अपरिचित तलत

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगात पुरुष पार्श्वगायकांमध्ये महंमद रफी, किशोरकुमार आणि मुकेश हे नेहमीच सम्राटपदी राहिले. त्यांच्या तुलनेत हेमंतकुमार, मन्नाडे, तलत महमूद, महेंद्र कपूर यांना नेहमीच दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. याचा अर्थ त्यांची प्रतिभा कमी होती असा नाही. पण यश हे नेहमी फक्त प्रतिभा आणि गुणवत्ता यावरच अवलंबून असत नाही. चित्रपटसृष्टीसारख्या बेभरवशाच्या व्यवसायात तर नाहीच नाही. हेमंतदांचा धीरगंभीर 'बेस' हीच त्यांची मर्यादा ठरली. चॉकलेटी चेहऱ्याच्या देव आनंदसाठी आपण हेमंतदांचा खर्ज चालवून घेतला खरा, पण तो केवळ त्या दोघांवरच्या आणि एकंदरीतच संगीतावरच्या आपल्या प्रेमाखातर. मन्नाडे तर फारच कमनशिबी. शास्त्रीय संगीताचा जबरा अभ्यास, सुस्पष्ट, दाणेदार आवाज, रागदारीची उत्तम जाण.. यशस्वी गायक होण्यासाठी लागणारे सगळे गुण असूनही या गायकाला शेवटी मेहमूदसारख्या विनोदी नटासाठी आवाज द्यावा लागला.


तलत महमूदसारख्या लखनवी अदबीत वाढलेल्या शापित गंधर्वाच्या पदरी तर दुसरे काही पडणे शक्यच नव्हते. एकतर यश ओरबाडून घेण्यासाठी जो कावेबाजपणा लागतो, प्रसंगी दुसऱ्याच्या डोक्यावर पाय ठेवून वर चढण्याचा जो संधीसाधूपणा लागतो, तो या मवाळ आणि मृदू स्वभावाच्या गायकाच्या वृत्तीतच नव्हता. कुठल्या कंपूत सामिल होणं त्याला कधी जमलं नाही, लोकांनी पसरवलेल्या अफवांवर, टीकेवर त्वेषानं वार करणं त्याला कधी योग्य वाटलं नाही. त्याला स्वतःला बंगाली पार्श्वभूमी असूनही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या बंगाली गटानंही त्याच्या प्रतिभेला कधी झुकतं माप दिलं नाही. अगदीच रहावलं नाही तेंव्हा तो त्याच्या नेहमीच्या मृदू स्वरात म्हणाला - सलीलदांना 'कहीं दूर जब दिन ढल जाये' च्या वेळी माझी आठवण कशी झाली नाही, कुणास ठाऊक! बस्स, एवढंच!


तलतचा आवाज निर्दोष नव्हता. त्याच्या आवाजालाही असंख्य मर्यादा होत्या. पण या सर्वांसकट तलतचा आवाज खानदानी होता. त्याच्या आवाजात एक सुसंस्कृतपणा होता.आवाजातला दैवदत्त गोडवा, शास्त्रीय संगीताचे त्यावर झालेले संस्कार आणि संगीताचे इमान पाळण्याचा त्याचा (हळूहळू कालबाह्य होत गेलेला) विश्वास यामुळं तलतचा रसिकांनी त्याच्या सर्व दोषांसकट स्वीकार केला. रफी, मुकेश, किशोरच्या तुलनेत तलतची फिल्मी गाणी फारच कमी आहेत - जेमेतेम चारएकशे. पण एकोणीसशे सत्तरच्या आसपास पार्श्वगायन सोडून दिल्यानंतरही आजही तलतचे जगभर चहाते आहेत. त्याच्या ध्वनीमुद्रिकांचा खप अजूनही कमी झालेला नाही. मला वाटते, तलतच्या गायकीचे सर्वात मोठे यश हेच आहे.


लखनौमध्ये शास्त्रीय संगीताचे बाकायदा शिक्षण घेतलेल्या तलतने पार्श्वगायनाला सुरुवात केली ती कलकत्त्यात. १९४९ साली तो मुंबईला आला. अनिल विश्वास यांनी त्याला ' आरजू' मधील 'ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल..' या गाण्यासाठी पहिली संधी दिली. तलत आयुष्यभर अनिलदांचे हे ऋण मानत राहिला. ( त्याच्याच शब्दात सांगायचं तर ' मेरी तो सारी दुनिया घूम फिर कर अनिलदां के पास आती है' अनिल विश्वास हाही तितकाच विनयशील माणूस - बाबूजींच्या संगीतरचनांना ' मच ऑफ व्हॉट ही कंपोजेस इज प्युअर गोल्ड' म्हणणारा - तलतच्या या कृतज्ञतेवर अनिलदा म्हणतात ' यह तो तलतका बडप्पन है - मैं तो एक बहाना हूं जिसके जरीये भगवान किसीसे कुछ करवा लेते हैं!)


