मराठीकरण आणि संगणक

संगणकावर जास्तीत जास्त मराठी कसे आणावे ह्याचा विचार करीत असता हा लोकसत्तेतील लेख वाचनात आला. संगणकावर मराठी आणण्यासाठी कुठे कुठे कश्यास्वरूपाचे काम चालले आहे त्याची खुलासेवार माहिती तर त्यात आहेच; परंतु तेव्हढेच नाही तर एखाद्या तांत्रिक विषयावर मराठीत सोप्या आणि बिनचूक भाषेत कसे लेखन करावे ह्याचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे.

संगणकीय क्षेत्रातील अनेक तांत्रिक शब्दांसाठी शोधलेल्या अतिशय सोप्या आणि अर्थवाही प्रतिशब्दांची त्यात खाणच आहे. वाचनासाठी आणि त्यावर मराठीतून चर्चा करता यावी ह्या उद्देशाने तो जसाच्या तसा येथे उद्धृत करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र मूळ लेखातले इंग्रजी शब्द गाळले आहेत. पाहा बरे तुम्हाला ते मूळ इंग्रजी शब्द शोधायची गरज पडते का ! अश्या शब्दाच्या जागी () असे लिहिले आहे. लोकसत्तेतील मूळ लेख येथे वाचा.



नवा मनू


आजचं युग हे संगणकाचं युग आहे. मात्र, संगणकाची भाषा आणि स्थानिक भाषा या वेगवेगळ्या असल्याने सामान्य माणसांपर्यंत संगणकीय क्रांतीचे लाभ हवे तितके पोहोचलेले नाहीत. ही त्रुटी दूर करण्याकरिता जगातील निरनिराळ्या भाषांचा संगणकीय भाषेशी मेळ घालण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्यामुळे संगणक तळागाळापर्यंत पोहचून विकासाचे नवे आयाम जनसामान्यांपर्यंत पोहचतील. या प्रकल्पांतर्गत आपल्याकडेही जोमाने संशोधन सुरू असून, त्यामुळे संगणकाद्वारे विविध भाषांत आदानप्रदान सुलभरीत्या होऊ शकेल. दोन वेगवेगळ्या भाषांतील अद्ययावत माहिती व ज्ञान संगणकाच्या साहाय्याने परस्पर भाषांत भाषांतरित होण्याचा टप्पा आज दृष्टिपथात आला आहे. जगद्व्यापी खेड्याच्या ग्लोबल व्हिलेज संदर्भात ही एक मोठीच क्रांतिकारी घटना ठरणार आहे.


महाराष्ट्रातील सांस्कृतिक व्यासपीठावर मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. दुर्दैवाची गोष्ट अशी की, मराठी भाषेच्या व मराठी भाषकांच्या अस्तित्वाचा प्रश्न जेवढ्या हिरीरीने मांडला जातो, त्यामानाने तो ऐरणीवर मात्र घेतला जात नाही. मराठी वाङ्मय, मराठी संस्कृती, मराठी इतिहास यासाठी थोडेफार प्रयत्नही केले जातात. परंतु मराठी भाषा व मराठी भाषक यांचे भवितव्य खरोखरच उज्ज्वल बनवायचे असेल तर अशा प्रयत्नांची कक्षा रुंदावायला पाहिजे. केवळ मराठीच्या रिंगणात गरगरत राहणे पुरेसे नाही. विविध विषयांतील मराठी विद्वान, तज्ज्ञ यांची संख्या अजिबात कमी नाही. परंतु असे विद्वान, तज्ज्ञ व सामान्य मराठी भाषक यांच्यातील संपर्क पुरेसा संवादी नाही. सध्याच्या माहिती युगात मराठी माणसाला बाहेरच्या जगाची माहिती असणे व मराठी माणसाविषयी, मराठी भाषेविषयी बाहेरच्या जगाला माहिती असणे दोन्ही सारखेच आवश्यक आहे. माहितीच्या देवाणघेवाणीत संगणकाचीही अटळ भूमिका आहे, हे विसरून चालणार नाही.


