श्रुती आणि स्मृती !......

श्रुतीआणि स्मृती !......

 आपण एखाद्या  देवकार्याचा संकल्प करत असताना  वरचे वाक्य आपल्या कानी पडते . पूर्ण संकल्प आपण नीट ऐकण्याच्या मानसिकतेत नसतो ...असो तो मुद्दा इथे नाही,आणि अधिकारही नाही . तर स्मृती म्हणजे आठवण . आठवणी इतकी विलक्षण आणि महत्त्वाची वस्तू ह्या जगात दुसरी नाही .... ती इतकी महत्त्वाची असते की तिच्यामुळे आपल्या जीवनावर अनेक परिणाम होत असतात ..आता एक बघ !, आपण जर चालणे , बोलणे विसरलो तर?, गोष्ट अगदी छोटी पण तिचा जीवनावर प्रभाव केवढा पडतो . आणि हे खरे देखील आहे आपण काय खावे काय प्यावे काय ल्यावे हे आपल्याला स्मृती मुळे कळते . गोष्ट छोटी पण ती नैसर्गिकरीत्या घडत असल्यामुळे आपण ती दुर्लक्षित करतो . स्मृतीची जाणीव जशी बुद्धीला , मनाला असते तशी ती शरीराला देखील असते. आपले जीवन म्हणजे ह्या छोट्या छोट्या स्मृतींचा अगणित संग्रह म्हणणं हवं तर !. आपण आपले दोन हात जोडून समोरच्यास अभिवादन करतो तशी ती आपली भारतीय पद्धत आहे आताशा ती जगन्मान्य होताना दिसते . आपण हस्तांदोलन देखील टाळतो कारण का तर तो स्पर्श देखील एक साठवणुकीचाच प्रकार असतो . म्हणूनच की काय नेत्रहीन व्यक्ती केवळ स्पर्शाने समोरच्या व्यक्ती ओळखतात . 
         माणसाला जर शांत आणि आनंदी राहायचे असेल तर हे आठवणींचे गाठोडे फार कमी असावे लागते . हो !...कारण एकांती हे बोचके सुटायची भीती जी असते!, आणि म्हणूनच आपल्याकडे सरळ मार्गी जीवन जगण्यावर अधिक भर दिला जातो. सरळ मार्गी माणसाचे एक बरे असते, त्याला हे ओझे बाळगायची आवश्यकता तशी फारशी नसते . तो सरळ असल्यामुळे हे आठवणींचे ओझे कमी असते.
म्हणून स्मृतिकारांनी श्रुतीस अधिक महत्त्व दिले असावे !...
         तुमचा जीवन प्रवास देखील काहीसा ह्याच मार्गाचा आहे . होईल तेवढे हे आठवणीचे बोचके कमी करून घ्या!.. ‍ जीवन प्रवास शांत व सुखमय होईल!