रामजी पांगेरा!

रामजी पांगेरा 
कात्रजजवळच्या वेळू गावामधला हा तरुण मुलगा. स्वराज्याच्या पायदळामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडणारा हा महापराक्रमी शिलेदार!
रामजी पहिल्यांदा चमकला ते अफजलखानाच्या वेळी. अफजलच्या भेटीनंतर भले काहीही होवो - म्हणजे अगदी महाराजांना दगा फटका झाला तरी - प्रत्येकाला आपापली कामे चोख करण्याचे आदेश होते. भेटीनंतर तोफांच्या इशाऱ्याने कार्यवाही सुरू करण्याचे ठरले होते. अफजलच्या ३७०००च्या वाईच्या मुलुखात असलेल्या सैन्यावर सगळ्या बाजूने चढाई करायची ठरले. 
ह्यामधल्या १५०० जणांच्या मातब्बर लढाऊ सैन्यावर आक्रमणाची जबाबदारी होती रामजीवर! अफझलखानाच्या वधानंतर इशाऱ्याची तोफ धडाडली आणि रामजीच्या तुकडीने प्रचंड पराक्रम करत आदिलशाही लढवय्यांना प्रचंड वेगवान कार्यवाई करत संपवले. 
 
पराक्रमाची पराकाष्ठा रामजीने केली ती कान्हेरच्या दुर्गाला दिलेरखानाच्या वेढा पडला तेव्हा! 
तब्बल २००००ची फौज दिलेरखानासोबत होती. दुर्गावर थांबून प्रतिकार करत राहणे सोपे होते. पण रामजीने प्रचंड धाडसाचे पाऊल उचलले. सोबतच्या मावळ्यांना आव्हान केले की आता निर्वाणीच्या लढ्याची वेळ आली आहे. कोण तयार आहे साथ द्यायला? 
७०० जण उभे झाले. 
रामजी दुर्गाचे दरवाजे उघडून ७०० जणांसहित २०००० च्या सैन्यावर अक्षरशः: तुटून पडला. १२००हून अधिक मुघल ह्या विजेच्या वेगाने झालेल्या हल्ल्यामध्ये क्षणार्धात पडले. ह्या झंझावातापुढे दिलेरला परत एकदा नक्कीच मुरारबाजी आठवले असतील. प्रचंड हानी झालेले मुघल सैन्य पळू लागले. पण एव्हाना जखमी रामजीला एक वार बसला आणि स्वराज्यासाठीचे सर्वोच्च बलिदान देऊन रामजी पडला.
मुघल पळाले, दुर्ग रामजीच्या आसमानी पराक्रमाने राखला होता पण तो पडला होता.
बातमी मिळताच महाराजांनी स्वतः रामजीच्या घरी जाऊन त्याच्या आईचे सांत्वन केले होते.
रामजीचे वर्णन शिवभारत ह्या महाराजांच्या चरित्र काव्यात "महाराजांच्या पंच-अग्नींपैकी एक" असे केले आहे.  
असा होता स्वराज्यासाठी कामी आलेला सगळ्यांत तरुण शिलेदार - रामजी पांगेरा!