१९९० नंतर भारतात संगणकाचा वापर सुरू झाला. ही सुरुवात योग्य रीतीने झाली नाही, अशी लोकांची भावना झाली. याचे एकमेव कारण म्हणजे यामुळे उगारली गेलेली बेकारीची कुर्‍हाड होय. अर्थातच त्यावेळी संगणकाच्या वापराला जोरदार विरोध झाला. पण ही परिस्थिती लवकरच पालटणार आहे. आता संगणक हा मागासलेल्यांचा विकास करणारा, बेकारी दूर करणारा, संपूर्णपणे मराठी तोंडवळ्याचा असू शकतो. संगणकाचा वापर करण्यासाठी, तसेच संगणक शिकण्यासाठी इंग्रजी अनिवार्य ठरण्याचे दिवस संपणार आहेत. अर्थात त्याकरिता मराठी भाषकांनीच काही करणे आवश्यक आहे. एकविसाव्या शतकाच्या ज्ञानयुगात ज्या भाषा संगणकीय माध्यमात प्रवेश करतील, त्यांनाच भवितव्य आहे. ज्या भाषा दुर्लक्ष करतील, त्या काळाच्या पडद्याआड जातील. संगणकाची भाषा संस्कृतीनिरपेक्ष होऊ शकते व त्या भाषेचे सार्वभौमत्व सर्वांनाच लाभदायक ठरणार आहे. मानवी भाषांमध्ये पूल बांधण्याचे काम करण्याची क्षमता संगणकीय भाषेत आहे. यामुळे इंग्रजी न येणार्‍यांकरिताही ज्ञानभांडार खुले होणार आहे. सर्वसामान्यांनी स्वतच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्यापासून वंचित राहण्याचे दिवस आता संपू शकतात. कारण आता सामान्य लोकांनाही माहितीची कवाडे उघडणार आहेत. अर्थात याकरिता मराठी भाषा व संगणकीय भाषा यांचा मेळ घालणे आवश्यक आहे.


मराठीच्या संगणकीकरणाला प्रोत्साहन देणे, त्याकरिता सुनियोजित पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. 'महाराष्ट्रात एक गाव एक संगणक' अभियानातर्फे नवी मुंबई येथील साधारण १००० युवकयुवतींनी व उर्वरित महाराष्ट्रातील सुमारे ५०० तरुणतरुणींनी संगणकविषयक तंत्रज्ञान व सामाजिक जाणीव या द्विमितीतील शिक्षण घेतले आहे. माहिती तंत्रज्ञान ()सेवाजाळे ग्रामीण स्तरावर पोहोचवण्याची सोय होत असताना मराठी स्थानिकीकरणाच्या प्रकल्पामुळे संगणक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. संगणकासंबंधातील सर्व कामे स्थानिक भाषेत करता येण्याची सोय करणे म्हणजे 'स्थानिकीकरण' () होय. संगणकातील पायाभूत चालक घडणीपासून () मराठीची रचना करणे हे मराठी स्थानिकीकरणात अपेक्षित आहे. संगणक चालू केल्यापासून बंद करीपर्यंत संपूर्ण मराठी दिसू शकतो. माहिती देवाणघेवाण करणारी उपकरणे (), माहितीची देवाणघेवाण दाखवणारी साधने () उदा. मॉनिटर, सीपीयू (), कळपट (),, () ,, संगणक पटल () वगैरे या सर्वांचे काम स्थानिक भाषेत चालण्याकरिता संगणक प्रणालीत () महत्त्वपूर्ण बदल करणे, स्थानिक भाषेत आज्ञावली () लिहिता येणे, भाषानिहाय मजकुराच्या आवाजात () व आवाजाचे मजकुरात () रूपांतर करणे हेही स्थानिकीकरणात समाविष्ट असते.


