वणवे

अता क्रुद्ध वणवे शमू लागले
थवे पाखरांचे जमू लागले

कधीच्याच सरल्या तुझ्या मैफ़िली
तरी स्वर तुझे आक्रमू लागले

अथक चालुनी पाय लक्ष्याकडे
असे शेवटी का दमू लागले?

जरी जाणतो मी न असणे तुझे
हृदय या ठिकाणी रमू लागले

तुझा भास माझ्यात होऊन का-
मला लोक इतके नमू लागले

न मी ईश्वरी वा न तू मानवी
जुने भेद नवखे गमू लागले

- कुमार जावडेकर