शोध घेते नज़र का अशी वेंधळी?

शोध घेते नज़र का अशी वेंधळी?
मी कुठे वेगळा? तू कुठे वेगळी?


पापण्यांनो ज़रा दूर घ्या ओढणी
होउदे ना दिठी मोकळी मोकळी


नेहमीसारखी गप्प ती राहिली
पण मला आज़ सामील झाली खळी


गुप्तहेरी कुणी आज़ केली अशी?
भृंग भांबावला, हासली पाकळी


काय वेणीतली ती फुले बोलली?
लाज़ली का अशी मोगऱ्याची कळी?


तू मला दे मुठीने मुठीने हसू
मी तुला अर्पितो ओंज़ळी ओंज़ळी


का विषय काढता इंद्रियांनो असे?
प्रीत माझी तिची सोवळी सोवळी


कैद करताच तू पंख फुटले मला
ही कशी कोठडी? ही कशी साखळी?


हूड वाऱ्यासवे शीड हे भेटले
रात्रही वादळी ! भेटही वादळी !


आज़ ठरलो तुझाही गुन्हेगार मी
न्याय देते कुठे देवता आंधळी?


मी कुठे? तू कुठे? हा कसा सोहळा?
दाटली का नभी एवढी मंडळी?


'मी प्रवासी ज़री विश्व हे व्यापले
सोबतीला उरे शेवटी पोकळी'



~ प्रवासी १७ नोव्हेंबर २००५ ~