दडपे पोहे

  • साधारण अर्धा पाव किंवा कमी-अधिक पातळ कागदी पोहे,
  • दोन लहान आकाराचे कांदे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या (५-६)
  • लाल तिखट (तिखट खाण्याच्या क्षमतेप्रमाणे), मीठ (चवीप्रमाणे), गोडा मसाला (चवीप्रमाणे), चवीपुरती साखर
  • कच्चे शेंगदाणे (मूठभर), आयत्या वेळेस उपलब्ध असल्यास हिरवे ताजे वाटाणे ( अर्धी मूठ किंवा त्याहूनही
  • गोडे तेल (साधारण ६-७ चमचे)
  • दही (अर्धी लहान वाटी), स्वच्छ पाणी
१५ मिनिटे
४ जणांसाठी १-१ ताटली भरून!

"बेटा, आज मैने तुम्हारे पसंद के दडपे पोहे बनाये हैं." आठवतोय हा शिरीष कणेकरांच्या "माझी फिल्लमबाजी" तला डायलॉग? त्याच-त्याच गाजर का हलव्याला किंवा खिरीला कंटाळून हीरोला प्रेमाने दडपे पोहे खाऊ घालणारी सिने'माय' अजून जन्मायचीय. हिंदी सिनेमातला नायक दडपे पोहे खाईल तेव्हा खाईल पण आज आपण मात्र माझी ही आवडती डीश नक्की खाऊयात. आवडली तर स्वतः करून बघा, न आवडल्यास मोठ्या मनाने क्षमा करा!

दडपे पोहे हा सुटीच्या दिवशी दुपारी ४ नंतर ६-६.३० पर्यंत करून खाण्याचा पदार्थ आहे. सकाळच्या वेळी न्याहरी म्हणून खाण्याचा हा पदार्थ नाही. दुपारच्या चहाच्या आधी किंवा संध्याकाळच्या आधी लागणाऱ्या अनाकलनीय भूकेला शांत करणारा हा पदार्थ आहे. अगदी जवळच्या लोकांसोबत गप्पा हाणीत दडपे पोहे खाण्याची मजा काही औरच आहे.

कृती -

१) पोहे एका भांड्यात घेऊन त्यावर हलकेच पाणी शिंपडून मोकळे भिजवून घ्यावेत आणि भांडे बाजूला ठेवून तोपर्यंत कांदे, मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत.

२) नंतर पोह्यांमध्ये लाल तिखट, मसाला, मीठ, साखर, शेंगदाणे, वाटाणे, मिरच्या (चिरलेल्या), कोथिंबीर (चिरलेली), कांदा (बारीक चिरलेला) आणि तेल टाकून नीट कालवून घ्यावे.

३) एकत्र कालवल्यानंतर थोडे दही (बऱ्यापैकी आंबट असल्यास उत्तम) टाकून पुन्हा नीट कालवून घ्यावे आणि खायला द्यावेत.

सगळ्या जिन्नसांचे प्रमाण व्यवस्थित जमल्यास हा पदार्थ रुचकर लागतो. लहानपणी आई करून द्यायची आणि आता अशा अवेळी भुकेच्या प्रसंगी अस्मादिक १०-१५ मिनीटात हा पदार्थ करून खाणाऱ्यांच्या दुवा घेतात. तसा हा पदार्थ फार सोपा आहे आणि विशेष पाककला अवगत नसणारे देखील आरामात करू शकतात.

टीपा -

१) पोहे पातळ कागदी वापरावेत. दगडी पोहे लवकर मऊ पडत नाहीत आणि मग ३-४ घासांनंतर दाढ आणि दात दुखायला लागतात.

२) पोहे भिजवतांना पाणी कमी-कमी शिंपडावे. जास्त पाणी टाकल्यास पोह्यांचा लगदा होतो आणि तो निस्तरण्यासाठी अजून पोहे टाकावे लागतात.

३) कच्च्या तेलाऐवजी सगळ्या मिश्रणावर मोहरी टाकून गरम केलेले तेल टाकल्यास अधिक खुमासदार चव येते.

४) कांदे वैकल्पिक आहेत. आवडत नसल्यास टाळणे उत्तम अन्यथा एकटा कांदा पदार्थाची चव घालवण्यात कसूर करत नाही.

५) यात कांद्याची पात चिरून टाकल्यास लज्जत वाढते.

६) ताज्या करकरीत कैऱ्यांच्या लोणच्याच्या ३-४ फोडी, त्या लोणच्याचा मोहरी दाळयुक्त खार आणि त्याचे लाल भडक तेल (जरा जपून) टाकल्यास (मला लिहितांनाच भूक लागायला लागलीय) घास अन घास अंतरात्मा सुखावून जातो.

७) मिरच्या, तिखट, लोणच्याचे तेल, मसाला हे पदार्थ जपून आणि आपल्या प्रकृतीला मानवतील अशा बेताने टाकावेत. मी एकदा असाच रविवारी दुपारी हा पदार्थ खाल्ला आणि त्यात सवयीप्रमाणे मुबलक तिखट आणि लोणच्याचे तेल टाकले. खाण्याच्या नादात मी साफ विसरून गेलो की मला संध्याकाळच्या कर्नाटक ट्रांस्पोर्ट च्या बसने बंगळूरला जायचे होते. वाटेत मला कुठल्या-कुठल्या जीवघेण्या प्रसंगांना तोंड द्यावे लागले ते मला, माझ्या सहप्रवाशांना, वाहकाला आणि (दयाळू) चालकालाच माहित!! अगदी परवेज मुशर्रफवरही अशी वेळ येऊ नये ही त्या जगंनियंत्याचरणी प्रार्थना! (हल्ली मला ट्रेनचा प्रवास आवडायला लागला आहे. ः-)....

तर असा हा साधा, सोपा आणि पौष्टिक पदार्थ! मी काही पाककला निपूण नाही पण हा पदार्थ मला खूप आवडतो आणि बऱ्यापैकी बनवता ही येतो. मग कधी येताय खायला दडपे पोहे?

वात्सल्यसिंधू आई!