'इस्तंबूलला जाऊन डावीकडे वळ' ऊर्फ शर्लीपासून काढलेला पळ - एक प्रवासवर्णन

साल १९६९. एका अस्वस्थ दशकाचा शेवट.

काय काय दिले या दशकाने?

रॉक एन रोल, पॉप म्युझिक, एल्व्हिस प्रीस्ले, बीटल्स, मिनिस्कर्ट्स, क्यूबन मिसाईल क्रायसिसचा शेवट, क्रुश्चेवची सत्ताच्युती, केनेडीचे ऊर्ध्वगमन, मानवाचे चंद्रावर पाऊल, अगडबंब अमेरिकन कार्स, पॅरिसमधल्या दंगली इ इ.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जन्मलेली पिढी आता तिशीच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. कथानिवेदक त्यातीलच एक. 'तिशीला पोचलास, आता तरी आयुष्यात काहीतरी कर' या मातृआज्ञेला मान देण्याचा इरादा बाळगणारा.

त्याला दिसते एक जाहिरात - "आशियात वृत्तांकन करण्यासाठी एका पत्रकाराची गरज. भरपूर प्रवास करणे हा नोकरीचा महत्त्वाचा भाग."

आता कथानिवेदक खऱ्या अर्थाने पत्रकार नव्हता, चारदोन फुटकळ लेख सोडले तर. पण प्रवासाची आवड खूप. म्हणून पत्रकार असल्याचा आव आणून त्याने अर्ज तर करून टाकला. आणि विसरून गेला.

त्या वृत्तसंस्थेकडून लंडन कार्यालयात मुलाखतीसाठी बोलावणे आले. लंडनचे कार्यालय किती मोठ्ठे असेल, नोकरी मिळाल्यावर (मुलाखतीसाठी बोलावणे आले म्हणजे नोकरी मिळणारच) काय काय सुविधा मिळतील याच्या रोमांचक कल्पना मनाशी घोळवत निवेदक मुलाखतीसाठी गेला.

मुलाखत फारच एकतर्फी झाली. आलेल्या टेलेक्सची पाने प्रिंटरमधून काढून पाहताना आणि शर्ली नामक कार्यालय व्यवस्थापिकेला ओरडून सूचना देताना मध्येमध्ये व्हिक्टर नामक साहेबाने ती वृत्तसंस्था काय करते हे तुटक तुटक सांगितले. कपडे वाळत घालायच्या दोरीवर चिमटा लोंबत असावा तशी त्याच्या खालच्या ओठावर सिगारेट लोंबत होती. शब्दांचा धबधबा थांबवून व्हिक्टरने हात पुढे केला, "आमच्या आस्थापनेत स्वागत. कधी सुरू करतोस? आणि हां, तुला कलकत्ता कार्यालयात रुजू व्हायचे आहे".

"कलकत्ता? ते तर भारतात आहे"

"हो हो, कालपर्यंत तरी होते. तर तुझ्यासाठी एका कारचीही व्यवस्था केली आहे. तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. आणि घोड्यावरून हिंडणे जमणार नाही तुला."

"कलकत्त्याला कसा जाऊ?"

"एकदम सोपे आहे. इस्तंबूलला जा, आणि तिथून डावीकडे वळ. हे कागद जाताना शर्लीला दे, ती सगळे समजावेल तुला" असे म्हणून व्हिक्टरसाहेबाने टेलेक्सचे फाडलेले कागद निवेदकाच्या हातात कोंबले.

शर्ली ही कार्यालय व्यवस्थापिका. तीही अतिधूम्रपानाची भोक्ती. धूम्रपानाने लोकांची हाताची बोटे पिवळी पडतात, शर्लीचे केस पिवळे पडले होते (असा निवेदकाचा कयास).

"कारबद्दल काहीतरी..." निवेदकाचे वाक्य पूर्ण होण्याआतच शर्लीने त्याच्यापुढे एक किल्ली फेकली.

"ही घे"

ती किल्ली साक्षात 'जग्वार' या नाममुद्रेच्या चारचाकीची होती.

त्या गाडीला एकही ओरखडा येऊ देऊ नकोस, वाटेत कुठे उगाच रेंगाळू नकोस, पैसे उगाच खर्च करू नकोस या सगळ्या सूचनावर्षावात निवेदकाला 'जग्वार' घेऊन साधारण आठ हजार मैल चालवणे या दिलखेचक कल्पनेने भारून टाकले.

तत्कालीन परिस्थितीत - निम्मा युरप अजून कम्युनिस्ट होता, काही देशांत हुकूमशाही होती, काही देशांत पत्रकारांकडे संशयाने बघितले जात असे (आणि जमल्यास बंदिवान केले जात असे) - केलेला हा प्रवास या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे.

तो प्रत्यक्षच वाचणे योग्य.

एक निरीक्षण. ब्रिटिश लेखकांची आशियाई देशांकडे बघण्याची दृष्टी बऱ्याचदा पूर्वग्रहदूषित असते. 'कोणे एके काळी हे सगळे आपले गुलाम होते' ही भावना डोकावते. या पुस्तकाच्या पाचसहा वर्षे आधी घडलेले डर्वला मर्फी चे 'फुल टिल्ट' आणि वीसेक वर्षांनी प्रसिद्ध झालेले अलेक्झांडर फ्रेटरचे 'चेजिंग द मॉन्सून' या पुस्तकांत मला तरी हे जाणवले. अर्थात या पुस्तकात रिचर्ड सॅव्हिनचा पूर्वग्रह इतर दोघांच्या बाबतीत फारच मवाळ आहे हेही नोंदवून ठेवतो.

एक गंमत म्हणजे कथानक घडल्यानंतर थेट पन्नास वर्षांनी ते लेखकाने शब्दबद्ध केले. २०१९ साली. इतका काळ थांबण्याचे कारण काय कुणास ठाऊक. कारण लेखकाचा लेखनप्रवास साधारण पन्नास वर्षांपूर्वीच सुरू झाला.

या लेखकाची इतरही पुस्तके वाचनयोग्य दिसतात. बघायला पाहिजे.

-------------------------------------------------------------------------------------

टर्न लेफ्ट ऍट इस्तंबूल: एस्केपिंग शर्ली - द अल्टिमेट, मॅड, सिक्स्टीज रोडट्रिप

लेखक - रिचर्ड सॅव्हिन

प्रकाशन - ३० जून, २०१९

किंडल आवृत्ती ऍमेझॉन इंडिया वेबसाईटवर उपलब्ध