एका जाणत्या स्त्रीला डोंगरातून फिरताना एक मौल्यवान दगड सापडतो.  ती तो पिशवीत ठेऊन देते.  दुसऱ्या दिवशी एक भुकेलेला भिक्षुक तिच्याकडे येतो आणि अन्नाची याचना करतो.  तिच्या पिशवीतून ती त्याला अन्न काढून देते, त्यावेळेस त्याची नजर त्या मौल्यवान दगडावर पडते आणि तो तिच्याकडे त्याची मागणी करतो.  स्त्री पिशवीतून तो मौल्यवान दगड काढून त्याला देऊन टाकते.  भिक्षुक तो दगड घेऊन निघून जातो, पण दुसऱ्याच दिवशी परत येतो आणि स्त्रीला तो दगड परत देतो आणि म्हणतो 'तुझ्याकडे असं काय आहे की ज्याच्यामुळे हा दगड तू मला इतका सहजपणे देऊन टाकलास? मला ते दे, ज्यामुळे या दगडाचा मोह तू सोडलास.  गोष्टीचं सार लक्षात आलं राजन? "  
"ओम मणिपद्मे हं... ओम मणिपद्मे हं... " जे खेन्पोंनी धीर- गंभीर स्वरात मंत्रोच्चार केला.  राजे वांगचुकांनी वाकून जे खेन्पोंना आणि बुद्धाच्या मूर्तीला नमस्कार केला.

-    क्रमश: