आमच्या शहरांचं टुमदारपण हरवतं आहे...

अलिकडेच पुढे पाठवलेल्या(फॉरवर्डेड) ई-पत्रातून पुण्यनगरीची सुमारे शंभर वर्षे जुनी रेखाटने पाहण्यात आली. त्यातला शनिवार वाडा आणि बंडगार्डन चा बंधारा पाहून ही दोनही ठिकाणं एके काळी इतकी दृष्ट लागण्याइतकी सुंदर आणि अस्पृष्ट होती हे मला तरी खरंच वाटेना.
काल मनोगताच्या पुणे कट्ट्याच्या निमित्ताने 'अभिरुची' मधे गेले होते. सात-आठ वर्षांपूर्वीपर्यंत गावाबाहेर आणि म्हणूनच खूप लांबचं वाटणारं हे ठिकाण आता अगदी गावातच आलं आहे. मला आठवतंय आम्ही मैत्रिणी बारावीची परीक्षा झाल्यावर एकदा तिथे गेलो होतो‌. साधारण सात वर्षांपूर्वी तिथे एखाद्या महामार्गावर असावी तितकी तुरळक गर्दी होती आणि मालवाहू ट्रक किंवा लांब पल्ल्याच्या बस सोडून फारसं कुणीच रस्त्यावर नव्हतं. काल मात्र सारसबागेजवळ असते तितकी वर्दळ तिथे होती.भर रहदारीच्या रस्त्यावरच्या पेट्रोल पंपाइतकीच तिथे गर्दी होती.
मी लहानपणी आईबरोबर पुणे विद्यापीठात जायचे कधीकधी... ते आणि चतुःशृंगीचं देऊळ म्हणजे मला गावाच्या हद्दीबाहेर असल्यासारखं वाटे .. आता मी काही दिवस सी-डॅक या विश्वविख्यात संस्थेत काम करत असल्यामुळे  रोज विद्यापीठात जात होते तर मला ते अगदी गावातच आहे असं वाटतं


मी काही फार मोठा कालखंड पाहिलेला नाही की मी आमच्या वेळी असं नव्हतं बाबा असं म्हणून सगळं सोडून द्यावं. पण माझ्या डोळ्यांदेखतच माझं शहर फार फार बदललं आहे. आमची खेळायची मैदानं दिसेनाशी झाली आहेत. पतंग उडवायला आता पूर्वीसारख्या जागा शिल्लक नाहीत. इमारतींच्या छतांवरून काटाकाटीला मजा येत नाही कारण इमारती इतक्या जवळजवळ असतात की आपल्याच गच्चीतून कोणीतरी आपल्या पतंगाला खेचतंय असं वाटतं. सगळ्यात उंच इमारतीच्या गच्चीवरून पाहिल्याशिवाय पर्वती दिसत नाही. हल्ली सदाशिव पेठ,तुळशीबाग,सारसबाग,कोथरूड, अगदी बावधन, औंध, बाणेर कुठेही गेलं तरी खूप कोंदट आणि घुसमटल्यासर्खं वाटतं. काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. मोकळी माळरानं, हिरवीगार वड-पिंपळाची झाडं, तिथे सायकल फिरवणारी मुलं, माणसांच्या कैदेत उभी राहिल्यासारखी न वाटणारी झाडं, चिमण्या-कावळे-वेडे राघू-बगळे वगैरे पक्षीसंप्रदायाचं मुक्त बागडणं, प्रत्येक घराला असणारी एक मोकळी जागा , प्रत्येक वास्तूला असणारं एक क्षितिज हे हल्ली दिसत नाही.
नदीच्या काठी लोकजीवन फुलतं असं म्हणतात. पुण्याला एक सोडून दोन नद्या लाभल्या. लकडीपुलासारखे जुने देखणे पूल पाहताना त्याखालची दीनवाणी उपेक्षित दरिद्री लोकमाता पाहिली की भरून येतं. सानेगुरुजींच्या मोलकरीण या गोष्टीची आठवण होते.  पुण्याची हवा उत्तम, पुण्याचं पाणी चवदार असं जुने लोक सांगतात. पुण्यात आरोग्याची पायाभरणी आपोआप होते असंही वाचल्यासारखं वाटतं. पण हे सगळं आजच्या पुण्याला लागू पडेल का?
तशी मी जुन्या-नव्या पिढीच्या वादात सरसावून बोलणारी आहे. पण माझी आई जेव्हा हे मुद्दे मांडेल तेव्हा मी निरुत्तर असेन हे मला माहीत आहे.


सध्या हिंजवडीला रोज प्रवास घडतो. पुणे-बंगलोर महामार्गाच्या दुतर्फा अजूनही हिरवळ, मोकळे डोंगर आणि त्यांच्या मनासारखी उगवलेली झाडं दिसतात आणि जरा बरं वाटेपर्यंत त्या जागाही इमारतींच्या बांधकमांसाठी आरक्षित झालेल्या आहेत असे फलक तिथे दिसतात. नकळत मनात ते बंडगार्डन चे चित्र उभे राहते. आणि वाटते की ज्या विकासाच्या राक्षसाने माझं छोटंसं टुमदार गाव केव्हाच गिळून टाकलं तोच राक्षस आता इथे आपले हातपाय पसरतो आहे. त्याला थांबवणं आपल्या हातात आहे का? मला माहीत नाही. पण मला एवढे निश्चित माहीत आहे की आज मुंबईची जी अवस्था आहे तीच उद्या पुण्याची होणार आणि मग पुणे-,तळेगाव, नाशिक, नागपूर,औरंगाबाद,अमरावती,पैठण.... अशी यादी वाढतच जाणार. आपण आपल्या शहरांचं टुमदारपण हरवून या कुठल्या भयंकर चेहरा नसलेल्या खाईला निमंत्रण देत आहोत?हे असंच चालत राहणार का?