सामोसा

  • मटारचे दाणे अर्धा किलो
  • १ मोठा बटाटा, १ छोटा कांदा, ७-८ मिरच्या, ७-८ लसुण पाकळ्या,
  • प्लॉवर ची फुले ३-४, लिंबू अर्धे छोटे, चिरलेली कोथिंबीर १ वाटी, तीळ ३-४ चमचे
  • धने-जिरे पावडर १ चमचा, लाल तिखट १ चमचा, हळद, हिंग थोडे, मीठ, साखर.
  • मैदा २ वाट्या
  • तळणीसाठी तेल
२ तास
४-५ जणांना

कूकरमधे मटारचे दाणे व बटाटा शिजवणे. शिजलेले मटार रोवळीमधे पाणी निथळण्यासाठी काढून ठेवणे.

नंतर मैदा भिजवणे. मैदामध्ये लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडी हळद व हिंग, भाजलेले तीळ, चवीपुरते मीठ, चिरलेली अर्धी वाटी कोथिंबीर व अर्धी वाटी तेल गरम करुन त्यावर ओतणे. हे सर्व मिश्रण चमच्याने कालवून घेणे, म्हणजे सर्व पीठाला तिखट-मीठाची चव लागेल. मैदा घट्ट भिजवणे. मैदा २ तास मुरवत ठेवणे.

आता लसुण, मिरच्या व कांदा खूप बारीक चिरणे. बटाटे कुस्करुन घेणे. फ्लॉवरची फुले बारीक चिरणे. नंतर मटार, कुस्करलेला बटाटा, चिरलेले कांदा, लसुण, व मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चिरलेला फ्लॉवर  यामधे थोडे लाल तिखट, हळद, हिंग, धनेजीरे पूड , चवीप्रमाणे मीठ व लिंबू पिळून सर्व मिश्रण चमच्याने एकसारखे कालवून घेणे.

आता भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळा घेउन सर्वात पातळ व मोठी पोळी लाटणे. लाटताना तांदुळाच्या पिठीचा वापर करावा. नंतर या पोळीचे कालथ्याने अथवा कातण्याने तीन भाग करणे. हे तीन भाग म्हणजे सामोसाच्या पट्ट्या, या तीन पट्टयांवर मटारचे केलेले सारण घालून खणासारखी त्रिकोणी घडी करणे. याप्रमाणे सर्व सामोसे करुन घेतल्यावर गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तळणे व गरम गरम खाणे. चटणी नसली तरी चालते.

पोळी जितकी पातळ तितके सामोश्याचे आवरण कुरकुरीत होईल. मैद्यामधे थोडा बारीक रवा घातल्यास सामोसा खूप कुरकुरीत होतो. पण मैदा कुटून घ्यावा लागतो, व लाटताना खूप त्रास होतो. गव्हाच्या पीठाचे पण सामोसे करतात. २ वाट्यांमधे लहान २०-२५ सामोसे होतात.

रोहिणी

 

नाहीत.

सौ आई