अंदाज-ए-बयाँ और...महकवी गालिब २

गालिबची शायरी समजायला अवघड आणि गूढ असली तरी त्यामुळे तिचे साहित्यिक मूल्य अजिबात कमी होत नाही. अब्दुल रहमान बिजनौरी म्हणतात की भारतात अपौरुषेय ( दैवी ) ग्रंथ दोनच - वेद आणि गालिबच्या गजलांचा संग्रह ( दीवान ). यातला अतिशयोक्तिचा भाग सोडून दिला तरी यावरून गालिबचे उर्दू साहित्यातले महत्व ध्यानात येते. वस्तुतः गालिबची शायरी प्रामुख्याने फारसीमध्येच आहे. त्याने फारसीत उर्दूच्या चौपट गजला लिहिल्या. त्याच्या उर्दूतल्या गजलांची संख्या आहे केवळ २७६. गालिबच्या उर्दू रचना मोजक्या असल्या तरी उर्दू भाषेत आजवर सर्वाधिक लिखाण गालिबच्या साहित्यावर झाले आहे. यावरून ना. ह. आपटेंच्या कादंबऱ्यांची आठवण होते. आपटेंना कुणीतरी तुम्ही एम.ए. आहात का असे विचारले तेंव्हा ते हसून म्हणाले की मी एम.ए. नाही पण माझ्या कादंबऱ्या एम.ए. ला आहेत!


आपले भाव व्यक्त करण्याची ताकद उर्दूमध्ये नाही असे गालिबचे मत होते. तथापि त्याने उर्दूला फारसीपेक्षा कनिष्ठ समजले असे वाटत नाही. हिंदुस्थानात जन्म आणि वाढ झालेल्या उर्दूविषयी त्याला आदरच होता. त्या काळात उर्दू ही मुस्लिमांची भाषा समजली जात नसे. कितीतरी प्रसिद्ध हिंदू लेखकांनी / कवींनी उर्दूत विपुल लिखाण केले आहे. इतकेच काय पण भारतात उपऱ्या आलेल्या इंग्रज राज्यकर्त्यांपैकी काहींनी उर्दू उत्तम आत्मसात करून उर्दूत 'तखल्लुस' (उपनाम) धारण करून उत्तम काव्यरचना केली आहे. जोसेफ बेन्सले 'फना', जॉर्ज प्युश 'शोर', अलेक्झांडर इदरली 'आजाद' ही अशीच काही उदाहरणे. फाळणीनंतर उर्दू पाकिस्तानची राष्ट्रभाषा झाली आणि भारतात उर्दूची पीछेहाट सुरु झाली. राजकारणाच्या गलिच्छ खेळात एक देश एका सुंदर भाषेला मुकला. असो.


आपल्या काळाच्या पुढे असलेल्या गालिबने कधीही साहित्यिक संतत्वाचा दावा केला नाही. गालिबमध्ये सर्वसामान्य माणसांइतकेच, कदाचित सर्वसामान्यांपेक्षा जास्तच दुर्गुण होते. पण ते लपविण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही. पु. लं. च्या रावसाहेबांप्रमाणे गालिब स्वतःच्या ऐशआरामी, व्यसनी वृतीवर हसत राहिला. माणसाला खुजे करणारी आत्मप्रौढीची वृती, परिस्थितीने गांजल्यावर ब्रिटीश राज्यकर्त्यांचे लांगूलचालन करण्याचा क्षुद्रपणा हे सगळे गालिबने उघडपणाने केले. त्याचा आत्मसन्मान तर गर्व नव्हे तर ताठा वाटावा इतका प्रखर होता. इतरांना कस्पटासम लेखण्याचा प्रमादही त्याला बराच तापदायी ठरला. पण गालिबचे सगळे दुर्गुण.. त्याचा अस्थायी दिलेरपणा, अव्यवहारी वृत्ती, आमदनी मर्यादित असताना कर्ज घेऊन ऐयाशी करण्याचा त्याचा स्वभाव, स्वतःच्या धर्मातीत वृत्तीमुळे कर्मकांडांविरुद्ध त्याची प्रखर मते... हे सगळे सगळे त्याच्या अस्मानी प्रतिभेसमोर झाकले जाते.


