दहावी फ - रसग्रहण

कालच दहावी फ हा चित्रपट पाहिला. खूप छान आहे -- सर्वच पातळ्यांवर. खूप दिवसांनी मराठीतील दर्जेदार काही पाहिल्याचे समाधान झाले.
त्यातील काही आवडलेला भाग आपल्यासमोर मांडत आहे... त्यातून चित्रपटाची कल्पना यावी, आपल्याला आनंद व्हावा ही सदिच्छा.


वरवर पाहिले तर दोन जुन्या मित्रांमधील हा तरल वाद - एक हार्वर्डला शिक्षणासाठी जाण्यास सर्वसिध्द झालेला; तर दुसरा सारे आयुष्य प्राथमिक शाळेत झोकून टाकण्यास पुढे सरसावलेला. पण खरे तर स्वतःशीच स्वतः साधलेला हा एक काव्यात्मक संवाद.
-----------------------------------------------------


पहिला उरला नाहीस तू | असा कसा बदललास तू ||
वेगळाच माणूस झालायस तू | दूर कोठे गेलायस तू ||
पहिला उरला नाहीस तू ||


कोण जाणे मी होतो काय? कोण जाणे मी आहे काय?
हेच शोधत शोधत जाणं म्हणजेच जगणं नव्हे काय?


सारे जग झालयं उंदरामांजरांचा खेळ |
मनाचं गाणं ऐकायला आहे कोणाला वेळ ||


भडक माथ्याचा एक तरुण | आत्ताच कोठे जागा होऊन || 
म्हणतोय आपण माणूस शोधू | तुटल्या मनांच्या भिंती साधू ||


अरे तू - तू तरी म्हणू नकोस दोस्त 
         असा कसा बदललास तू?


का नाही जायचं मी दूर देशात?
स्थान मिळवायचं नव्या समाजात?
    कर्तृत्व दाखवायचं माझ्या विषयांत |
का ..का कुढत राहायचं निराश मनांत ||


समजून कसं घेत नाहीस तू | असा कसा बदललास तू ||
पहिला उरला नाहीस तू ||


माझं .... ..भांडण नाहीए तुझ्याशी |
माझा संवाद आहे केवळ माझ्याशी ||
ओलांडायचेत मलाही समुद्र सात |
भटकंती करायचीय याच आयुष्यात ||


नवे नवे प्रयोग पाहीन जगाच्या पाठीवर |
माझी मात्र कविता गिरवीन 
             माझ्याच माझ्याच मातीवर ||


मी आणि माझी ही पोरं
      मी आणि माझी ही पोरं |
सोडवूया म्हणतोय कोडं सारं ||


पण पण दोस्तीत नसतात पडत प्रश्न असले |
काही क्षण करेक्ट जमले
                   काही थोडक्यात फसले ||


तुझ्या मनाची ही उभारी |
माझीच माझीच तर आहे सारी ||
एका वाटेने जाऊ काय अन् नाही काय |
इस बात पर एक .... 
                और एक चाय तो हो जाय ||


स्रोत -
विचित्र निर्मिती प्रस्तुत - दहावी फ
कथा/पटकथा/संवाद - सुमित्रा भावे
गीते - सुनील सुकथनकर