सगुण स्वरुप ते निरगुण निराकार!

सगुण स्वरूप ते निर्गुण निराकार!

१.
एक अभिनेता सोशल मीडिया वरती एक व्हिडिओ शेअर करतो, 
त्यात त्याचा ६-७ वर्षांचा मुलगा जुन्या कागदाचे बोळे करतो, 
एकमेकांवर रचतो आणि नंतर रंगवून त्याचा "बाप्पा" बनवतो! 
२.
करोना काळात मास्क घातलेला गणपती, 
कधी मंगळयान देखावा, मग अंतराळवीर गणपती!
कारगिलच्या युद्धात सैन्याचा अधिकारी झालेला गणपती!
३.
नुकतंच स्वतःच स्वतः खायला शिकलेला माझा मुलगा,
पोळीचा एक वेगळ्या आकाराचा तुकडा उचलतो 
आणि नाचवत मला म्हणतो, 
"बाबा, गणपती बाप्पा!"
मी म्हणतो, 
"हो छान छान, खा चल पटापट!"
हे असं सगळं एकत्र करून पाहिलं की वाटतं,
जर हा असा, 
हवा तिथे 
हव्या त्या कल्पनेतून 
आपल्याला हवा तसा 
"निर्मिता"च 
निर्मीण्याची मोकळीक देणारी आपली संस्कृती थोरच!
__________________________________
A)
फ़्रेंड्स नावाच्या मालिकेमधलं, 'रॉस' हे माझं एकदम आवडतं पात्र. 
मैत्रिणीसोबत असताना, 
तिच्या धक्क्याने त्याने आणलेली एक जुनी मूर्ती पडते! 
ती म्हणते "अरे रे! तुझी मूल्यवान मूर्ती पडली!"; 
तो बाप्पाच्या मूर्तीकडे पाहत म्हणतो, 
"जाऊ देत खूप जुनी आहे ती!"
B)
मध्ये अमेझॉन वरती लक्ष्मी देवीच्या चित्राच्या डिझाइनची पायपुसणी विकायला असल्याचे पाहण्यात आले होते!  
C)
गणपतीच्या दहा दिवसांत जवळ जवळ 
प्रत्येक पक्षाच्या, 
मिठाईवाल्यांच्या, 
दागिनेवाल्यांच्या 
वर्तमानपत्रात बाप्पाच्या रेखीव चित्रांच्या पानभर जाहिराती येतात!
पुढे अगदी ८-१० दिवसांत कधीतरी 
(रद्दी म्हणून विकल्यामुळे) 
टपरीवरती भेळ खाताना नेमके तेच कागद येतात!
D)
"'क्ले'च काहीतरी कर!" म्हटल्यावर मी केलेली बाप्पाची मूर्ती, 
दुसऱ्या दिवशी आता वेगळं काहीतरी करायचं म्हणून माझा ५ वर्षाचा मुलगा 
जेव्हा तिचा परत गोळा करायचा म्हणून जातो आणि रिकाम्या हाती परत येतो, 
का? विचारल्यावर म्हणतो 
अरे "आईने फूल ठेवलं तिथे, बाप्पा झाला आता तो!"
हे असं पाहिल्यावर
मग लक्षात येतं
आपल्या संस्कृतीची
थोरवी फक्त हवं तिथे निर्मिता पाहता येतो ह्यात नाहीये, 
तर जेथे हवे तिथे त्या सगुण साकाराला निर्गुण निराकार करता येण्याच्या 
सर्वसामान्याला असणाऱ्या स्वातंत्र्यामध्ये आहे!