नाती-अशीही आणि तशीही

"गंधात न्हायचे होते,
रंगांत ल्यायचे होते.
फुलण्याचि आस असताना,
निर्माल्य व्हायचे होते.


काही नाती ही असतातच मुळी अशी ! फक्त एका दिवसासाठी, किंवा अगदी काही क्षणांपुरतीचसुद्धा! पण काळाच्या दोरखंडांनी त्यांना जेरबंद करायचं नसतं, तर श्वासांत त्यांचा सुगंध भरून जगायचं असतं. अशा नात्यांचे सुगंधी श्वास घेतल्याशिवाय जगण्याला किंमत येत नाही; आणि कदाचित निर्माल्य झाल्याशिवाय त्यांच्या सुगंधाची किंमतही कळत नाही. आणि आपण ज्यांना 'कायमची' नाती म्हणतो, त्यांचं अस्तित्त्वसुद्धा 'कायम' म्हणजे काय किंवा किती यांवरच अवलंबून असतं. वेदमंत्रांच्या जयघोषात, अग्नीला साक्षी मानून सप्तपदी चालणाऱ्यांची पावलं जेव्हा काडीमोड घेण्यासाठी कुटंब न्यायालयांकडे वळतात, तेव्हा 'कायमचं नातं' हा नक्की काय प्रकार आहे, असाच प्रश्न पडतो. त्यावेळी 'नातं' म्हणजे नक्की काय, कोणात असतं, का, कशासाठी, कशामुळे असे एक ना अनेक प्रश्न आगंतुकासारखे प्रकट होतात.


बाळाला फक्त जन्म दिला म्हणून कोणी आई होत नाही आणि फ्रेंडशिप डे च्या दिवशी रंगीबेरंगी बँड बांधून मैत्रीसुद्धा होत नाही. आई होण्याबरोबरच उरात जागी व्हायला लागते काळजी.. जबाबदारी.. तळमळ. मित्र किंवा मैत्रीण झाल्यावर रुजायला हवी निष्ठा आणि समर्पण. युगानुयुगं चालत आलेली, कागदोपत्री मान्यता पावलेली नावं चिकटवून नाती निर्माण करता येत नाहीत; तर त्या नावांबरोबर चिकटणारी कर्तव्यं पार पडता यायला हवीत. अपेक्षा पूर्ण करता यायला हव्यात आणि हक्कही बजावता यायला हवेत. जबाबदारीचं ओझं होणं आणि हक्कांची हुकूमशाही होणं हे नात्यांच्या शेवटाची सुरुवात म्हणतीलही बरेचजण, पण मला मात्र हे 'नातं' निर्माण न झाल्याचंच किंवा ते मुळी अस्तित्त्वातच नसल्याचं लक्षण समजावसं वाटतं.


'नातं हे रेशमाचे बंध आहेत', 'नात्यांना अनेक रंग आहेत' हे सगळं आपल्याला अगदी झोपेतून उठवल्यावरही म्हणून दाखवता येण्याइतपत पाठ असतं. एक तर आपण ते सारखं कुठेतरी लिहिलं-वाचलेलं असतं, ऐकलं-बोललेलं असतं; पण अनुभवलेलं नसतं बहुतेक! मराठीच्या पेपरात नातेसंबंधांवर दोन-अडीचशे शब्दांचा निबंध लिहून पंधरापैकी बारा मिळवून देणाऱ्या निबंधमाला समर्पणावर कधी जास्त बोलत नाहीत. नातं निर्माण होण्यासाठी आवश्यक ठरणारी परस्परसंमती, अनुकूल किंवा मिळतीजुळती विचारसरणी, स्वभावधर्म किंवा नियम, हक्क, कर्तव्यांबाबतच्या अलिखित श्वेतपत्रिकांकडे कोणी ढुंकूनही बघत नाही नि उपदेशही करत नाहीत. अनुभवातून हे सगळं शिकायचं असतं हा भागसुद्धा एकवेळ मान्य करता येईल. पण काही जण आयुष्यात हे कधीच शिकत नाहीत. कदाचित त्यामुळेच एकीकडे छान छान निबंध लिहिले जात असताना कळव्याला कोणी एक पौगंडावस्थेतला शाळकरी आपल्याच आईच्या मानेवर सुरा फिरवत असतो; तीन वर्षाच्या आपल्याच बाळीवर कोणी विकृत बाप बलात्कार करत असतो. दुसरीकडे कोणी एक रिंकू पाटील किंवा अमृता देशपांडे जिवंत जळत असते; आणि कर्तृत्त्ववान पित्याला मोक्ष मिळू न देता कुणी अंबानी नि बिर्ला 'बंधू' वर्तमानपत्रातून झळकत असतात. नात्यांची इतकी (कु)चेष्टा??


अशा वेळी कौतुक वाटतं निर्माल्य होणाऱ्या नात्यांचं. किंवा आपणच स्वखुशीनं जबाबदारी नि अधिकारांची जाण ठेवून, समर्पित वृत्तीनं स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या नात्यांचं. भूगोलाच्या सीमारेषा, घड्याळांतला फ़रक, शिक्षण, वय, व्यवसाय, जात्पात, लिंग या सगळ्यापलीकडे जाऊन पोचलेल्या नात्यांचं. तो माझा किंवा ती माझी होणार नाही हे बव्हंशी माहीत असूनसुद्धा केवळ त्यांची ओढ, त्यांच्यासाठीची तळमळ निर्माण करणाऱ्या नात्यांचं. एकमेकांना कधी पाहिलंसुद्धा नसताना, एकमेकांशी प्रत्यक्ष बोललेलं नसताना हक्कानं ताई, काका-काकू असं काहीतरी संबोधणं, मग भरपूर गप्पा मारून, संधी मिळालीच तर फोन करून किंवा पत्रव्यवहारातून वगैरे संपर्क साधणं यातून निर्माण होणाऱ्या नात्यांचं. ही नाती मग 'कायमची' व्हायला अजिबात वेळ लागत नाही.


अशीच काही नाती माझं मनोगत घडवत आली आहेत. माझं मनोगत आणि आपल्या सगळ्यांचं हे लाडकं मनोगतसुद्धा. मानवता, भूतदया, बंधुभाव अशा महान नात्यांबाबत मतप्रदर्शन करण्याइतकी उंची कदाचित गाठली नसेलही अजून; आणि कदाचित गाठणारही नाही. किंवा फार तर त्याची गरज किंवा इच्छा नाही असं म्हणूया. पण जाणते-अजाणतेपणी जी नाती जोडली गेली आहेत आपल्यांत, त्यांचा सुगंध तरी दरवळू दे. त्यांचे रंग तरी जगण्यात उतरू देत. त्यांच्यातला मध तरी चाखायला मिळूदे.


आवाज न करता पाकळ्या गळून जाण्यापेक्षा, कुणीतरी विकृतपणे पिसडून टाकण्यापेक्षा, हळुवारपणे खुडून घेऊन गजऱ्यात किंवा कंठीत माळल्यानंतर आणि अर्थातच रंगांनी, सुगंधांनी श्वास भरून घेतल्यावर मग निर्माल्याच्या टोपलीत जाऊन पडणं मला कधीही आवडेल.


आणि तुम्हाला?"