'अदब मुटियारां' - धमाल पंजाबी चित्रपट

गेल्या पावणेदोन वर्षांत घरबसल्या कायकाय करता येईल ते सारे धुंडाळून झाले. स्वैपाक, घरकाम, पुस्तके, संगीत, चित्रपट, खाणे-पिणे आदि जुन्या गोष्टी होत्याच. त्यात कायकाय अजून करता येईल ते बघण्याच्या नादात पंजाबी चित्रपट पाहणे हे एक गावले.

हिंदी चित्रपट पाहणाऱ्यांना पंजाबी बरेच कळते (असे वाटते). सुरुवातीच्या काळापासून हिंदी चित्रपट सृष्टीवरचा पंजाबी पगडा लक्षात घेतला की याची संगती लागते. अगदी सुरुवातीच्या काळातले बॉम्बे टॉकिजमधले बंगाली वर्चस्व सोडले तर राज-दिलीप-देव या त्रयीपासून पंजाबी वर्चस्व सुरू झाले असे म्हणता येईल, जरी त्या त्रयीने कधीच 'पणजाबी'पणा मिरवला नाही तरी. शम्मी कपूर, शशी कपूर, धर्मेंद्र, प्रेम चोप्रा, राजेंद्रकुमार, सुनील दत्त, विनोद खन्ना, प्रेमनाथ, बलराज सहानी, जितेंद्र असे मूळ पंजाबी असलेले नट गर्दी करून होते. किशोरकुमार, शत्रुघ्न सिन्हा, सुजीतकुमार, बिश्वजीत हे काही अपवाद. नंतर अमिताभ बच्चन हा ठळक अपवाद, ज्याने राजेश खन्नाला गडगडवले. राजेश खन्नाही पंजाबीच. नंतर परत अनिल कपूर, अमरीश पुरी, सनी देओल, संजय दत्त, अजय देवगण, ओम पुरी, शक्ती कपूर, गोविंदा, आदि. थोडक्यात, पंजाब मंडळ जोरात होते नि आहे.

मोजण्यातून खानावळ सोडावी लागेल, जरी दिल्ली का छोरा शाहरुख खान 'चक दे' करीत असला तरी.

आता ही यादी फक्त नटांची आहे. मी पुरुषप्रधान संस्कृतीचा पुरुषी वर्चस्ववादी पाईक आहे हे मी मान्य करतो. स्त्रीमुक्तीवाद्यांनी ऑनलाईन/ऑफलाईन मोर्चे काढायची गरज नाही.

आणी तरीही यात बरीच नावे राहून गेली आहेत. ती कृपया आपापल्या मगदुराप्रमाणे भरून घ्यावीत. माझे मत काहीही असले तरी मी चित्रपटसृष्टीचा अधिकृत/अनाधिकृत इतिहासकार नाही हेच खरे आहे. त्यामुळे "या अपुऱ्या यादीत 'ह', 'ळ', 'क्ष', 'ज्ञ' ही महत्वाची नावे नाहीत यातूनच लिखाणाचा उथळपणा उघड दिसतो" असे टंकण्यात वेळ घालवू नये. राहवले नाही तर एवढाच मजकूर कॉपी पेस्ट करून प्रतिसादात चिकटवावा, आपापल्या कुवतीप्रमाणे 'ह', 'ळ', 'क्ष', 'ज्ञ' यांच्या जागी नावे पेरावीत. चार अक्षरे संपली तरी मराठीत अजूनही अक्षरे आहेत याची नोंद घ्यावी नि पुढे व्हावे. असो.

पण फक्त "सोणी कुडी", "ओ पापे", "कित्थे जाणा", "की फर्क पैंदा", "पैरी पौणा", "रब दी सौं", "मुंडा मान गयासी" आदि फुटकळ तुकड्यांवरून अख्खी पंजाबी भाषा-संस्कृती कळाली असे वाटणाऱ्यांच्या धाडसाला सलाम करून पुढे गेल्याशिवाय खरी गंमत कळत नाही.

आणि अस्सल पंजाबी लहेजात बोलणाऱ्यांची संख्याही तुलनेने कमी. ओम पुरी, कुलभूषण खरबंदा अशी काही नावे सुचतात. पण परेश रावलसारख्या चांगल्या नटानेही 'ओये लकी, लकी ओये' किंवा 'दे दनादन' सारख्या चित्रपटांत नकली पंजाबी लहेजात बोलून काव आणला होता.

एवढे तेल सवयीप्रमाणे जाळल्यावर आता मूळ विषयाकडे. 'अदब मुटियारां' हा २०१९ सालचा पंजाबी चित्रपट. सरकारी नोकर असल्याच्या थाटात मी निरुद्देश, निर्विकार भावनेने आंतरजाल तपासत होतो तेव्हा गावला. यातील 'अदब' चा अर्थ उर्दू 'अदब' प्रमाणेच. जरी स्पेलिंग Ardab असले तरी. आणि 'मुटियार' म्हणजे विशी-बाविशीच्या तरुण मुली. अशा मुलींची अदब किंवा समर्पक मराठी शब्द म्हणजे 'ष्टाईल' असा साधारण अर्थ.