या गोष्टी शक्य होण्याकरिता प्रमाणीकरण ही पहिली पायरी आहे. युनिकोड() सारखे प्रमाणटंक (),, प्रमाण पारिभाषिक संज्ञावली () इत्यादी संदर्भात प्रमाणीकरणाचा विचार केला पाहिजे. भारतीय प्रौद्योगिक संस्था मुंबई भा. प्रौ. सं. मुं. () , एन. सी. एस. टी. मुंबई, सी डॅक येथे भारतीय भाषांकरिताच्या प्रमाणटंकासंदर्भात काम चालू आहे. व्ही. जे. टी. आयचे प्रा. जितेंद्र शहा यांच्यातर्फे संगणक पटलावर स्थानिक भाषेत मजकूर दिसण्यासाठी एक प्रकल्प मराठी, गुजराती इत्यादी भाषांकरिता राबविला जात आहे. स्थानिकीकरणाचे मल्याळी भाषेसाठीचे काम पूर्ण होऊन गावपातळीवर मल्याळी भाषेत संगणकाचा वापर केला जात आहे. हिंदी भाषेसाठीचे काम होत आले असून, आता मराठीसाठी काम चालू आहे. विविध भाषांतील स्थानिकीकरणाची यशस्वीता मानवी संपर्काच्या जागतिकीकरणात फलद्रुप होणार आहे. जगद्व्यापी खेड्याचे() खेडुत स्थानिक प्रश्नांना जागतिक पातळीवर धसास लावण्यात त्यामुळे यशस्वी होऊ शकतात.


आजमितीस स्थानिकीकरण हे ध्येय आहे. परंतु स्थानिकीकरणाचा साधन म्हणून वापर करण्यापर्यंतचा प्रवास व्हावयाचा आहे. मुंबईच्या भा. प्रौ. सं.मध्ये पुष्पक भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली याचे काम चालू आहे. स्थानिकीकरणाच्या सुलभीकरणासाठी अनेक प्रकारचे खास तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. एकीकडे लोकांच्या सामूहिक उन्नतीचे उद्दिष्ट, तर दुसरीकडे नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचे कोड पुरविण्याचे ध्येय! या दोहोची सांगड घालणारे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मानवाने आपल्या प्रज्ञेतून प्रतिसॄष्टीची निर्मिती करण्याचे स्वप्न नेहमीच पाहिले आहे. प्रतिजीव () हे त्याचे प्राणिशास्त्रीय अवतरण आहे, तर संगणक हे त्याचे तर्कशास्त्रीय अवतरण आहे. मानवरचित बुद्धिमत्ता () या क्षेत्रातील संशोधकांकरिता संस्कृतीच्या इतिहासात तयार होणारी, घडणारी, बदलणारी, वापरली जाणारी भाषा हे एक आव्हान आहे. मानवी व्यवहारात उपलब्ध माहिती व ज्ञानाची निर्मिती व देवाणघेवाण भाषेमार्फतच होत असल्याने 'मानवरचित बुद्धिमत्ता' सिद्धतेच्या संदर्भात भाषेचे महत्त्व निर्विवाद आहे. संगणकाद्वारे भाषांतर/ संगणकीय भाषांतर ही आता कविकल्पना राहिलेली नाही. इंग्रजी फ्रेंच या भाषांतील मजकूर संगणकाद्वारे परस्परांत भाषांतरित करण्याची सोय झाली आहे. ही सोय विशिष्ट संकेतस्थळांवर () उपलब्ध आहे. संपूर्णतया स्वयंचलित संगणकीय भाषांतर आता आवाक्यातली बाब झाली आहे. प्रत्येक भाषाजोडीचा स्वतंत्र विचार करून, त्या भाषांचा परस्परसंबंध हुडकून काढून, त्या संदर्भात नियम सिद्ध करून, आज्ञावली लिहिणे व संगणकीय भाषांतर सिद्ध करणे शक्य आहे. तसेच प्रत्येक भाषा एका विशिष्ट प्रकारे तयार केलेल्या मध्यगत मेळभाषेशी जुळवणारी () आज्ञावली तयार करून संगणकीय भाषांतर करण्याचा मार्गही उपलब्ध आहे. दुसर्‍या प्रकारचे काम तुलनेने थोडे सुलभ होते.


