नाहीस रे...

घेताच तू ती गाडी नवी
घेतलीच मी किल्ली झणी
चालवता ठोकली, तरी
रागावला तू नाहीस रे !

'पार्टीसाठी ये' सांगताना
'फॉर्मल' शब्द विसरले
आलास 'कॅज्युअल' तरी
संतापला तू नाहीस रे !

न पटल्याने माझी मते
पाठ फिरविती सगळे
पाठिंबा प्रसंगी अशाही
बदलला तू नाहीस रे !

एकाहून सुंदर एक
अशा कैक तुझ्या मैत्रिणी
माझा सार्थ विश्वास, कधी
बहकला तू नाहीस रे !

तुझ्यासवे मी वावरता
आईबाबां नव्हती चिंता
प्रेमास त्या अपात्र असा
ठरलाच तू नाहीस रे !

पारखल्या प्रेमा तुझ्या मी
स्विकारले माझिया मनी
सोबती आयुष्याचा माझ्या
म्हणू कसे तू नाहीस रे?

ही व अशी कैक गुपिते
सांगायची होती तुला रे
युद्धाहून तू परतल्यावर
पण.........
परतला तू नाहीस रे.

- वेदश्री जोशी.