पुणे पत्ता राज्यभाषा आणि इतर..

पुणे पत्ता राज्यभाषा आणि इतर..
नको इतकं प्रशस्त ऑफिस.. भलंमोठं टेबल, त्यावर बेदम पसारा!
नको इतकं फोम भरलेल्या खुर्च्या..
मोठ्या आसामींना भेटायला मी थोडा ओशाळतो ते बहुधा ह्या बाकी गोष्टींमुळे...
 
सदर आसामी आम्हाला कॉफी प्यायला लावून कोणाशी फोनवर बोलत होती.
 
डोळे बारीक करून,
"एवढं संपवतो मग तुमच्याकडे पाहू"
अशा आशयाच्या खुणा करून पुन्हा फोनमध्ये गुंतले.. 
त्यावर समाधानी होऊन निर्विकारपणे 
इतर नको असताना असलेल्या गोष्टींप्रमाणे,
नको असताना देखील सगळे संभाषण आम्ही ऐकत बसलो.
आसामी : "मिळेल ना? पाठवू का माणूस?" 
(पलीकडून बहुधा होकार मिळाला)
फोन ठेवून, समोरचा कॉर्डलेस उचलला. "सुभाषला पाठव!" आदेश गेले.
एक अमराठी इसम - अदबीने आत आला! 
आता, 
आमच्यापुढे त्याच्याशी हिंदीमध्ये, 
ते देखील आदरयुक्त बोलायचे
आणि आपण ते समजून घ्यायचे 
ह्या घटनेचे प्रेशर आसामी आणि सुभाष दोघांच्या देखील चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

