ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - ४

६ जुलै २०२०.  बरोबर सकाळी १० वाजता डॉक्टर लक्ष्मींनी मायक्रोफोनमध्ये बोलायला सुरुवात केली.

"मित्रहो, गुड मॉर्निंग.  पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत.  पाच दिवसांपूर्वी आपण ही परिषद थांबवली त्या दिवशी चीननं ग्रिफ्त्शियाच्या उत्खननासाठी दोन विशिष्ठ जागांवर सामुद्रीय तळ उकरण्याची मागणी केली होती.  या संदर्भात मागच्या चार दिवसात खूप चर्चा घडल्या.  तुमच्या पैकी बऱ्याचशा जणांनी इमेलद्वारे आपापल्या देशांची मतं आमच्याकडे कळवली आहेत.  बऱ्याच आंतरराष्ट्रीय समुदायांच्या एकमेकांशी चर्चा झाल्या आहेत आणि अजूनही चालू आहेत.  संयुक्त राष्ट्रसंघ, बीबीएनजे आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याही आपापसात आणि यांच्या महासंचालकांच्या इतर राष्ट्रप्रमुखांशी चर्चा झाल्या आहेत."    सर्व सदस्य शांतपणे डॉक्टर लक्षमींचं बोलणं ऐकत होते.

"अमेरिका, युरोपीय समुदाय आणि इतर बऱ्याच राष्ट्रांनी चीनला असे दोन प्लॅटफॉर्म उभे करू द्यायला विरोध दाखवला आहे.  बऱ्याचश्या शास्त्रज्ञांनी सुद्धा हा पर्यावरण विरोधी उपाय आहे असं म्हटलंय.  शास्त्रज्ञांचा आणि पर्यावरण वाद्यांचा या परवानगीला स्पष्ट विरोध आहे कारण याचे दूरगामी परिणाम मानवतेवर पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.  पण या सगळ्या बरोबरच दुसऱ्या हाताला करोना व्हायरसच्या संसर्गाला रोज हजारो लोक बळी पडत आहेत, हेही नजरेआड करता येणार नाही.  हा सगळा विचार करून संयुक्त राष्ट्रसंघांनी असा निर्णय केला आहे की चीनला दोन ऐवजी फक्त एकच प्लॅटफॉर्म आत्ता उभा करायला परवानगी दिली जावी.  दुसरं म्हणजे ही परवानगी फक्त तीन महिन्यांसाठीच असेल.  म्हणजेच तीन महिन्यात दुसऱ्या एखाद्याऔषधाचा शोध लावून ग्रिफित्शियाचं उत्खनन थांबवता येईल आणि पर्यावरणाची पुढची हानी टाळता येईल.  त्यासाठी सर्वच राष्ट्रांनी पुढच्या तीन महिन्यात पर्यायी औषधाचा शोध लावण्याची जबाबदारी घ्यावी.  तिसरी गोष्ट म्हणजे रोजच्या रोज या प्लॅटफॉर्म उभारणी संदर्भात आणि ग्रिफित्शियाच्या उत्खनना संदर्भात चीननं जागतिक आरोग्य संघटनेला आणि संयुक्त राष्ट्रसंघाला माहिती द्यावी आणि शेवटचं म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रतिनिधींना जेव्हा वाटेल तेव्हा या प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी असावी. " परिषदेतल्या बऱ्याच सदस्यांना हा निर्णय आवडल्याचं दिसत होतं.  त्यांनी टाळ्या वाजवून निर्णयाचं स्वागत केलं.  

अपेक्षेप्रमाणेच चीनला हा निर्णय आवडला नसल्याचं स्पष्ट दिसत होतं.  "आम्हाला हा निर्णय मान्य नाहीये. या दोन प्लॅटफॉर्म्सच्या निर्मितीसाठी आम्ही प्रचंड भांडवल ओतलं आहे आणि त्यामुळे आम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्म्ससाठी आणि निदान पाच वर्षांसाठी परवानगी मिळावी असं आमचं म्हणणं आहे. " डॉक्टर शिझेननी त्यांची नापसंती न झाकता सांगितलं. 