गालिबने आयुष्यात स्वतःपेक्षा कधी कुणाला श्रेष्ठ मानले नाही. नाही म्हणायला महान शायर मीर तकी 'मीर' यांविषयी गालिबने एक प्रशंसायुक्त शेर लिहीला आहे खरा, पण त्यातही त्याने स्वतःचा डंका पिटला आहेच!


रेख्ते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब


कहते है अगले जमाने में कोई 'मीर' भी था


 गालिब, उर्दू शायरीचा तू एकटाच श्रेष्ठ शायर नाहीस, तुझ्या आधी कुणी मीर नावाचा होऊन गेला म्हणे! ( केवढा अहंकार! )


गालिब चा अर्थच 'वरचढ' असा आहे. गालिबची मानसिकताच त्याच्या तखल्लुसच्या निवडीतून दिसून येते.


गालिब आयुष्यभर आर्थिक चणचणीत राहिला. अत्यंत अव्यवहारी वृत्तीमुळे त्याच्या हातात पैसा कधी टिकलाच नाही. त्यावरही वक्रोक्तीने तो म्हणतो


दीरमो दाम अपने पास कहाँ


चील के घोसले मे मास कहाँ


घारीला मास मिळले तर ती ती कधी साठवून ठेवेल का? पैशाच्या बाबतीत मी तसाच आहे!


गालिबचा समकालीन शायर शेख इब्राहिम जौक हा गालिबपेक्षा कमी प्रतिभावान असूनही राजकवी झाला. गालिबला हा माणून कधीच आवडला नव्हता.त्यामुळे जौकला टोचून बोलण्याची एकही संधी गालिब दवडत नसे. एकदा जौक रस्त्यावरून जात असता गालिबने त्याला ऐकू जाईल अशा आवाजात शेराची एक ओळ पेश केलीः


हुआ है शाह का मुसाहिब, फिरे है इतराता


या बादशहाच्या आश्रीताचा डौल तर बघा...


यावर जौकने बादशहाचे कान भरले. बादशहा जफरने गालिबला बोलवणे पाठवून या ओळीचा खुलासा मागितला. गालिबची प्रतिभा पहा, राजदरबारात पोचेपर्यंत गालिबने शेर पूर्ण केलाः


हुआ है शाह का मुसाहिब, फिरे है इतराता


वरनः शहर में 'गालिब' की आबरू क्या है


गालिब, बादशहाची कृपा म्हणून तू घमेंडीत हिंडत असतोस, नाहीतर तुझी शहरात काय किंमत आहे!


कर्ज काढून ऐयाशी करण्याच्या वृतीमुळे गालिबवर खटलेही भरले गेले. पण अशाही परिस्थितीत त्याची स्वतःवर हसण्याची तयारी होती. न्यायालयात त्याने पेश केलेला हा शेर पहाः


कर्ज की पीते थे मै, लेकिन समझते थे कि हाँ


रंग लायेगी हमारी फाकःमस्ती एक दिन


कर्ज काढकाढून पीत होतो, तेंव्हाच माहिती होतं, की एक दिवस ही उपासमारीची वेळ येणार आहे.


गालिबचा कर्जबाजारीपणा दिल्लीत त्याच्याइतकाच मशहूर झाला होता. खुद्द बादशहा जफरचं लांगूलचालन करतानाही गालिब आपल्याला दरमहा पैसे मिळवेत हे कसं खुबीनं सांगतो पहाः


बस की लेता हूं हर महिने कर्ज


और रहती है सूद की तकरार


मेरी तनख्वाह में तिहाई का


हो गया शरीक साहूकार


आपका बंदा और फिरू नंगा


आपका नौकर और खांऊ उधार


मेरी तनख्वाह की जे माह-ब-माह


ता ना हो मुझे जिंदगी दुशवार


 


असा हा असामान्य प्रतिभावंत गालिब!