आसामी : "मैंने बात करली हैं। "
('हैं',मधल्या अनुस्वाराचा हिमेशची आठवण काढत केलेला उच्चार, आवाजाच्या नुसत्या लयीनेच मुद्दा मराठीत समजवून सांगण्याचा हातखंडा असलेल्या त्या अस्सल पुणेरी माणसाला ही राजभाषा केविलवाणे करत होती) 
"आप जाओ अभी उधर!"
सुभाष : "ठीक है!" (म्हणत मागे सरकला, लवकर आटोपलं अशा आनंदाची रेष चेहऱ्यावर येण्यापूर्वीच...)
आसामी : "आप को पता है नं? कैसे जाने का?"
(पुण्याच्या मध्यवर्ती भागात, मध्यमवयीन अनुभवी गृहस्थ आता एका अमराठी माणसाला आदरयुक्त अनेकवचनात पत्ता सांगणार होता. प्रेशर घेण्याची पाळी आता राजभाषेची होती)
आसामी : "एक काम करो! नीचेसे लेफ्ट लो! अपनी वो ग्यानेश्वर खानावळ हैं ना.."
(हिंदीत 'ज्ञ' चा उच्चार 'ग्य' होतो हे शिकले होते शाळेत, पण खानावळीला काय म्हणतात हे कुठे माहिती होते त्यांना!)
क्षणभर थांबून, 
आसामी : "खानावळ बोले तो.. "
(सुभाषने खुलासा करू नाही दिला, माहिती आहे असं सांगितलं आणि राज्यभाषेने कपाळावरला घाम टिपला) 
आसामी : "हां, तो उधरसे (पुणेरी हुशारी सर्वनामाच्या मागे लपली) सिध्ध्ये जाव!"
('ध'वरच्या जोराने किती लांब ते सुभाषला कळणे अपेक्षित होते) 
आसामी : "ठीक हैं ना! अंत में... (आयत्या वेळी सुचलेल्या "अंत"मुळे आसामी अगदी अंतरातून खूश झाल्याचे त्यांचा चेहरा सांगत होता) 
अंत में, आप को हलवाई मीलेंगा। क्या नाम है उस का..."
(आसामी आता आसमंतात हरवले)
आसामी : "रुक एक मिंट!" (आठवायचा भरात आदर विसरला होता) 
आसामींनी गुगलवर तपासले... 
"हां, (एकदम युरेका मोमेंट आल्याने ते म्हणाले) पूजा स्वीट के याहां से....."
"अरे एक मिंट (ही दुसरी वेळ होती, 'मिंट' हे 'मिनिट' ह्या एककाचे मराठी भाषांतर आहे, हे आसामी विसरले होते)
एका सीमेनंतर युरेका मोमेंटचे कवित्व जाते, आणि "च्यायला हे आधीच कळायला हवं होतं!" अशा आशयाचा निव्वळ बावळटपणा उरतो!
काहीसं तसंच झालं आणि आसामी बोलते झाले
: आप के में गूगल मैप रहेंगा ना? 
(उत्तराची वाट न पाहतच..) उस में ना.. 'दाढ़ी सेठ' डालो! 
आणि एकदम आमच्याकडे पाहून हसत, "त्याची दाढी खूप मोठी आहे म्हणून त्याला दाढी सेठ म्हणतात सगळे!"
आम्हीही तत्परतेने दात काढले!
आता सुभाषकडे पाहत, "अरे नाही, वो मत डालो! 'जोहर पेपरर्स' डालो। देखो क्या मिलता है!"
थोडे थांबून, "एक मिंट हं! (ह्यावेळेस मिंट सोबत हं पण!) मैं देखता हुं।"
पुढे ती मोठी दाढी स्वतः गूगल मॅपवर टाकून पत्ता तपासू लागले बरोबर आहे की चूक ते!
(आम्ही आणि सुभाष आपापल्या कुलदैवताला "पत्ता बरोबर असला तर काय काय नवस देऊ" ते आपापले ठरवू लागलो) 
आसामी : (आमचे नवस पूर्ण होऊ न देत) "अरे नहीं, ये पुराना हैं!"
"आप रुको!"
आसामी कॉर्डलेस उचलत आदेशकर्ते झाले, "विजाला पाठव!"
विजा नावाचा बेदम मुरलेला आणि अजागळ मनुष्य केबिन मध्ये अवतरला! 
नव्या हुरुपाने आसामी बोलते झाले, "विजा.. ह्यांना दाढी सेठकडे ने रे!" 
जितक्या वेगात हुकूम सुटला तितक्याच आरामात विजा अगदी काही म्हणजे काहीच ऐकू नाही आले असा चेहरा ठेवून स्थितप्रज्ञ पणे उभा राहिला! 
आसामी "अरे दाढी सेठ रे, ते आपले जोहर वाले!"
विजा तसाच... 
आसामींनी आधीचा राज्यभाषेमधला पत्ता विजाच्या आईच्या भाषेत (ठेवणीमधल्या 'भ' कारांसकट) सांगितला.
सुभाषने मध्ये थांबवून "मैं ढूंढ लूंगा!" वगैरे प्रयत्न केले 
पण, आसामींना विजाकडूनच हवं होतं आता! 
"आप रूको हो!" (हे सुभाषला)
"क्या रे ऐ... (हे चुकून राज्यभाषेत विजाला!)
"इतना सिंपल पता पता नहीं तेरे को?"
(स्वतःच्याच पता पता वाल्या रज्यभाषेय पतनामुळे बहुदा भानावर येऊन परत आईच्या भाषेचा पदर पकडत पुढे म्हणाले,)
"किती दिवस झाले पुण्यात येऊन?"
(खरं म्हणजे मनापासून सुभाषला विचारायचा होता तो प्रश्न हक्काच्या विजावर गाजवला आसामींनी, 
कितीही झालं तरी 'आदरयुक्त अपमान' ह्या मध्ये असलेली मराठी भाषेची सर आसामींच्या राज्यभाषेला तरी नव्हती..) 
इकडे विजा मात्र शांत!
"अरे तो पाट्याचा गणपती नाही का? त्या रबरवाल्या भोऱ्याच्या दुकानामागचा? आपला कानन तिकडेच राहतो बघ टिळक सोसायटी की काय नाव होतं बघ त्याच... "
जवळ जवळ १५ एक खूणगाठा ऐकून आम्हा चौघांना पण नक्की जायचं कुठं आहे ह्याबद्दल संभ्रम व्हायला लागला होता! 
इतक्यात विजाला काय झाले कोणास ठाऊक, 
"आलं ध्यानात!" करून सुभाषला जवळ जवळ हाताने ओढत "चलो हो!" म्हणाला आणि गेला सुद्धा बाहेर! 
स्तंभित झालेल्या आमच्याकडे अत्यंत प्रेमाने बघत आसामी आम्हाला म्हणाले, 
"हं बोला आता!"