मे २०२०

आपला देश आणि गोपाळ कृष्ण गोखले!

आपला देश आणि गोपाळ कृष्ण गोखले! 

खालील  विधाने पहा! 

१. कानपुरमध्ये शक्यतो चार चाकीचे साइड मिरर फक्त ह्या काळजीने मुडपलेले असतात की मागून येणारा त्याला धडकेल.

२. इंदोर वरून लखनऊला (अंतर ८०० किमी) घेऊन जाणारी एक बस सेवा २८ तास घेते.

३. कथुवा (जम्मू) येथे खारी सदृश एका खायच्या पदार्थाला फेणी म्हणतात आणि तिलाच उत्तराखंड मधील रुद्रपुर येथे मकरी म्हणतात 

४ तामिळनाडूमधील ओदनथुराईवरून कोटगिरी मधील अंतर जरी ३२ किमी असेल तरी ते कापण्यासाठी सुमारे ६ तास लागतात. बस जवळ जवळ प्रत्येक वळणावर थांबते. बसची मागील बाजू तीव्र चढामुळे रस्त्याला घासू नये म्हणून लाकडाचे तुकडे चाकाखाली लावले जातात. गाडी त्यावर चढली की तिची उंची वाढते आणि मागील बाजू घासत नाही. असे करत करत प्रवास घडतो.

५. अजमेरवरून अहमदाबाद येथे घेऊन जाणाऱ्या एका स्लीपर कोच बसमध्ये - एरवी पडदे असतात तिथे - चक्क काचेचे स्लायडर असतात, बाहेरून आतले काही दिसणार नाही अशी काळजी घेत बसवलेले.

६. गुरुग्राम येथून पतौडीकडे ऐन उन्हाळ्यात भर दुपारी निघाले असता, चार चाकीमध्ये आत बसून बाहेर डांबरी रस्त्यावरील तापमान कळण्याची सोय असल्यास ५८ डिग्री सेल्सिअसपर्यंत नोंद येऊ शकते!

७. हल्द्वानीवरून नैनितालला जाताना रस्ते इतके अरुंद आहेत की काही वळणावरती बसचे एक चाक ५०% दरीत डोकावते.

८. होसूरवरून बंगळुरूला ऑफिस सुटतानाच्या वेळेत निघाले आणि मध्यरात्री निघाले तरी एकाच वेळी पोहोचतो कारण रस्त्यात एवढे  ट्रॅफिक असते!

९. तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन असेल आणि तुम्हाला आंध्र प्रदेशामधील नेल्लोर येथे कोणाच्या घरी बनवलेला गरमागरम रस्सम प्यायला मिळाला तर तुम्ही कोणी जादू केल्यासारखे अगदी ५ मिनिटांत  ठणठणीत होऊ शकता.

१०. पंजाबमधील अमृतसर, गुजरातमधील राजकोट आणि तामिळनाडूमधील कोईम्बतूर ही शहरे रिव्हर्स इंजिनीरिंग साठी प्रसिद्ध आहेत. तुम्ही कोणत्याही बनावटीचे कसलेही यंत्र इथल्या अगदी सर्वसामान्य कारखानदाराकडे द्या, तसे हुबेहूब यंत्र बनवण्याचे कसब त्याच्याकडे असेल.  

गोपाळ कृष्ण गोखले यांनी गांधीजींना 
भारतात कोणतेही काम करण्यापूर्वी 
"संपूर्ण भारत फिरून पाहावा" 
हा सल्ला किती प्रचंड मोलाचा होता, 
याची अगदी छोटी जाणीव जवळ जवळ सगळी राज्ये फिरल्यावर येते.  

आपण किती प्रचंड मोठे आहोत? 
विविधता म्हणतात ती नक्की कशाकशात आणि कशी आहे?
प्रांतीय अडचणी आव्हाने खऱ्या अर्थाने  कशा असतील? 
ह्याची चुणूक देश फिरल्याशिवाय येणे केवळ अशक्यच.  

हल्ली व्हाट्सअँपवर 
व 
पूर्वी कट्ट्यांवर राष्ट्राच्या जडणघडणीच्या काळज्या, 
त्यावरील मते आणि म्हणून सल्ले 
ऐकले की वाटतं 
आपल्या सगळ्यांच्याच नशिबात गोखले असते तर किती बरं झालं असतं!

Post to Feedखरं आहे
कोरोना

Typing help hide