"डॉक्टर शिझेन, हा निर्णय संयुक्त राष्ट्रसंघानं पूर्ण विचाराअंती घेतलेला आहे, त्यामुळे यात बदल होईल असं मला वाटत नाही.  बाकी तुम्ही काय करायचं किंवा तुमच्या गुंतवणूकीतून तुम्ही उत्पन्न कसं मिळवायचं हा संपूर्णपणे तुमच्या देशाचा स्वतःचा प्रश्न आहे.  तुम्हाला हा निर्णय मान्य असेल तर तसं संयुक्त राष्ट्रसंघाला तुम्ही लवकरात लवकर कळवा आणि तुमचं काम चालू करा. बाकी सगळ्या सदस्यांना परिषदेतर्फे धन्यवाद. " डॉक्टर लक्ष्मींनी मायक्रोफोन आणि टीव्ही बंद करून टाकला. 

***

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत, अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स फ्लुएंटेस, सीआयए चे संचालक रिचर्ड केंडाल आणि सैन्यदलाचे प्रमुख जनरल स्टीफन हॉफमन हजर होते.  विषय अर्थातच चीनला मिळालेल्या परवानगीचा होता. 

"सर चीनला आत्ता एकच प्लॅटफॉर्म उभा करायला परवानगी मिळालीये आणि तो प्रशांत महासागरातला प्लॅटफॉर्म उभा करतील असं दिसतंय."  सीआयए प्रमुख रिचर्ड केंडालनी माहिती दिली.
"पण तीन महिन्याच्या या परवानगीला चीननं मान्यता कशी दिली? " राष्ट्राध्यक्षांनी विचारलं.
"सर, बातमी अशी आहे की, तीन महिन्याच्या परवानगीनं चीन तिथं जाऊन बसेल आणि तीन महिन्यांनंतर तिथून प्लॅटफॉर्म हटवायला सरळ नकार देऊन टाकेल.  किंवा मुत्सद्दी मार्ग वापरून प्लॅटफॉर्म मागे न्यायची टाळाटाळ करेल किंवा दुसरं काहीतरी कारण देऊन तिथला मुक्काम वाढवून घेईल.  पण प्लॅटफॉर्म तिथून काढून घेणार नाही, कारण त्यांचा उद्देश ग्रिफित्शियाचं उत्खनन हा नाहीच आहे." 
"हं... आपली तयारी काय काय आहे?"

"सर प्लॅटफॉर्म संदर्भातली प्रत्येक घडामोड आपल्याला दुसऱ्याच क्षणाला माहिती होईल अशी व्यवस्था केलेली आहे.  प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या लोकांच्यातल्या काही लोकांना विकत घ्यायची आम्ही व्यवस्था केली आहे.  प्लॅटफॉर्मवरच्या यांत्रिक मानवांमध्ये आपला विषाणू सोडला जाईल.  त्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा हे यांत्रिक मानव आपण निकामी करू शकू. " रिचर्ड केंडालनी सांगितलं.
"रिचर्ड आणखी एक काम करा, प्लॅटफॉर्मचा मुख्य डेटा कसा हॅक करता येईल ते बघा. " संरक्षण सचिव जेम्स फ्लुएंटेसनी सूचना दिली.

"जनरल हॉफमन तुमची काय काय तयारी आहे? "
"राष्ट्राध्यक्ष साहेब हवाईमधला आपला संरक्षण तळ आम्ही पुढच्या आठ दिवसात मजबूत करतो आहोत. आपल्या फ्लीट मधल्या दोन मुख्य विमानवाहक नौका आणि दोन फ्रिगेटस आम्ही त्या भागात गस्तीसाठी पाठवून दिल्या आहेत.  आपल्या पश्चिम किनाऱ्यावरची मिसाईल्सना चीनमधल्या मोक्याची ठिकाणांवर लक्ष्य करुन ठेवली आहेत.  जपान मधला मिसवा एअर बेस, हवाई बेटांवरचा एअर बेस, दक्षिण कोरियातला ओसान एअर बेस, आरिझोना एअर बेस या सगळ्या एअर बेसना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि इथल्या हवाई तुकड्या आम्ही वाढवतोय." 
जनरल स्टीफन हॉफमननी माहिती दिली.

