प्रेम म्हणजे नक्की काय ?

प्रेम हा बेहद्द चर्चा झालेला पण अजून कुणालाही नीट न उलगडलेला जीवनातला एक महत्त्वाचा विषय आहे, त्या निमित्तानं लेख.
प्रेमाचे वेगवेगळे प्रकार आहेत असा जनमानसात ठाम विश्वास आहे.  सर्वात भारी आईचं प्रेम, त्या खालोखाल (किंवा त्यापेक्षा भारी) देशप्रेम, जमाना जो बर्दाश्त नही करता ते प्रेम ('हेच खरं प्रेम' अशी प्रत्येकाची एक सुप्त भावना आहे, पण तसं उघड बोलायची चोरी), मैत्रीतलं प्रेम, मुलांविषयीचं प्रेम, प्राणीप्रेम ......... आणि हे काहीच जमलं नाही तर (बहुदा जीवनाची गाडी उतरणीला लागल्यावर) देवावरचं प्रेम ! यात उपप्रकार पण आहेत, आपल्या कामावरचं प्रेम, आपल्या वस्तूंविषयीचं प्रेम, एखाद्या छंदाचं प्रेम, पुस्तकं, लेखक, अभिनेते यांच्यावर प्रेम, (आणि हल्ली तर राजकीय नेत्यावर प्राण ओवाळून टाकणं !)   
थोडक्यात, जो ज्याला जमेल तसं, तितकं प्रेम करायचा आणि मुख्य म्हणजे मिळवायचा प्रयत्न करतो; पण प्रेम म्हणजे नक्की काय हे कुणाला सापडलेलं दिसत नाही.
त्यात ओशोंसारखे दिग्गज, 'तुम्हारा प्रेम शीर्षासन करती हुई नफरत है, वह कभीभी पहेलू बदल सकता है |' असं सांगून नको तितका खोल ठसा उमटवून जातात.