वेड

... म्हणजे तू हसल्यावर मीही हसणं... तुझे अश्रू माझ्या डोळ्यांच्या पळवाटेनं बाहेर काढण्याचा भाबडेपणा... तुझ्या आवजातला गोडवा कान भरून पिऊन घेणं... मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारताना तुझ्या नुसत्या उल्लेखानंही लाजाळूच्या पानांसारखं संकोचून चेहऱ्यावरची लाली झाकण्याची केविलवाणी धडपड... तुझ्या आजूबाजूलाच असण्याच्या जाणिवेवर माझा प्रत्येक श्वास सांभाळणं... आणि ती कसरतही अपुरी की काय म्हणून तू नसतानाही तुझ्याशी फोटोंमधून, शब्दांमधून, चित्रांमधून बोलणं... प्रत्येक गाण्यातून फक्त तुलाच गुणगुणणं... आणि त्याचबरोबर...


... दोन समांतर रेषा अनंत अंतरावर मिळतात या भूमितीतल्या सिद्धांतावर प्रामाणिक श्रद्धेमुळे त्या अनंताच्या शोधात चालत राहणं... मनातल्या मनात तुझ्या आठवणींची कुपी उधळून त्यांच्या सुगंधाच्या सोबतीनं आकाशात पडलेल्या चांदण्याच्या सड्यात तुलाच शोधू पाहणं... त्यातलीच एखादी चांदणी जमिनीकडे झेपावली तर डोळे बंद करून तिला मिठी मारण्यासाठी हात फैलावणं... शून्यात लागलेली नजर प्रयत्नपूर्वक दुसरीकडे वळवून तिकडे नव्याने शून्य उभारणं... आणि मग नेहमीसारखंच तुझ्याच आठवणींच्या कुशीत शांतपणे पहुडणं...


...या माझ्या शून्याबाहेरची शहाणी दुनिया माझ्या भाबड्या शब्दपसाऱ्यालाच बहुतेक "वेड" म्हणते...