"उत्तम.  आता मी काही गोष्टी सांगतोय ते तुम्ही सगळे नीट ऐका आणि त्यावर योग्य ती कारवाई ताबडतोब चालू करा.  इथून पुढं रोज सकाळी नऊ वाजता मला प्लॅटफॉर्मची सगळी माहिती मिळाली पाहिजे.  नासाला सांगून उपग्रहांमार्फत प्लॅटफॉर्मच्या हालचालीची प्रत्येक क्षणाची चित्र घेत चला.  उपग्रहांमार्फतच चीनच्या इतर सर्व हालचालींवर नजर ठेवा.  हे सर्व चालू असताना इराणवरचं आपलं लक्ष विचलीत होऊ देऊ नका.  कासिम सुलेमानीच्या मृत्यूचा बदला घ्यायला इराण टपलेला आहे हे विसरू नका.  इस्राईलला तयारीत रहायला सांगा.  आवश्यकता पडली तर त्यांना इराणवर हल्ला करायला सांगता येईल.  भारताच्या पूर्व सीमेवर लष्करी तयारी वाढवायला सांगा आणि त्यांना तयारीत रहायला सांगा.  भारताची लष्करी ताकत जवळ जवळ चीनच्या बरोबरीची आहे.  भारत त्यांच्या पूर्व सीमेवर चीनला चांगला गुंतवून ठेवू शकतो."
"सर, मध्ये बोलतोय त्याबद्दल क्षमस्व.  भारत चीन मध्ये ठिणगी उडतीये असं वाटलं तर चीन पाकिस्तानला भडकावण्याची शक्यता आहे. आणि पाकिस्तानी लोक मागचा पुढचा विचार न करता कुठल्याही थराला जातील."  जेम्स फ्लुएंटेसनी शक्यता वर्तावली.
"बरोबर आहे. वेळ पडली तर जागतिक बँकेला आणि आय एम एफला सांगून पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवता येईल.  शिवाय इंग्लंड आणि फ्रांसला भारताच्या मदतीसाठी तयारीत रहायला सांगा. मित्रहो, बुद्धीबळाच्या पटासारखं शत्रूच्या हालचाली विरुद्ध तुम्ही काय हालचाल करणार, त्याला शत्रू काय उत्तर देईल, त्यावर तुम्ही काय करणार ही संपूर्ण रणनीती तयार करून ठेवा. " राष्ट्राध्यक्ष भराभर सूचना देत होते. 

 
"आणखी एक गोष्ट आणि ही गोष्ट कुठल्याही परिस्थितीत या खोलीच्या बाहेर जाता कामा नये.   खरं सांगायचं तर, आज आपल्याला एका युद्धाची गरज आहे.  करोनाव्हायरसमुळे धक्का बसलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला पटकन गती द्यायचा तो एक उत्तम मार्ग आहे.  त्यामुळे आज युद्ध झालं तर ते आपल्या फायद्याचंच आहे.  याचा अर्थ आपण युद्धाला तोंड फोडायचं असा नाही, पण ठिणगी पडली तर त्यात तेल ओतायला हरकत नाही.  अर्थात युद्ध होणं जसं आपल्यासाठी आवश्यक आहे तसंच ते जिंकणंही तितकंच महत्त्वाचं आहे.  हा शत्रू अमेरिकेच्या इतिहासातला सगळ्यात धूर्त, कावेबाज आणि हुशार शत्रू असणार आहे.  याच्याकडे पैसा, तंत्रज्ञान आणि सामुग्री कशाचाही तुटवडा असणार नाही.  तुमच्या नियोजनात याचा विचार झालेला असला पाहिजे.  शेवटी अजून एक मुद्दा. मी परवा प्लॅटफॉर्मवर घातपात कसा करता येईल असं म्हटलं होतं.  त्या पर्यायाचा विचार करून ठेवा. प्रशांत महासागरातल्या प्लॅटफॉर्मच्या नियोजीत साईटवर आणि तिथून शंभर दोनशे किलोमीटरच्या परिसरात दरवर्षी किती भूकंप होतात, किती ज्वालामुखींचा उद्रेक होतो आणि किती त्सुनामी येतात याचा मागच्या पन्नास वर्षातला सगळा डेटा मला त्वरित हवा आहे."

राष्ट्राध्यक्षांच्या दालनातून बाहेर पडताना, अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स फ्लुएंटेस, सीआयए चे संचालक रिचर्ड केंडाल आणि सैन्यदलाचे प्रमुख जनरल स्टीफन हॉफमन यांच्या तिघांच्याही डोक्यातील विचारचक्र वेगानं फिरायला लागली होती. 

