ह्या साहित्यिकांना सलाम !

एका वृत्तपत्राच्या पुरवणी मध्ये नुकतेच ट्रकच्या मागील काही मजेदार वाक्यांचा संग्रह वाचण्यात आला आणी अचानक मी वाचलेल्या काही वाक्यांची आठवण आली. काही वाक्ये त्या लेखांत होती - काही मी पाहिलेली आठवतात- त्यांचीच सर-मिसळ आज मनोगतींसाठी.....
*
ही खूण केलेला संदेश त्या वृत्तपत्रातला आहे
.



ट्रक किंवा रिक्शाच्या मागील साहित्य हे कधी हसवणारे असते, कधी विचार करायला लावणारे असते तर कधी पांचट पणाचा कळस असते..... काहीही असो, नवनवीन कल्पना - विविध शेरोशायरीने भरपूर असे हे साहित्य हिंदीतच असते - कारण ट्रक (त्यांच्या भाषेत लाइनवरचा !) भारतभर फिरतो. पंजाबचा ट्रक गुजरातेत तर आसामचा कर्नाटकात बघायला मिळणे नावीन्यपूर्ण नाहीच ! ट्रकवर काय काय शेर लिहिलेले असतात ते त्यांच्या मागे गाडी वा दुचाकी चालवताना वाचता येते -
लहानपणी समोरून रिक्शा आली की तीच्या मागे काय लिहिले आहे हे ओळखण्याचा आमचा एक खेळ होता. एका रिक्शाच्या मागे-"आलोच हं !" असे लिहिले होते ते वाचून मालकाच्या कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागेल.... घेतलेले भाडे सोडून येतोच तुम्हाला न्यायला हे एका शब्दात योग्य तो परिणाम साधणारे होते.असेच एक वाक्य रिक्शाच्याच मागे होते.... 'येता की जाऊ ?' एकीच्या मागे लिहिले होते.... "तुमने दि आवाज और मै गया !"


कित्येक सरकारी फतव्यांमध्ये वाहनांच्या मागे बोधपर संदेश लिहिणे सक्तीचे आहे. "दो या तीन बस्स !" चे आज "एक मूल सुंदर फुल" झाले आहे. "शिकेल तो टिकेल" मुलींच्या शिक्षणा वरील "मुलगी शिकली प्रगती झाली" ते बाल मजुरी विरोधी बरीच वाक्ये वाहनांच्या पाठी दिसतात. .रा... च्या एका बसवर "तुम्ही वाहून नेता केळी नी कणसं; आम्ही मात्र लाख मोलाची माणसं !" असे लिहिल्याचे मला आठवते.
ह्याने लोकजागृती होते की नाही हा वेगळा वादाचा विषय असू शकेल पण मला एक चाळाच आहे कुठलाही ट्रक दिसला रे दिसला की त्याच्या मागचा "डायलॉग" वाचायचा - मग कधी कोणी बरोबर असले की बरोबरीने त्याचा आस्वाद घ्यायचा नाहीतर एकटेच मनांत दाद द्यायची.......



आता ट्रक च्या पाठी लागू ........
काही किलो किलोचे भारी शेर सांगतो.....हिंदीत लिहावेच लागणार म्हणून माफ करा हं !


'मेरा भारत महान' हे वाक्य बहुदा सर्व ट्रकवर असायचेच ! जेंव्हा हे वाक्य लिहिण्याची सक्ती ( होय सक्ती ! ) रिकामं टेकड्या ऑफिसर्स कडून (आर.टी..) झाली तेंव्हा तो स्व. राजीव गांधींचा फतवा असल्याचे ऐकीवात होते..... पुढे 'मेरा भारत महान' वर कित्येक जोक्स तयार झाले पण आजही ते वाक्य प्रत्येक ट्रकच्या मागे हमखास असते. त्यावरचा एक भारी शेर ......*
                  दिवाली मे 'या अली' ~ मुहर्रम मे राम.....
                  इसलिये तो कहते है ~ मेरा भारत महान !
दिवाली, अली, राम, मुहर्रम ह्यांचा अर्थाअर्थी काय संबंध ? पण अडाणी ट्रकवाल्याच्या भावना हिंदू मुस्लिम ऐक्याच्या होत्या त्याचे कौतुक जास्त वाटले. ह्या सर्वांचा देशाशी संबंध जोडून त्याने स्वतः:चे देशप्रेम ह्या रीतीने दाखवून दिले.
ट्रकची मागची बाजू वेगवेगळ्या रंग-बिरंगी कथनांनी सजवलेली एका गड्डीच्या मागे लिहिलेले होते ते वाचून ..मु.वळली.- "देखता क्या है ? मेरा पिछवाडा तेरे पिछवाडे से रंगीन है !" आता बोला !
ट्रकचालक नेहमीच दारुडे असतात हा समज एकाला पचलेला नव्हता. त्याने स्वतः:च्या ट्रकच्या मागे लिहिलेले -
"
तितलियॉं रस पिती है, भवरें बदनाम होते है
दुनिया शराब पिती है; 'डिरायवर' बदनाम होते है "*


काही आकड्यांचे खेळ-
१३ मेरा ७, 
मेड 4 U,
(हृदयाचे चित्र) २०,१३,८०,२०,१३.- म्हणजे पंजाबीत दिल वी तेरे अस्सी वी तेरे (हृदय पण तुझेच मीही तुझाच).


एक नमुना "हौरन बजाओ शौक से ... साइड दुंगा अगली चौकसे "
तर काही काही स्पष्टवक्ते असतात "जगह मिलने पर साईड दिया जायेगा "*
एकाने तर "पंगा मत लेना ~ मेहंगा पडेगा " अशी वॉर्नींगही मागे लिहिलेली....
एका वर लिहिलेले "नेकी कर जुते (बुटाचे चित्र) खा मैने खाये तू भी खा "*
"
मालिक की मेहनत, डिरायवर का पसिना....
देखो शानसे चली कैसी ये हसीना " मालकाला मस्का-
"
सेठ बडा दिलदार है पर चमचोंसे परेशान है " असे आपल्या मालकाबद्दलचे वाक्यही वाचायला मिळेल....
स्वतःच्या गावाची ख्याती भारतभर पसरवणारा एक संदेश....
"
निम का पेड चंदन से क्या कम है ?
मेरा गांव 'अंबाला' लंडनसे क्या कम है ?"*
बॉर्डर सिनेमा आल्या नंतर "घर कब आओगे" ह्या वर बरीच कवने वाचली आहेत (नेमकी आजच आठवणार नाहीत.)



गुढघ्यांत मान घालून बसलेल्या एका युवतीच्या चित्रा बरोबर एक कवन लिहिले होते.......


"मेरी जान मेरा इंतजार मत करना
मै मुसाफिर हूं मेरी राह मत ताकना "


महिनों महिने घरा बाहेर राहणाऱ्या ह्या ट्रक ड्रायव्हर्सचे जीवन खडतर असतेच वर जीवाचा धोका, घराची/कुटूंबाची काळजी, मुलाबाळांच्या शिक्षणा कडील स्वतःचे दुर्लक्ष तसेच भविष्याची चिंता ह्या सर्व विषयांपासून वेगळा असा विचार आपल्या ट्रकच्या मागे लिहून आपल्या सारख्यांचे मनोरंजन करणाया ह्या साहित्यीकांना मनोमन "सलाम !"