फ्लॉवर भात

  • अर्धा किलो फ्लॉवर, १ वाटी मटारचे दाणे, २ कांदे मध्यम आकाराचे.
  • तेल, मोहरी, जीरे, हिंग, हळद, तिखट, गोडा मसाला व मीठ
  • आले, लसुण व मिरची एकत्र वाटून. (आवडीनुसार मात्रा घेणे )
  • कोथिंबीर व लिंबाच्या फोडी सजावटीसाठी व तोंडी लावणे म्हणून !
  • रोजच्या वापरातले तांदुळ (घरातल्या ४ जणांच्या मापानुसार) धुवून-
३० मिनिटे
४ माणसांसाठी

पूर्व तयारी-
फ्लॉवरची फुले दांडा छोटा ठेवून चांगली धुऊन घ्यावीत. मटरचे दाणे धुऊन घ्यावेत. कांदे पातळ उभे चिरून घ्यावेत (किंवा आवडीनुसार कापावेत). तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावेत. सर्व धुतलेले पदार्थ निथळत ठेवणे. बटाटा आवडत असल्यास मध्यम आकाराच्या फोडी करून टाकाव्यात- बटाटा टाकायचा असल्यास फ्लॉवरची मात्रा त्याप्रमाणात कमी करावी.

मोठ्या जाड बुडाच्या कढईत दीड पळी (छोटी वाटी भरून) तेल तापवत ठेवावे.
तेल कडकडीत तापल्यावर त्यात फोडणीसाठी मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, गोडा मसाला व ठेचलेले आले-लसूण-मिरची टाकणे.

त्यावर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यावा. तेल सुटायला लागले की मटरचे दाणे टाकून परतून घ्यावे.

(तोवर बाजूच्या चुलीवर तांदळाच्या पाचपटीने पाणी तापवत ठेवावे. उकळी आल्यावर गॅस मंद करावा. उकळी येईपर्यंत पाणी चौपट झालेले असते. )

सर्वात शेवटी फ्लॉवर व बटाटा टाकावा.
हे पदार्थ चांगले परतले गेले की, मग तांदूळ टाकावा-
हे मिश्रण हात दुखेपर्यंत सतत परतावे... तांदळाचा रंग हलका गुलाबी झाल्यावर त्यात गरम केलेले पाणी ओतावे.

झाकण ठेवून झाकणावर पाणी ओतावे व वाफेवर भात शिजू द्यावा.
अधुनमधुन हलक्या हाताने भात खाली लागणार नाही इतपतच कालथ्याने फिरवावा. फ्लॉवरचे तुरे मोडणार नाहीत ह्याची दक्षता घेणे.

वाढायला घेताना त्यावर कोथिंबीर भुरभुरून लिंबू व तुपासोबत द्यावा.   

   

पाण्याची मात्रा तांदळाच्या प्रतीवर तसेच आपल्या आवडीवर अवलंबून असते. फडफडीत/मऊ ह्या आवडीनुसार भातात पाणी घालावे. पाणी गरम करूनच घालावे.
लवकर करायचा झाल्यास परतण्याचे प्रकार सरळ कुकरमध्येच करून ३/४ शिट्ट्या द्याव्यात.  

आई-