'अभ्यास नको'चे भारूड !

अभ्यास नको गं बाई, मला अभ्यास नको गं बाई
अभ्यास नको गं बाई, मला अभ्यास नको गं बाई
गणिताचे लिहावे म्हटलं पाढे
पण त्यातले लक्षात राहिना आकडे
आता काय करू गं बाई, मला अभ्यास नको गं बाई
इंग्रजीचे वाचावे म्हटलं धडे
पण शब्दाशब्दाला आमचे घोडे अडे
आता काय करू गं बाई, मला अभ्यास नको गं बाई
हिंदी-मराठीच्या पाठ केल्या कविता
पण त्यातली एकही आठवेना आता
आता काय करू गं बाई, मला अभ्यास नको गं बाई
आता शास्त्राचा कारावा म्हटलं अभ्यास
पण त्याचा डोक्याला भाऽऽऽरीच त्रास
आता काय करू गं बाई, मला अभ्यास नको गं बाई
इतिहास-भूगोल करावा म्हटलं पाठ
तर पुढचं पाठ आणि मागचं सपाट
आता काय करू गं बाई, मला अभ्यास नको गं बाई

अगं मग तुला पाहिजे तरी काय?

पाहिजे मला गोष्ट, पाहिजे मला गाणं
अंगणात नि बागेत खूप खूप खेळणं
खेळायची झाली मला घाई, मला अभ्यास नको गं बाई
खेळून झाल्यावर नक्की येईन घरात
अभ्यासाची करीन जोरदार सुरूवात
पण आता जाऊ दे गं आई, मला अभ्यास नको गं बाई

- अनामिका.