भा. प्रौ. सं. मुंबई येथे नैसर्गिक भाषा प्रक्रिया () या वटवॄक्षाच्या अनेक पारंब्या वाढत आहेत. प्रा. पुष्पक भट्टाचार्य प्रकल्पप्रमुख, प्रा. हृषिकेश जोशी, प्रा. मिलिंद मालशे, प्रा. वैजयंती शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संगणकाद्वारे भाषांतर या उद्देशाने यू. एन. एल. हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पास संयुक्त राष्ट्रसंघाचे पाठबळ असून, यामार्फत जगातील अनेक भाषांसंदर्भात चिनी, जपानी, युरोपीय, हिंदी, मराठी वगैरे काम केले जात आहे. यू. एन. एल. म्हणजेच युनिव्हर्सल नेटवर्किंग लॆंग्वेज जागतिक मेळभाषा ही एक मुद्दाम घडवलेली, संगणकास समजू शकेल अशी भाषा आहे. ज्या भाषेतील मजकूर भाषांतरित करायचा आहे अशी उगमभाषा () व ज्या भाषेत मजकूर भाषांतरित करायचा आहे ती लक्ष्यभाषा () या दोन्ही भाषांचा जागतिक मेळभाषेशी मेळ घालून इच्छित भाषांतर करण्याविषयीचे संशोधन केले जात आहे. अशा प्रकारच्या भाषांतर प्रक्रियेत विश्लेषण () व संश्लेषण () या दोन्ही प्रमुख उपप्रक्रिया अंतर्भूत असतात. याकरिता पूरक असा विशिष्ट मांडणी असलेला शब्दनिधी () उभारावा लागतो. तसेच संकल्पनांचे विशिष्ट स्वरूपाचे व्यवस्थापनही ()आलेखांकित करावे लागते. संगणकीय भाषांतर साध्य होण्यासाठी शब्दार्थ निश्चिती () हा एक आव्हानात्मक अडसर आहे. याकरिता शब्दबंधाची () रचना केली जाते. भा. प्रौ. सं. मुंबई येथे हिंदी व मराठी भाषेकरिता हे काम केले जाते.


कोणत्याही भाषेतील ज्ञान म्हणजे विविध संकल्पनांचे जाळेच असते. काही संकल्पना एका शब्दात व्यक्त करता येतात, तर काही संकल्पना व्यक्त करण्याकरिता एकाहून अधिक शब्दांची जरूरी भासते. काही संकल्पनांचा परस्परांशी विशिष्ट प्रकारे संबंध असतो. जसे आंब्याचे झाड हे एक प्रकारचे झाड आहे. म्हणजेच झाड व आंब्याचे झाड या दोन संकल्पनांचा 'प्रकार' संबंध आहे. () तर पान झाडाचा 'भाग' आहे. म्हणजेच पान व झाड या संकल्पनांचा 'भाग' संबंध आहे. () पान व पर्ण या दोन शब्दांत 'समानार्थ' संबंध आहे (), तर चांगले व वाईट या दोन शब्दांत 'विरुद्धार्थ' संबंध आहे (). . 'पान' या शब्दाने 'झाडाचे पान' व 'पुस्तकाचे पान' अशा दोन संकल्पनांचा निर्देश होतो. 'पान' व 'पर्ण' या समानार्थी शब्दसंचाने () 'झाडाचे पान' हा अर्थ अधोरेखित होतो, तर 'पान पृष्ठ' या समानार्थी शब्दसंचाने 'पुस्तकाचे पान' या अर्थाचा निर्देश होतो. तसेच 'घोरणे' या क्रियेत 'झोपणे' ही क्रिया अध्याहृत आहे. म्हणजेच 'घोरणे' व 'झोपणे' या संकल्पनांत संबंध आहे ().


संगणक वा मनुष्य यांनी निर्मित मराठी भाषा तपासण्याकरिता शुद्धलेखन मार्गदर्शक घडविण्याचे काम भा. प्रौ. सं.मध्ये चालू आहे. शुद्धलेखन मार्गदर्शकाचे शब्दरूप शुद्धलेखन मार्गदर्शक () व व्याकरणीय शुद्धलेखन मार्गदर्शक () असे दोन टप्पे आहेत. एखाद्या विशिष्ट भाषेच्या प्रत्यक्ष संपूर्ण शब्दरूपावलीवर आधारित () तसेच रूपवैज्ञानिक () नियम संचावर आधारित () अशा दोन प्रकारे शब्दरूप शुद्धलेखन मार्गदर्शक घडविता येतात. यापैकी दुसर्‍या प्रकारे घडविलेला शब्दरूप शुद्धलेखन मार्गदर्शक पुढे व्याकरणीय शुद्धलेखन मार्गदर्शक घडविताना आधारभूत ठरतो.