एका खाजगी पतसंस्थेत वसुली अधिकारी म्हणून काम करणारा विकी. वसुली अधिकाऱ्याला न शोभण्याइतका मवाळ. त्यामुळे 'तुम्ही कुणालाही कर्ज वाटत फिरता आणी वसूलताना माझी पंचाईत होते' अशी कुरकूर करण्यापलिकडे फारसे काही करू शकत नाही. त्याच्या मालकाची मुलगी श्रुती पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला जाऊ घातली आहे. जाण्याआधी घरच्याच कंपनीत ती मालकिणीचा तोरा दाखवत मिरवते आहे. विकीच्या आई-वडिलांचा प्रेमविवाह. वडील कुडमुडे डॉक्टर. आई घरकामाला बोटही न लावता नवऱ्याला राबवून घेणारी. वडील एका बाबाचे परमभक्त. श्रुतीची आईही त्याच बाबांची परमभक्त.

विशी-बाविशीची तरुण तडफदार बब्बू. काळ्या रंगाच्या महिंद्रा थर मधून दणदणीत आवाजात गाणी ('मी बाटलीसारखी, घोटाघोटाने मजला पी') गात हिंडणारी आणि छेड काढणाऱ्या (खरे तर छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या) मुलांना बेसबॉलच्या बॅटने खणखणीत धुणारी. शिवाय नंतर 'नंबर लिहून घ्या, हाडांच्या डॉक्टरचा आहे. माझे नाव सांगा आणि वीस टक्के सवलत मिळवा' असा माजही आहे.

बन्सल हे एक मारवाडी जैन व्यापारी घराणे. तीन भावांत रिंकू या धाकट्या भावाचेच लग्न राहिले आहे. कारण? त्याच्या लग्नात नको तितके नाक खुपसणारे त्याचे वहिनीद्वय.

बब्बूची गाठ आधी विकीशी पडते. बब्बू तीन मुलांना रस्त्यावर धोपटत असतान विकी बघतो. मग बब्बू विकीच्या संस्थेत (चढ्ढा फायनान्स) नोकरीसाठी येते आणि शिक्षणात (खरे तर परीक्षेत) चमकदार कामगिरी नाही म्हणून श्रुती तिला धुडकावून लावते. विकी बब्बूला वसुली अधिकारी म्हणून नोकरीत रुजवू पाहतो. बब्बू रुजते, नव्हे, तरारून वाढते. विकीचे काम आपसूक होते.

श्रुती या आत्मकेंद्रित मुलीला अर्थातच हे आवडत नाही. मग विकी-बब्बू जोडीला नामोहरम करण्यासाठी ती त्यांना कर्ज न थकवलेल्या बन्सल घराण्यावर सोडते. बब्बू जाऊन रिंकू बन्सलची इसुझू डीमॅक्स उचलून आणते. चढ्ढा फायनान्सच्या मालकाकडून यथायोग्य ओरडा खाल्ल्यावर बब्बू ती गाडी परत करायला जाते आणि रिंकू-बब्बू जोडी जमते.

विकीचे वडील बाबाजींच्या सत्संगात जाऊन मुलाचे लग्न होत नाही अशी कैफियत मांडतात. संकटमोचक बाबाजी भक्तांवर ती कैफियत रिडायरेक्ट करतात. एक भक्त महिला उठून आपल्या मुलीसाठी हे स्थळ योग्य असल्याचे जाहीर करते. ती श्रुतीची आई. चढ्ढा फायनान्सला मूळ पतपुरवठा तिच्या वडिलांचा असल्याने तीही नवऱ्याला फारसे मोजत नाही. अशी ओढूनताणून विकी-श्रुती जोडीही जमते.

दोन्ही लग्ने होतात. ती कशी? ती लग्ने टिकतात की मोडतात? या आणी तदनुषंगिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चित्रपटच पहायला हवा.

काम करणाऱ्या यच्चयावत मंडळींनी कमाल केली आहे.

बब्बूचे काम सोनम बाजवाने केले आहे. संवाद, देहबोली, नेत्रबोली सगळ्याच बाबतील खणखणीत कामगिरी. ही पंजाबी चित्रपटसृष्टीतली सध्याची आघाडीची अभिनेत्री. एकदोन फुटकळ चित्रपट सोडता अजून हिंदीत न आलेली. तिचे इतरही काही पंजाबी चित्रपट पाहिले. त्याबद्दल सवडीने.

श्रुतीचे काम मेहरीन पिरझादाने केले आहे. ही मूळ पंजाबी मुलगी जास्ती करून तमिळ नि तेलुगु चित्रपटसृष्टीतच रमली. 'फिल्लौरी'मधली 'अनु गिल' या भूमिकेतून हिंदीत आली पण हिंदीतला तिचा तो एकच चित्रपट. 'डीएसपी देव' या चित्रपटातून पंजाबीत शिरली, पण तो आणी 'अदब मुतियारां' सोडता अजून काही नाही. बाकी सगळे चित्रपट तेलुगु किंवा तमिळ. मुद्दाम लिहिण्याचे कारण तिचा पंजाबी लहेजा अजिबात कतरिना कैफी वा जॅकलिन फर्नांडिसी हिंदीसारखा उथळ आणि उपरा नाही.