***

तिन्हीसांजा उलटून जाऊन अंधार पडला होता.  भूतानच्या मुख्य बुद्ध मठातलं वातावरण अतिशय शांत गंभीर होतं. ध्यानासाठी मुद्दाम तयार केलेल्या प्रचंड मोठ्या हॉलमध्ये मंद दिवे तेवत होते.  उदबत्तीचा दरवळ हॉलभर हलकाच पसरला होता. समोरच्या बाजूला असलेल्या बुद्धाच्या मोठ्या मूर्तीच्या चेहेऱ्यावर नेहेमीप्रमाणेच गहन स्मित पसरलेलं होतं.  भुतानचे राजे जिग्मे खेसर नाम्ग्येल वांगचुक, भूतानचे मुख्य धर्म प्रवर्तक, हिज होलीनेस जे खेन्पोंच्या समोर आजही बसले होते.  

"गुरूवर्य, चीनला प्रशांत महासागरात प्लॅटफॉर्म उभा करायला चार दिवसांपूर्वी परवानगी मिळाल्यापासून जगात प्रचंड वेगाने हालचाली घडायला लागल्यात.  प्रत्येक देश युद्धाची तयारी करायला लागलाय.  अमेरिका प्रशांत महासागरातली त्यांची संरक्षण सिद्धता खूप मोठ्या प्रमाणात वाढवतीये.  अचानक ईराण, ईस्राईल, भारत, पाकीस्तान, युरोपीय देश सगळेच युद्धाच्या तयारीला लागलेले दिसताहेत.   भारतीय सैन्याची चीनच्या सीमारेषेवरची हालचाल नजरेत येण्याइतकी वाढलीये.  तिसऱ्या महायुद्धाच्या नौबती झडायला लागल्यासारखं वातावरण आहे.    एका बाजूला चीन परत परत सांगतोय की या प्लॅटफॉर्मचा त्यांचा उद्देश ग्रिफित्शिया काढण्याचाच आहे पण दुसऱ्या हाताला चीन आणि अमेरिका अगदी उघड उघड एकमेकांना धमक्या द्यायला लागलेत." भूतानच्या राजांनी त्यांची कैफियत त्यांचे धार्मिक गुरू जे खेन्पोंच्या समोर मांडली. 

"राजन, युद्ध होईल की नाही हा वेगळाच मुद्दा आहे आणि अर्थातच युद्ध होणं मानवतेसाठी चांगलं नाहीच.  पण एकूणातच ही सगळीच अरेरावी वाईट आहे.  निसर्ग हा आपला एक प्रकारचा धर्मच आहे.  पण आपण कधीही त्याचा धर्म म्हणून आदर केला नाही.  आपल्यासाठी आपली प्रगतीच आपल्याला जास्त महत्त्वाची आहे."  जे खेन्पों खिन्नपणे हसले आणि म्हणाले "आणि प्रगती म्हणजे काय? प्रगती म्हणजे दर वर्षी होणारी जीडीपीची वाढ?  का सतत वाढत जाणारे शेअर मार्केटांचे आकडे?  आणि लोकांची अध्यात्मिक प्रगती?  मानसिक प्रगती?  ती कधी होणार?  राजन, निसर्गासमोर आपण क्षुद्र आहोत. एक अति सूक्ष्म जीवाणू सुद्धा आठशे कोटी लोकांना एकाच वेळेस सहा सहा महिने वेठीला धरू शकतो, तुम्ही त्याच्यापुढे पूर्ण हतबल होता. आणि तरीही आपण आपली अरेरावी सोडायला तयार होत नाही? निसर्ग शांत, संयमी, अथांग जरूर असतो, पण त्याच्या अथांगतेला, संयमाला सुद्धा सीमा असतात. आपण त्या सीमांच्या जवळ जाऊन पोहोचलो आहोत.  राजन, मानवतेसाठी हे सगळं चांगलं नाही. " 
"ओम मणिपद्मे हं... ओम मणिपद्मे हं... " जे खेन्पोंनी धीर- गंभीर स्वरात मंत्रोच्चार केला. 

राजे वांगचुकांनी डोळे उघडले आणि वाकून जे खेन्पोंना आणि बुद्धाच्या मूर्तीला नमस्कार केला.

-    क्रमश: