माझी पण गझल: एक रसग्रहण...

सध्या 'मनोगत'वर आलेल्या गझलांच्या अमाप पिकापासून स्फूर्ती घेऊन, या प्रकारात आपलाही हात अजमावून पहावा या प्रेरणेतून प्रस्तुत गझल उतरलेली आहे.


'रदीफ़'पेक्षा 'र ला र, ट ला ट आणि फ़ ला फ़'शी अधिक सलगी असणाऱ्या अतिसामान्य नवशिक्या कवीची ही अत्यंत प्रामाणिक रचना आहे.


रसिकांच्या आनंदाकरिता गझलेतील प्रत्येक शेरासोबत त्याचे रसग्रहण जोडलेले आहे.


तर मग होऊन जाऊ द्या! सेवेस सादर ('पेश-ए-ख़िदमत') आहे, माझी पण गझल!!!



(वृत्त: गा-ल-गा-गा-ल-गा-ल-गा-गा-गा)
(गरजूंनी - असल्यास! - प्रस्तुत गझल 'दिल-ऐ-नादाँ तुझे हुआ क्या है' च्या चालीवर गाऊन बघावी.)



अनुज्ञा असावी (अर्ज़ है)...


आज माझी गझल* पुरी आहे
खास ना, ना तशी बुरी आहे


(बरेच दिवस मेहनत घेतल्यानंतर) ही माझी तथाकथित गझल(!) आज (एकदाची) पुरी झाली. (हुश्श!)


ही गझल बकवास आहे - विशेष चांगली नाही ("खास ना") - हे मला माहीत आहे, पण (माझ्या दृष्टीने) ती तितकीशी टाकाऊसुद्धा नाही ("ना तशी बुरी आहे").


(*वृत्त बरोबर जमते आहे हे पडताळून पहायचेच असल्यास यातला 'गझल' हा शब्द 'गझल्' असा वाचावा, आणि वाटले तर 'गझल्'मधला हा पायमोडका 'ल्' पुढल्या 'पुरी'तल्या 'पु'ला जोडावा. अन्यथा गरज नाही. उच्चारी व्यवस्थित जमते.)


काजवा मी, 'स्वयं-प्रकाशी' मी
भास्कराशी बरोबरी आहे


हे कवीचे मनोगत आहे.


मी काजवा आहे; क्षुद्र असलो तरी स्वयंप्रकाशी आहे - अर्थात माझी पण काही प्रतिभा आहे. (आणि कदाचित धंदेवाईक प्रकाशक माझ्या वाटेला येऊ धजणार नाहीत, म्हणून स्वतःच्या गझला मी - 'मनोगत'वर, फुकटात! - स्वतःच प्रकाशित करतो, याही अर्थाने मी 'स्वयं-प्रकाशी' आहे. कृपया "'स्वयं-प्रकाशी' मी"चा अन्वयार्थ, "मी स्वयं प्रकाशी", म्हणजे "मी स्वतः प्रकाशित करतो", असा लावावा.) पण असा हा काजव्यासारखा क्षुद्र मी, आज त्या दुसऱ्या 'स्वयंप्रकाशी'शी, म्हणजे भास्कराशी (सूर्यनारायणाशी), अर्थात गालिबसारख्या दिग्गजांशी, झालंच तर 'मनोगत'वरच्या लहानथोर गझलकारांशी, बरोबरी करू पाहत आहे.


"हाड" देई न गर्जता कोणी
मी असा ग्रामकेसरी आहे


उपेक्षित कवीची व्यथा या 'शेरा'त व्यक्त केलेली आहे.


ज्याने गर्जना केल्या असता (अहो, गर्जना कसल्या त्या, भुंक-भुंक भुंकले असता म्हणा ना!), एखादे हाड ज्याच्याकडे फेकणे तर सोडाच, पण ज्याला साधे "हाड" म्हणण्याचीसुद्धा कोणी तसदी घेत नाही, असा मी ग्रामकेसरी, म्हणजे गावचा सिंह, अर्थात कुत्रा (पहा: "हर कुत्ता अपनी गली में 'शेर' होता है।") आहे.