जागतिक पातळीवरील ज्ञान सर्वांना खुले होण्याकरिता स्थानिकीकरणाबरोबरच स्थानिक भाषेतील हुडक्या () तयार करण्याचे कामही तितकेच आवश्यक आहे. हुडक्या एखाद्या लेखापुरते काम करणारा असू शकेल. तसेच तो गुगलसारखा विश्वव्यापीही असू शकेल. संगणकावर टंकित मजकुरामधील विशिष्ट शब्द, अंक, पान, ओळ, वाक्यखंड (),, वाक्यप्रयोग () इत्यादी शोधून काढणे शक्य आहे. भा. प्रौ. सं.मध्ये मराठी मजकुराकरिताच्या हुडक्याचा पहिला अवतार () पूर्ण झाला आहे. या प्रकल्पांबरोबरच मजकूर ते आवाज () रूपांतरण, आवाज ते मजकूर () रूपांतरण, टंकबदल्या () इत्यादी प्रकल्प चालू आहेत. () हा त्यापैकी एक होय. शेतकर्‍यास स्वतच्या भाषेत माहिती मिळविता यावी यासाठी हा प्रकल्प आहे. शेतकर्‍याने आपला प्रश्न स्वतच्या भाषेत सध्या हिंदी व मराठी विचारल्यास त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल आवश्यक माहिती शोधून ती शेतकर्‍यास त्याच्या भाषेत उपलब्ध करून देणे असे या कामाचे स्वरूप असेल. आजमितीला शेती व आरोग्य या विषयांपुरती मर्यादित माहिती शेतकर्‍यास उपलब्ध करून देण्याचे काम चालू आहे.


माहिती तंत्रज्ञानाचे स्थानिकीकरण करणे, मानवरचित बुद्धिमत्तेच्या सिद्धतेसाठी भाषेचा अभ्यास करणे, संगणकाद्वारे भाषांतर करणे, ही भाषांतराची सोय जगातील सर्व भाषांकरिता उपलब्ध करणे, शब्दबंध तयार करणे, स्थानिक भाषेसाठी हुडक्या तयार करणे आणि या सर्वांचा उपयोग करून सामान्य माणसाला उपयोगी ठरतील अशा आज्ञावली तयार करणे हे सगळे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या सर्वांसाठी पायाभूत असा एक प्रकल्प आहे. तो म्हणजे प्रत्येक भाषेसाठी भाषानिधी () तयार करणे. विविध क्षेत्रांत वापरलेल्या भाषेचा तसाच्या तसा संग्रह म्हणजे 'भाषानिधी' होय. शब्दांचा कोणकोणत्या अर्थाने वापर होतो, आपल्या भाषेत किती शब्द आहेत, याचा अभ्यास भाषानिधीच्या आधारे वस्तुनिष्ठरीत्या करता येतो. गेल्या शंभर वर्षांत मराठीत लिहिलेल्या पुस्तकांतील मजकूर एका केल्याने गेल्या शतकाच्या ग्रांथिक भाषेतील मजकुराचा भाषानिधी तयार होईल. आपल्या दैनंदिन भाषा वापरातून नवीन माहिती त्यात कायम घालत राहावी लागेल. त्यामुळे भाषानिधी अद्ययावत राहील. हे भाषानिधीचे प्रकल्प काही युरोपिअन भाषांमध्ये पार पडले आहेत. भारतातल्या भाषांसाठी भाषानिधी तयार करण्याचे व ते अद्ययावत ठेवण्याचे काम भारतीय भाषा अनुसंधान संस्था म्हैसूर () येथे चालू आहे. हे काम मराठीसाठी झाल्यानंतर स्थानिकीकरणाचा प्रकल्प खर्‍या अर्थाने परिपूर्ण होऊ शकेल.


वीणा दीक्षित  ... लोकसत्तेतील मूळ लेख येथे वाचा.