त्यानंतर तलत हिंदीत बऱ्याच संगीतकारांकडं गायला. इतरही भाषात गायला. पण बाबूजींच्या गाण्यासारखंच - मच ऑफ व्हॉट ही सँग इज प्युअर गोल्ड. तलतच्या गाण्याबाबतीतली एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट अशी की तलतची वाईट गाणी फारच कमी आहेत. मला स्वतःला तर तलतची 'मैं पीके नही आया( कवी )' आणि 'सुनो भाई हमने ( रूप की रानी, चोरों का राजा)' एवढी दोनच गाणी वाईट म्हणावी इतकी टाकाऊ वाटतात. तलतच्या फिल्मी आणि गैरफिल्मी गाण्यांची संख्या लक्षात घेता अगदीच नगण्य. बाकी तलतची गाणी कमालीची सुमधूर आणि त्यामुळंच लोकप्रियही.


पण या लेखात मी चर्चा करणार आहे ती तलतच्या फारशा लोकप्रिय नसलेल्या पण तरीही अत्यंत श्रवणीय अशा काही गाण्यांची. प्रथम तलतची काही द्वंद्वगीतं. तलत - लता जोडीचं ' सीनेमें सुलगते हैं अरमाँ...' ( तराना- अनिल विश्वास )हे बहुदा या जोडीचं सर्वात लोकप्रिय गीत असेल. पण याच सिनेमात याच जोडीचं ' 'नैन मिले नैन हुए बावरे...' हेही गाणं अतिशय गोड आहे. तलत -लता जोडीचं 'ये नयी नयी प्रीत है...' ( पाकिटमार - मदनमोहन ) हे उडत्या लयीचं असंच एक श्रवणीय आणि मुद्दाम ऐकण्यासारखं गाणं .


संगीतकार नौशाद यांनी तलतला फार कमी वेळा संधी दिली. त्यामागे त्यांचे अत्याधिक रफीप्रेम असेल किंवा 'बाबुल' च्या ध्वनीमुद्रणाच्यावेळी तलतला सिगरेट ओढताना पाहून त्यांच्या मनात बसलेली अढी असेल. पण त्यांनी 'बाबुल' साठीच स्वररचना केलेले तलत-शमशाद बेगमचे 'मिलते ही आँखे...' कोण विसरेल? एका बाजूला तलतचा मुलायम आवाज तर दुसरीकडे शमशादचा खडा पहाडी स्वर.. पण यातून जन्मली ती एक अजरामर स्वररचना. तलत - सुरैयाची ' मन धीरे धीरे गाये रे...' (मालिक - गुलाम महंमद ) आणि 'दिल-ए-नादाँ तुझे हुवा क्या है...' ( मिर्जा गालिब - गुलाम महंमद)  हीपण नितांतश्रवणीय गाणी.


तलतची एकट्यानं गायलेली, फारशी प्रसिद्ध नसलेली पण जीव वेडावून टाकणारी बरीच गाणी आहेत. 'सुनांऊ किसको अफसाना.' ( शिरी-फरहाद - एस. मोहिंदर ), 'जीवन है मधुबन..' ( जासूस - अनिल विश्वास ), 'बेरहम आसमाँ ..' ( बहाना - मदनमोहन - उत्तम काव्यरचना - काही ओळी पहा - " अब कोई भी तमन्ना नही, अब यहाँ हमको जीना नहीं, जिंदगी तेरे जाम से,  एक कतरा भी पीना नहीं ), 'सपनों की सुहानी दुनिया को ( शिकस्त - शंकर जयकिशन ), 'उन्हे तू भूल जा ऐ दिल..' ( नया घर -  शंकर जयकिशन  ), 'भरम तेरी वफाओं का' (अरमान - एस. डी. बर्मन - साहिरची उत्तम कव्यरचना उदाः 'तेरी उम्मीद पर जीने से हासिल कुछ नही लेकिन, अगर यूं भी न दिल को आसरा देते तो क्या होता') ,'गर तेरी नवाजिश हो जाये' ( गुलबहार - धनीराम व खैयाम), 'तेरे दर पे आय हूं फरियाद लेकर' ( चोर बाजार - सरदार मलिक - त्याच त्या उचल्या अनु मलिकचे वडील), कोणत्याही तालवाद्याची साथ न घेता एस. डी. बर्मनने रचलेले 'देवदास' मधील कमालीचे आर्त 'मितवा..', साहिरच्या अप्रतिम ओळी असणारे' मुहब्बत तर्क की मैंने, गरेबा सी लिया मैंने, जमाने अब तो खुश हो, जहर ये भी पी लिया मैंने' ( दो राहा - अनिल विश्वास) .... अशी ही न संपणारी यादी!


संध्याकाळ असावी. दिवसाभराच्या कामानं थकून घरी यावं. सुस्नात होऊन शांत बैठक घालावी. तलतच्या निळसर सुगंधी स्वरांचं धुकं आसपास दरवळू लागावं, सोबतीला ( आपल्या व तलतच्या मध्ये न येणारा / री ) 'तो' किंवा 'ती' असावी, जमल्यास समोर एखादा फेसाळता सोनेरी चषक असावा. दिवसाभरातल्या चिंता, कटकटी तलतच्या गोडगहिऱ्या आवाजात वितळून जाव्यात!


सन्जोप राव