माझी जात, माझा धर्म, माझी भाषा, माझा देश

खालील दोन उदाहरणे पाहाः


१. मी आज खानावळीत गेले. तेथे अनायासे वांगीभाताचा बेत होता. माझ्या पानात वाढलेल्या वांगीभाताचा मला अभिमान वाटतो.


२. स्थानकावर गाडी येताच मी गर्दीबरोबर गाडीच्या तिसऱ्या डब्यात लोटली गेले. आता त्या गाडीच्या त्या तिसऱ्या डब्याबद्दल मला अभिमान वाटतो.


मंडळी, वरील उदाहरणांत वांगीभाताबद्दल किंवा गाडीच्या डब्याबद्दल (वृथा) अभिमान बाळगणारी व्यक्ती आणि जन्मजात लाभलेल्या जातीबद्दल/पोटजातीबद्दल अभिमान बाळगणारी व्यक्ती या माझ्या दृष्टीने सारख्याच आहेत.


व्यक्तिशः मला माझ्या जातीचा "अभिमान" नाही.


तीच रेघ पुढे ओढून सांगायचं झालं, तर मला जन्मजात मिळालेल्या धर्माचाही मला "अभिमान" वाटत नाही. हे मात्र खरं, की आता धर्माधर्मांतील फरकाची जी काही माहिती मला झाली आहे, त्यामुळे हा धर्म मला निश्चितच अधिक उजवा वाटू लागला आहे आणि त्यामुळे आवडू लागला आहे. असा धर्म मला विनासायास मिळणे हे भाग्यही वाटतं आहे.


पण तरीही मी हा धर्म जाणीवपूर्वक "निवडला" नसल्याने, त्याचा "अभिमान" बाळगण्याइतपत श्रेय माझ्याकडे आहे, असं मला वाटत नाही. (इथं काही म्हणतील, की जाणीवपूर्वक तशी निवड करण्याचा हक्क असतानाही तुम्ही हा धर्म सोडला नाही, मग याबद्द्ल तरी श्रेय घेऊन अभिमान बाळगायला काय हरकत आहे? पण तेही नाही. कारण मला माहीत आहे की अभ्यासाअंती दुसरा एखादा धर्म/पंथ मला आवडला जरी असता, तरी धर्मांतर करायचे कष्ट मी घेतले नसते. मग हा "अभिमान" कशासाठी?).


जात निवडायचा प्रश्नच येत नाही, अर्थातच.


आता अजून एक गम्मत. अनायासे लाभलेल्या जातीबद्द्ल किंवा धर्माबद्दल मला अभिमान नसला, तरी त्याचप्रकारे लाभलेल्या माझ्या मातृभूमीबद्द्ल आणि मातृभाषेबद्दल मात्र मला "अभिमान" वाटतो.  विचार करूनही असा फरक का, ते मला उमजत नाही. अनेक वर्षे "पर"देशात राहिल्याचा हा परिणाम आहे का? तसंच असेल तर कर्मठ "पर"धर्मीय बहुसंख्येने असणाऱ्या एखाद्या प्रदेशात राहिल्याने माझ्या धर्मविषयक "अभिमाना"ला फुंकर मिळाली असती का?


मंडळी, याबद्दल तुमची मतं काय आहेत? जात, (मातृ)धर्म, मातृभाषा, आणि मातृभूमी, यापैकी कशाकशाबद्दल तुम्हाला "अभिमान" वाटतो? तुमच्या प्रतिसादात कृपया तसा स्पष्ट उल्लेख करा (तुमची जात किंवा धर्म काय आहे हे जाणण्यात मला रस नाही).


शरद कोर्डे यांनी मांडलेला मुद्दाही वाचा.


- कोंबडी


---


विशेष सूचनाः आरक्षणसंबंधी वाद किंवा एकगठ्ठा मतांवर आधारित सद्य भारतीय राजकारण, अशांसारख्या "व्यवहारात" आपापली व्यक्तिगत किंवा सामूहिक घोडी पुढे दामटण्यासाठी (किंवा किमान अन्याय टाळण्यासाठी) जातीचा किंवा धर्माचा अभिमान "प्रकट करणे" हे आवश्यक बनून गेले आहे, याची मला कल्पना आहे. परंतु माझा प्रश्न राजकीय संदर्भात विचारलेला नाही. त्याच कारणास्तव विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा उल्लेख मी टाळला आहे.


हा प्रश्न असा वेगळा करताच येणार नाही, असं तुमचं मत असल्यास माझा नाईलाज आहे.