भागवी प्यास जो तृषार्त्ताची
थेंब कोठे न सागरी आहे


समुद्र एवढा विस्तीर्ण, आणि त्यात पाणी तर दिसते, पण तहानेने व्याकुळलेल्याची तहान भागवण्यासाठी उपयुक्त असा एक थेंबही त्यात कुठेही नाही. त्याचप्रमाणे, प्रस्तुत गझलही विस्तीर्ण (लांबलेली?) आहे, आणि गझलेसारखी तर दिसते (हिच्यात गझलेच्या व्याकरणाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळलेले तर दिसतात), पण (चांगल्या गझलेसाठी आसुसलेल्या) रसिकांना/जाणकारांना तृप्त करण्यासाठी उपयुक्त असा एक शेरही तिच्यात कुठेही नाही.


थोडक्यात म्हणजे, नुसता फॉर्म आहे; कंटेंटच्या नावाने बोंब! (हे वाक्य माझे नव्हे. पु.लं.च्या लिखाणात कुठेतरी वाचल्याचे स्मरते.)


नाक नक्टे, नि नेत्रही काणे
नौवधू हीहि लाजरी आहे


माझ्या गझलेची शोभा काय वर्णावी! नाक नकटे आणि डोळे तिरळे (काणे) असलेल्या एखाद्या लाजऱ्या नववधूसारखीच हीसुद्धा नाजूक(!) आणि सुंदर(!!) आहे! (अर्थात नकटी आणि तिरळी असूनसुद्धा, म्हणजेच ओढूनताणून जमवलेली असूनसुद्धा, एखाद्या लाजऱ्या नववधूप्रमाणे, म्हणजेच एखाद्या नाजूक, सुंदर गझलेप्रमाणे, मिरवण्याचा हिचाही अट्टाहास आहे.)


(वृत्तात बसवण्यासाठी नक्टे, नौवधू यांसारखे शब्दव्यय केलेले आहेत. नकट्या नाकाचे आणि काण्या डोळ्यांचे रूपक हेच तर नव्हे?
पण मग जिथे 'नवजवान'चे 'नौजवान' झालेले चालते, तिथे बिचाऱ्या 'नववधू'चीच 'नौवधू' का करता येऊ नये?)


गोफ नाही, न माळ मोत्यांची
खेटरांची गळेसरी आहे


(ही गझल) म्हणजे (मोठमोठ्या राजेमहाराजांच्या आणि प्रतिष्ठित श्रीमंतांच्या कंठांना शोभा आणणाऱ्या) गोफ, मोत्यांची माळ वगैरे आभूषणांसारखी नसून, (उगीचच मोठेपणाचा आव आणणाऱ्या प्रस्तुत गझलकारासारख्या अपात्र परंतु आगाऊ माणसाला मिळण्याऱ्या) खेटरांच्या (जोड्यांच्या/चपलांच्या) माळेसारखी आहे.


थोडक्यात म्हणजे, या गझलेवर खूश होऊन कोणीही मला (पूर्वीच्या बादशहांसारखे) गोफ, मोत्यांची माळ वगैरे बहाल करणार नसून, माझ्या गळ्यात चपलांचा हार** पडणार आहे, हे मला स्पष्ट दिसते आहे.
(** बाकी चपलाहार आणि चपलांचा हार यांच्यामधला हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे.)


आज माझ्या हजामतीसाठी
जाणकारां-करी सुरी आहे


हे एवढे सगळे गझलेचे जाणकार इथे बसलेले असताना, असली फालतू गझल पेश करण्याचे धारिष्ट्य दाखवल्याबद्दल माझी इथे बिनपाण्याने उलटी होणार, हे जाहीर आहे. बघा ना, सगळे जाणकार कसे हातात (करी) वस्तरा नव्हे, तर सुरी घेऊन बसले आहेत!
(आणि त्याच सुरीचा, माझी हजामत करण्यासाठी आणि माझ्या गझलेचा कीस काढण्यासाठी, असा दुहेरी उपयोग करायला ते काही कमी करणार नाहीत...)


रे टग्या तू पुरे करी आता (पाठभेद: रे टग्या तू नको करू बाता)
वेळ ना ही तुझी बरी आहे


तेव्हा टग्या, बाबा रे, तू हे (अगोदरच लांबलेले) आपले आणि आपल्या गझलेचे पुराण आता पुरे कर (पाठभेद: आपल्या गझलेच्या थोरवी(!)च्या बाता करू नकोस), आणि इथून काढता पाय घे, कारण सध्याची तुझी ही वेळ बरी नाही आहे.