एप्रिल २४ २०२०

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - ५ (अंतिम भाग)

१८ जुलै २०२०.  आज सकाळी बरोबर दहा वाजता जागतिक आरोग्य संघटनेच्या टेलिकॉन्फरन्स रुम मध्ये पुन्हा एकदा डॉक्टर लक्ष्मी आल्या होत्या.  टीव्हीवरच्या वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी पुन्हा एकदा जमा झाले होते.

"गुड मॉर्निंग. " नेहेमी प्रमाणेच डॉक्टर लक्ष्मींनी बोलायला सुरुवात केली. "आपल्या सगळ्यांचं जागतिक आरोग्य संघटनेच्या टेलिकॉन्फरन्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत.  आजची आपली ही सभा थोड्याच वेळाची आहे.  चीननं मुद्दाम निमंत्रण दिल्यावरून आजची ही बैठक बोलावली आहे. मी चीनचे डॉक्टर जियांग शिझेनना मायक्रोफोनवर यायची विनंती करते.  धन्यवाद."

"मित्रहो चीनतर्फे आपल्या सर्वांचं इथे पुन्हा एकदा स्वागत. एक चांगली बातमी सांगण्यासाठी मी आज आपल्या सगळ्यांना इथे बोलावलंय. " डॉक्टर शिझेननी बोलायला सुरुवात केली.  "बरोबर १२ दिवसांपूर्वी म्हणजे ६ जुलै २०२० ला संयुक्त राष्ट्रसंघानं आम्हाला प्रशांत महासागरात ग्रिफित्शियाचं उत्खनन करायला परवानगी दिली होती.  त्या परवानगी नुसार अतिशय वेगवान हालचाली करून आम्ही ग्रिफित्शिया उत्खननाचा आमचा प्लॅटफॉर्म प्रशांत महासागरातल्या नियोजीत स्थळी पोहोचवून, तिथे त्याची स्थापना करण्यात यशस्वी झालो आहोत.  आमच्या सैन्यदलानं आणि नाविक दलानं यासाठी अतोनात मेहेनत घेऊन अतिशय विक्रमी वेळात हा प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे.  खूप मोठी यंत्र सामग्री आणि मनुष्य बळ या सगळ्यासाठी वापरावं लागलं.  आणि मला तुम्हाला पुढे सांगायला आनंद होतोय की येत्या एक दोन दिवसातच हा प्लॅटफॉर्म ग्रिफित्शिया काढायला सुरुवात करेल.  या ग्रिफित्शियापासून करोना व्हायरस विरोधातलं अंतिम औषध तयार करणारे कारखाने चीनमध्ये तयार आहेत आणि या लाल शेवाळाची वाटच बघत आहेत.  त्यामुळे जर सगळं काही ठरवल्या प्रमाणे घडलं तर, साधारण पणे पुढच्या दहा बारा दिवसात हे अंतिम उत्पादन, करोना व्हायरसला काबूत आणणारं औषध, बाजारात यायला सुरुवात होईल. " परिषदेच्या बऱ्याचशा सदस्यांनी टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त केला.    

काही सदस्यांनी मायक्रोफोनवर येऊन आपापल्या देशांतर्फे डॉक्टर शिझेनांचं अभिनंदन केलं.   काही सदस्यांनी काही जुजबी शंका विचारल्या आणि त्याला डॉक्टर शिझेनांनी उत्तरं दिली.  अमेरिकेचे डॉक्टर मॅककार्थी मात्र चिडलेले दिसत होते.

"सदस्य मित्रांनो, चीनला त्यांच्या प्लॅटफॉर्म संबंधीची ही ताजी बातमी या परिषदेला द्यायची होती आणि त्यासंबंधी तुमच्या शंकांना उत्तरं द्यायची होती.  फक्त तेवढ्या साठीच आजची परिषदबोलावली होती.  मला वाटतं आता कुणाला काही अजून प्रश्न नाहीयेत, त्यामुळे आजची सभा मी इथंच संपवते आहे.  धन्यवाद. " डॉक्टर लक्ष्मींनी मायक्रोफोन बंद करून टाकला.  

***

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या दालनात सीआयएचे संचालक रिचर्ड केंडाल पुन्हा एकदा येऊन बसले होते.  त्यांचा हातात कसला तरी नकाशा दिसत होता.

"अध्यक्ष साहेब, एक महत्त्वाची माहिती.  प्रशांत महासागरातल्या टेक्टॉनिक प्लेटची मागच्या दोन तीन दिवसापासूनची हालचाल आपल्या भूगर्भ शास्त्रज्ञांनी टिपलीये.  या हालचालींवरून असं दिसतंय की येत्या चार सहा दिवसात त्या भागात खूप मोठे भूकंप, कदाचित ज्वालामुखीचा उद्रेक होण्याची शक्यता आहे."  रिचर्ड केंडालनी त्यांच्या हातातला नकाशा राष्ट्राध्यक्षांच्या समोर उलगडून पसरला.

"प्लॅटफॉर्मवरच्या परिस्थितीवर आणि हालचालींवर तुमचं नियंत्रण आहे का? " राष्ट्राध्यक्ष.
"पूर्णपणे सर. "
"उत्तम.  मग मला आता नकाशावर टेक्टॉनिक प्लेटची हालचाल कशी होते आहे ते दाखवा. " राष्ट्राध्यक्ष. 

सीआयएचे संचालक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दोघेही नकाशात बुडून गेले आणि गंभीरपणे बराच वेळ काहीतरी चर्चा करत राहिले. 

***

रात्रीचे जवळ जवळ अकरा सव्वा अकरा झाले होते.  राजे जिग्मे खेसर घाई घाईनं जे खेन्पोंच्या मठात आले होते. 

