मंगळसूत्र

मुलीचं लग्न होतं. अधिकृतपणे देव, ब्राह्मण, अग्नी यांच्या साक्षीने नवरामुलगा नवऱ्यामुलीच्या गळ्यात "मंगळसूत्र" घालतो. आईवडील कन्यादान करतात. सप्तपदी, लाजाहोम, लक्ष्मीपूजनासारखे विधी होतात; आणि कुमारिकेची "सौभाग्यवती" होते.


मुलीचं लग्न करताना आईवडील तिची सर्व हौस पुरवतात. तिला सोन्याने मढवतात. मुलगीही नवऱ्यामुलापेक्षा जास्त रस स्वतःच्या दागिन्यांमध्ये घेते. अर्थात "मंगळसूत्र"देखील या दागिन्यांमध्येच येतं.(?) मला खरं सांगा "मंगळसूत्र" हा दागिना म्हणता येईल  का हो?


लग्नानंतर स्त्रीच्या गळ्यात दिमाखाने मिरवलं जाणारं मंगळसूत्र हा दागिना नाही. आयुष्यात तिच्या जोडीदाराने, आईवडीलांनी, सासूसासऱ्यांनी आणि समाजाने तिला दिलेला तो "अधिकार" आहे. मी देखील मंगळसूत्राला दागिनाच समजत होते. पण माझ्या लग्नात गुरूजींनी माझा हा समज खोटा ठरवला आणि मला मंगळसूत्र हा अधिकार आहे असे सांगितले. "मंगळासूत्र" या शब्दाचा खरा अर्थ मला तेव्हा कळाला.


मंगळसूत्र हा स्रीचा खरच एक अधिकार आहे.... एक पत्नी होण्यासाठी, सून होण्यासाठी, भविष्यात पुढे माता होण्यासाठी!! म्हणूनच आपल्याकडे मंगळसूत्र गळ्यातून कधीच न काढण्याची प्रथा आहे.


मला असा नवा विचार मांडायचा आहे की, स्रीच्या गळ्यातील हे मंगळसूत्र तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतरही तिच्या गळ्यातच राहीले पाहीजे. कारण स्रीचा नवरा जाणे म्हणजे तिचे झालेले लग्न तर अमान्य होत नाही. केवळ ते मंगळसूत्र बांधणारा अस्तित्वात रहात नाही. मंगळसूत्र ही तर नवऱ्याची खरी आठवण आहे. स्रीचा हा अधिकार काढून घेणे केवळ तिच्या मृत्यूनंतरच शक्य आहे. कारण स्रीचा जोडीदार केवळ देहाने अस्तित्वात नसतो; झालेले लग्न विधी तर त्याच्या सोबत संपत नाहीत ना? लग्न शाश्वत आहे; चिरंतन आहे. आणि मंगळसूत्र ही त्या लग्नाची आठवण आहे.


म्हणूनच विधवा स्रीच्या गळ्यातही हे "मंगळसूत्र" दिमाखाने मिरवले गेले पाहिजे असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे????