सुचत नाही

मी रिता कधीचा पेला घेउन बसलो
तू नजर फिरवली, सागर हरवुन बसलो

देवळात गेलो भांडाया ज्याच्याशी
मी टिळा कपाळी त्याचा लावुन बसलो

सोबतीस माझ्या नव्हते जेव्हा कोणी
मी नकार सारे सोबत घेउन बसलो

कोणतेच ओझे पेलू शकलो नाही
रेशमी करांना बेड्या ठरवुन बसलो

राहिले पटावर प्यादी, घोडे, हत्ती
जिंकला डाव पण राणी गमवुन बसलो

विसरलो कसा, वय नाही शृंगाराचे
पेटलो असा की खांडव होउन बसलो

मोडक्या घराचे ओझे झाले थोडे
वर जगास साऱ्या घरकुल समजुन बसलो

आकड्यात मोजे दुनिया कर्तृत्वाला
मी भणंग केवळ कवने जमवुन बसलो





अलामतीचे 'उ'कार शुद्धलेखनानुसार दीर्घ असायला हवे असले तरी छंदाच्या गरजेमुळे  ऱ्हस्व  केले आहेत.