"हिज होलीनेस, आपल्याला इतक्या रात्री त्रास देतोय याबद्दल क्षमस्व.  परंतु एक धक्कादायक बातमी आहे." राजांनी घाईनं सांगितलं.

"काय झालं राजन? " जे खेन्पो.
"आत्ताच बीबीसीवर एक महत्त्वाची बातमी आलीये.  चीननं करोना व्हायरसच्या औषधाच्या उत्खननासाठी प्रशांत महासागरात उभारलेल्या प्लॅटफॉर्मवर आत्ता थोड्या वेळापूर्वी प्रचंड मोठा स्फोट होऊन संपूर्ण प्लॅटफॉर्म उध्वस्त झालाय.  प्लॅटफॉर्मवरचा एकही माणूस जिवंत राहिला असण्याची शक्यता नाहीये असं समजतं. हवाई बेटांवरच्या एका ज्वालामुखीचा पण उद्रेक झाल्याचं सांगण्यात येतंय." राजे.

"पण स्फोट कशामुळे झाला असं काही कळलं? ' जे खेन्पोंनी विचारलं.
"प्राथमिक अंदाजाप्रमाणे बहुतेक मोठा भूकंपाचा धक्का किंवा समुद्रतळापाशी ज्वालामुखीचा उद्रेक झाला असण्याची शक्यता वर्तवली जातीये.  मी बीजींग मधल्या आपल्या वकिलातीशी पण बोललो. त्यांनी बातमी खरी आहे असं सांगितलंय. चीनी अधिकाऱ्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे असं आपल्या वकिलातीचं म्हणणं आहे.  बीजींग मध्ये अक्षरशः धावपळ उडाली आहे.  कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्यूरोची तातडीची बैठक आत्ता चालू आहे असं कळतं. तिकडे अमेरिकेत पण राष्ट्राध्यक्षांनी मोजक्या चार पाच वरिष्ठ नेत्यांची त्वरित बैठक बोलावली आहे. "

"हा घातपात असू शकतो? " जे खेंपोंनी विचारलं.
" शक्य आहे. "
"अमेरिकेनं काही म्हटलंय का याच्यावर? " जे खेन्पोंनी चौकशी केली.
" हो.  त्यांच्या अध्यक्षांनी ट्वीट केलंय की चीननं मुळातच या अशा प्रदेशात प्लॅटफॉर्म उभा करणं चुकीचं होतं.  त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळालीये.  अमेरिकेचंही औषध येत्या काही दिवसातच बाजारात येईल असं त्यांचं आता म्हणणं आहे." राजांनी माहिती दिली.  "हिज होलीनेस ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर नाही? आपल्याला काय वाटतंय?" राजांनी काळजीयुक्त स्वरात विचारलं.

जे खेन्पो विचारमग्न झाले.  काही काळ डोळे मिटून शांत बसून राहिले आणि मग त्यांनीच बोलायला सुरुवात केली "राजन, तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एकदा एका शेणाच्या गोळ्यावर एक मोठ्ठी माशी येऊन बसते. तिला ती जागा खूप आवडते म्हणून स्वजातीतल्या इतर सगळ्या माश्यांना ती तिथं बोलावून घेते. ती फार सुंदर जागा बघून सगळ्याच माश्या हरखून जातात आणि पहिल्या आलेल्या माशीला राणी माशी म्हणून निवडतात आणि तिची मोठी मिरवणूक काढतात. त्याचवेळेला तिकडून रस्त्याने एक हत्ती चाललेला असतो आणि शेणाच्या ढीगावर पाय पडू नये म्हणून तो पाय वर करतो.  मिरवणूकीतल्या माश्यांनाहत्तीचा राग येतो आणि त्या त्याच्यावर ओरडतात " काय रे दिसत नाही का?  इथे आमच्या राणीची मिरवणूक चालली आहे आणि तू पाय वर करून काय आम्हाला धमकवायला बघतोयस का? " हत्ती थोडासा हसतो आणि म्हणतो 'ओहोहो, माफ करा हं.  मी बघितलंच नाही तुमच्या राणीला.  मी खरंच तुमची माफी मागतो हां".  असं म्हणून शेणाच्या त्या गोळ्यावर तो पाय ठेवतो.  सगळ्या उद्दाम माश्या एकाच वेळेस हत्तीच्या पावलाखाली दबून मरून जातात. "

"राजन, उद्दामपणा, अरेरावी फक्त विनाशालाच कारणीभूत होते.  आणि मानसिक प्रगती या उद्दाम पणाला लगाम घालते. ओम मणिपद्मे हं हा शडाक्षरी मंत्र मानवतेच्या मानसिक प्रगतीसाठी फार महत्त्वाचा मंत्र आहे. यातलं प्रत्येक अक्षर सहा श्रेष्ठ गुणांचं प्रतिनिधित्व करतं. औदार्य, नीतीमत्ता, संयम, व्यासंग, संन्यस्त विचार आणि बुद्धिचातुर्य हे ते सहा श्रेष्ठ गुण.  या सहा गुणांचा अंगिकार मनाची प्रगती दाखवतात. आणि या सहा गुणांचा ऱ्हास ह्या आजच्या सारख्या विनाशाला कारणीभूत होतो. "
 
"राजन ही ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा म्हणजे याच मानसिक ऱ्हासाची कथा आहे.  ओम मणिपद्मे हं... ओम मणिपद्मे हं. "  
राजे वांगचुकांनी वाकून जे खेन्पोंना आणि बुद्धाच्या मूर्तीला नमस्कार केला. राजांच्या मनाला नवीन उभारी मिळाली होती. 

  • समाप्त

Post to Feedहत्तीचे पाऊल आणि शेणाचा पो

Typing help hide