कढीगोळे

  • आवडीनुसार आंबटपणा असलेले ताक - पातळ घ्यावे.
  • चण्याची डाळ वाटीभर - रात्री भिजत घालून ठेवणे.
  • हिरव्या मिरच्या, लसुण, आले, कोथिंबीर, कढीपत्ता - आपल्या चवीनुसार.
  • फोडणीचे साहित्य -तुप,तेल,हिंग,जीरे,मोहरी,हळद,मीठ व सुक्या मिरच्या १/२.
३० मिनिटे
४ माणसांसाठी
  1. चण्याची डाळ रात्री भिजत घालून सकाळी त्यातले पाणी निथळून काढून घ्यावे.
  2. हिरवी मिरची व लसूण घालून ही डाळ मिक्सरमधून वाटून घ्यावी
  3. साखर, मीठ, चिरलेली कोथिंबीर, थोडे हिंग व थोडी हळद ह्या डाळीच्या गोळ्यात चांगले कालवून घ्यावे.
  4. चमचाभर डाळीचे पीठ ह्या गोळ्यात कालवून घ्यावे. ह्याने गोळे फुटत नाहीत.
  5. ह्या मोठ्या गोळ्यातून छोटे - हव्या त्या आकारमानाचे गोळे बनवायचे.  
  6. ताकात  मीठ, हळद व आले (ठेचून) टाकावे. - पीठ लावू नये !
  7. तुपाच्या फोडणीत (हिंग जिरे कढीपत्ता ) हे ताक टाकून चांगले हलवत राहावे.
  8. खदखदून उकळल्यावर ह्यात डाळीचे गोळे एक एक करीत सोडायचे.  
  9. हे गोळे कढीत तरंगून वर येतात. कढी उकळू द्यावी.
  10. चुलीवरून उतरवताना हे गोळे एका वाडग्यांत काढून घ्यावे.
  11. तेलात मोहरी, हिंग, लसूण पाकळ्या व सुक्या मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी तयार करावी.
  12. जेवताना प्रत्येक गोळा फोडून त्यावर फोडणीचे तेल व कढी टाकून भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर खावे.

वरील कृतीतली ४ थी पायरी विसरू नये. डाळीचे पीठ लावल्याने हे गोळे कढीत फुटत नाहीत.
कढी करताना ताकाला डाळीचे पीठ लावू नये म्हणजे कढी पातळ होईल.
कढी चुलीवरून उतरवल्या बरोबर हे गोळे काढून घ्यावे नाहीतर कढीचे पिठले होईल !

सुगरण आई.