मिरच्यांचा ठेचा

  • हिरव्या मिरच्या- जाड - पाव किलो
  • लसूण - १ गड्डा (तिखट जास्त हवे असल्यास २ गड्डे)
  • दाण्याचा कूट १ चमचा
  • कोथिंबीर व मीठ - चवीनुसार
३० मिनिटे
कसा खाणार त्यावर आहे.

हिरव्या मिरच्या तव्यावर किंवा कढईत भाजून घ्याव्यात.  भाजताना त्यावर अर्धा चमचा तेल सोडावे. पांढऱ्या होत आल्या की लगेच खलांत टाकाव्यात. (काळपट होईपर्यंत भाजू नयेत).

त्याबरोबर १ गड्डा सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घ्याव्यात. चवीनुसार मीठ बरोबर घेऊन खलबत्त्यात चांगल्या ठेचाव्यात. लसूण व मिरच्या चांगल्या एकजीव होई पर्यंत ठेचल्यावर एका वाडग्यात काढून त्यावर १ चमचा दाण्याचा कूट व बारीक चिरलेली कोथिंबिर टाकून परत एकजीव करणे.

झाला ठेचा तयार !

१. ठेच्याला मिरच्या जाड, लांब व पोपटी रंगाच्या मिळाल्यास उत्तम  (काळपट हिरव्या नकोत).

२. मिरच्या गरम असतानाच ठेचायला घ्याव्यात. तिखटाची मात्रा लसणाने कमी/जास्त करावी. ठेचताना थेंबभर तेल अधून मधून वरून सोडत राहिल्यास ठेचा चवीला सुंदर होतो तसेच ठेचायला सोपा जातो.

३. ठेचणे हा प्रकार मन लावून करावा - मिक्सर मधील ठेच्याला चव येत नाही. - लाकडी बडगी व ठेचणी असल्यास उत्तम.

४. दशम्या, भाकरी, ठेपला, पोळी तत्सम कुठल्याही पदार्थाबरोबर छान लागतो.

५. प्रमाणात सेवन करणे; दुसऱ्या दिवशी माझ्या नावाने शंख करू नये.

आई-