विकीचे काम निंजाने (अमित भल्ला) केले आहे. हा पंजाबीतला एक गायक. चारपाचच चित्रपटांत अभिनय केलेला. पण अजिबात नवशिका/नवखा वाटत नाही. याच चित्रपटाच्या आगेमागे आलेल्या 'दूरबीन' या पंजाबी चित्रपटामध्येही नायक, आणि तिथेही सुंदर काम.

रिंकूचे काम करणाऱ्या अजय सरकारियाचा हा पदार्पणाचा चित्रपट. पण त्याचा तणाव कुठेच दिसत नाही. सहज वावर आणि गरज पडेल तिथे गरज पडेल तेवढा अभिनय हा सोपा वाटणारा आणि अति-अवघड असलेला मंत्र त्याने पाठ करून टाकला आहे. त्याचा दुसरा पंजाबी चित्रपट अजून यायचा आहे.

विकीची आई म्हणजे उपासना सिंग. 'हंगामा' मधल्या पोपट मारवाड्याची 'दाल फ्रायमें डब्बल तडका' अशी फाकडी बायको. ती बऱ्याचशा पंजाबी चित्रपटांत दुय्यम भूमिकांत असते. तशीच दिसते आणि तसाच अभिनय करते. पण इथे खपून जाते.

विकीचे वडील म्हणजे बी एन सिंग. हाही बऱ्याचशा पंजाबी चित्रपटांतून दुय्यम भूमिका साकारणारा नट. एरवी त्याचे बोबडे नि अडखळणारे बोलणे त्रासदायक वाटते. पण इथे 'कोंबडीने टोचलेल्या' नवऱ्याच्या भूमिकेसाठी ते एकदम फिट्ट बसते.

श्रुतीच्या आईचे काम नवनीत निशानने केले आहे. १९९३ सालच्या 'तारा' या मालिकेतून ओळखीची झालेली आणि अनेक हिंदी चित्रपटांतून दुय्यम/तिय्यम भूमिकांत दिसणारी. इथे मिळाली तेवढी भूमिका तिने मन लावून केली आहे.

श्रुतीच्या वडिलांचे काम इंदरपाल सिंग या अभिनेत्याने केले आहे. दोनचारच चित्रपटांतून काम केलेला. पण विनोदाची उत्तम जाण. चेहऱ्यावरची रेषाही न हलवता समोरच्याची विकेट काढणे हे जसपाल भट्टी करत असे. डोळे बटाट्यासारखे मोठे करून पण बाकी काहीही 'अल डुर्रर्र'गिरी न करता इंदरपाल सिंगही तशीच विकेट काढतो. याला अजून चित्रपटांत बघायला नक्कीच आवडेल.

रिंकूच्या वहिनीद्वयाचे काम चेष्टा भगत आणि मायरा सिंग यांनी केले आहे. दोघींचा चित्रपट असा हा पहिलाच असावा. पण पंजाबीपेक्षा हिंदीतच बोलण्याचा अट्टाहास करणाऱ्या बन्सल जावांची भूमिका दोघींनीही फार चांगली केली आहे.

बिट्टू आणी सुनील बन्सल या बंधूंचे काम अनुक्रमे सुदेश लाहिरी आणि राजीव मेहरा यांनी केले आहे. दोन टक्के स्क्रीन प्रेझेन्स मिळाला तरी त्यातही एकादा सिक्सर सहजगत्या मारून जाणे हे काम हे दोघेही लीलया करतात.

चित्रपटातले संवाद आणि त्यांचे सादरीकरण फारच दिलखेचक आहेत. विकीचा मुळमुळीतपणा, बब्बूचा खडके-तडकेवाला स्वभाव, श्रुतीचा कॉन्व्हेंटी तुसडेपणा आणि रिंकूचा रक्तात भिनलेला व्यापारीपणा हे संवादातूनही स्पष्ट दृग्गोचर होतात.

संवाद समजण्यासाठी सबटायटल्सची गरज बहुतेकांना लागेल. ती सबटायटल्स 'हिंदी'मध्ये घेणे गरजेचे आहे. इंग्रजी सबटायटल्स घेऊ इच्छिणाऱ्यांनी इकडे न फिरकलेले बरे. वेळ जात नसेल तर त्यांनी झुणका या शब्दाचे इंग्रजीत एकशब्दी भाषांतर करीत बसावे.

या (खरे तर 'चंडीगढ अमृतसर चंडीगढ' या) चित्रपटाने सुरू झालेला पंजाबी चित्रपट पाहण्याचा छंद आता रुजला आहे. गेल्या सहा महिन्यांत पस्तीसेक चित्रपट आणि पाचेक मालिका पाहून झाल्या. आता सबटायटल्सची गरज लागत नाही. त्यातल्या अजूनही बऱ्याच चित्रपटांबद्दल लिहायचे योजले आहे. होईल तसतसे इथे चढवीनच.