मालवणी कोंबडी

  • कोंबडी १ किलो
  • कांदे ७ नग (मध्यम)
  • टोमॅटो १ नग (मध्यम)
  • कोथिंबीर ४ टेबलस्पून
  • हळद १ टी स्पून
  • तिखट १ टेबलस्पून
  • मालवणी मसाला १-१/२ टेबलस्पून (शीग लावून)
  • तेल १ वाटी (आमटीची)
  • सुक्या खोबऱ्याचा किस ५ टेबलस्पून (शीग लावून)
  • आले १ इंच
  • लसूण ७-८ पाकळ्या (मोठ्या आकाराच्या)
  • मीठ चवीनुसार.
१ तास
७-८ जणांसाठी

कोंबडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून, धुऊन, अर्धा तास निथळत ठेवावेत.
आलं लसूण वाटून घ्यावे.
६ कांदे गॅसवर भाजून घ्यावेत. कांदे साले न काढता, मध्यम आंचेवर, बाहेरील आवरण काळे पडे पर्यंत आणि कांदा शिजून मऊ होई पर्यंत भाजावेत. 
१ कच्चा कांदा आणि १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
सुक्या खोबऱ्याचा कीस मंद आंचेवर कोरडाच भाजून घ्यावा.
भाजलेल्या कांद्याची, काळी पडलेली, वरची साले काढून कांद्याचे ४-४ तुकडे करावेत. (शिजलेला कांदा किंचित बुळबुळीत होतो आणि सुरी सरकण्याची शक्यता असते. घाई नको. काळजी घ्यावी.) हे कांद्याचे तुकडे आणि भाजलेले खोबरे शक्य तितक्या कमी पाण्यात गंधा सारखे मुलायम वाटून घ्यावे.

पातेल्यात १ वाटी तेल ओतून मध्यम आचेवर तापावयास ठेवावे. तेल तापले की त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतावे.
कांदा गुलबट रंगावर आला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर (२ टेबलस्पून ) टाकून परतावे.
टोमॅटो शिजला की त्यावर कोंबडीचे तुकडे टाकून परतावे.
कोंबडीचे तुकडे साधारण ३-४ मिनिटे परतल्यावर त्यात हळद, तिखट, मीठ आणि मालवणी मसाला टाकून परतावे. पाणी कमी असेल तर अगदी अर्धी वाटी पाणी टाकावे.
झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवावे.
कोंबडी शिजली की त्यात कांदा-खोबऱ्याची पेस्ट टाकून नीट मिसळून घ्यावे.
रस्सा दाटसरच राहील इतपत पाणी घालून रश्शाला, एखादी चांगली, उकळी आणावी. आणि आंच बंद करावी.
लज्जतदार, झणझणीत मालवणी कोंबडी तयार आहे.
टेबलवर घेण्याच्या वेळी वरतून, उरलेली (२ टेबलस्पून), कोथिंबीर भुरभुरावी. (कोथिंबीर टाकल्यावर झाकण ठेवू नये, कोथिंबिरीचा रंग उतरतो).

शुभेच्छा....!

मालवणी कोंबडीचा रस्सा दाटसर असावा.
वर, तेलाचा किंचित तवंग असावा.
मालवणी कोंबडी तिखट असावी. (आवडी नुसार तिखटाची मात्रा वाढविण्यास हरकत नाही.)

याच प्रमाणात आणि पद्धतीत 'मालवणी मटण' बनवावे. फक्त मटण पूर्ण शिजल्याशिवाय कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकण्याची घाई करू नये.

 

प्रयत्नांती परमेश्वर. (इथे परमेश्वर म्हणजे मालवणी कोंबडी)