चॉकलेट चिप कुकीज

  • १९० ग्रॅ मैदा
  • ३० ग्रॅ कोको
  • १७० ग्रॅ लोणी किंवा मार्गरीन
  • १६५ ग्रॅ बारीक तपकीरी साखर (ब्राऊन शुगर)
  • ६५ ग्रॅ पिठीसाखर
  • १ मोठे अंडे
  • ३०० ग्रॅ चॉकलेट चिप्स किंवा तेव्हढ्या चॉकलेट लाद्या (पांढरे, चॉकलेटी आवडेल त्या प्रमाणात)
  • दोन चिमटी बेकिंग पावडर
४५ मिनिटे
६-८ लोकांना संध्याकाळचा खाऊ म्हणून

ओव्हन ३७५ फॅ/ १९० से ला तापवत ठेवावा.

बारीक चाळणीतून मैदा व बेकिंग पावडर चाळून मिसळून घ्यावी. (या मिश्रणाऐवजी सेल्फ रेज़िंग फ़्लोर वापरले तरी चालेल.) एका मोठ्या भांड्यात लोणी व साखर (पिठी व तपकिरी) मऊसर होईपर्यंत एकत्र फेटून घ्यावे. त्यात अंडे फोडून घालावे व पुन्हा मिसळून येईपर्यंत फेटावे. त्यात चाळलेला मैदा व कोको घालावे व व्यवस्थित मिसळावे. जर चॉकलेटाच्या लाद्या वापरत असाल तर त्या किसणीवर किसून घ्याव्या. किसणीची बटाट्याचा कीस करायला वापरतो ती बाजू वापरावी. या चिप्स किंवा तयार चॉकलेट चिप्स एकूण मिश्रणात मिसळाव्या.

एका कोरड्या ओव्हनच्या भांड्यात चमच्याने पुरीच्या आकाराच्या कुकी घालाव्यात. साधारण ३-५ मिमि जाडी असावी. ओव्हनमध्ये ७-८ मिनिटे भाजून घ्याव्या. बाहेर काढून जाळीदार भांड्यावर (चाळणी इ) गार होऊ द्याव्यात. ओव्हनच्या भांड्याच्या आकाराप्रमाणे १-२ ते ६-७ घाणे होतात. एकदा तापवलेल्या ओव्हनमध्ये एकामागून एक घाणे काढत जावे.

कुकीज ३/४ दिवस चांगल्या टिकतात. (त्याच्यापुढे सहसा शिल्लक रहात नाहीत!)

  • कुकी भाजली गेली आहे का बघण्यासाठी तिला काटा टोचून पहावा. काटा कोरडा आला तर कुकी झाली. पण हे करताना ओव्हनला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • फेटण्यासाठी फूड प्रोसेसर, मिक्सर वगैरे वापरता येईल. (नाहीतर दंडातल्या स्नायूंचा चांगला व्यायाम होईल.) ४५ मिनिटातली ३० मिनिटे फेटण्यासाठी आहेत.  
आर्ममधील सहकारी-मित्र स्टीव