मटण मालवणी - २

  • बकऱ्याचे मटण १ किलो.
  • काळी मिरी १ चहाचा चमचा
  • दालचिनी ३"
  • अख्खे धणे १ जेवणाचा चमचा (टेबल स्पून)
  • लवंगा १/४ चहाचा चमचा.
  • बडीशोप १ चहाचा चमचा.
  • जायफळ अर्धे.
  • खसखस १ जेवणाचा चमचा (टेबल स्पून)
  • आलं २"
  • कोथिंबीर १ वाटी
  • लाल तिखट १ चहाचा चमचा
  • धण्याची पावडर १ चहाचा चमचा
  • गरम मसाला पावडर १/२ चहाचा चमचा.
  • हळद १/२ चहाचा चमचा.
  • कांदे ४ मध्यम आकाराचे.
  • नारळ १ अख्खा खवून.
  • तेल
  • मीठ चवीनुसार.
दीड तास
५-६ जणांसाठी

मटण धुऊन निथळत ठेवावे.

काळी मिरी, दालचिनी, धणे, लवंगा, बडिशोप, जायफळ तव्यावर, मध्यम आंचेवर, कोरडेच भाजून घ्यावे.
वरील मसाला भाजल्यानंतर, गॅस बंद करून, लगेचच खसखस भाजून घ्यावी.
सर्व मसाला थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक दळून घ्यावा.

आलं, कोथिंबीर, लाल तिखट, धण्याची पावडर, गरम मसाला, हळद थोड्या पाण्यात गंधासारखे मुलायम वाटून घ्यावे.

३ कांदे उभे आणि १ कांदा बारीक चौकोनी चिरून घ्यावा.

एका पातेल्यात अर्धी वाटी तेल तापवून त्यात बारीक चौकोनी चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा जरा तांबूस झाला की वरील मसाला (आलं, कोथिंबीर, लाल तिखट, धण्याची पावडर, गरम मसाला, हळद) मटणाला चोळून मटण त्यावर टाकावे. मटण जरा परतून त्यात २ वाट्या पाणी घालून, मध्यम आंचेवर, ४५ मिनिटे शिजवावे.

बाजूला कढईत २-३ जेवणाचे चमचे (टेबल स्पून) तेल तापवून त्यावर उभा कांदा परतावा. मध्यम आंचेवर चांगला चॉकलेटी रंगावर परतून बाजूला काढून ठेवावा. त्याच कढईत पुन्हा २-३ जेवणाचे चमचे (टेबल स्पून) तेल तापवून ओला नारळ चांगला चॉकलेटी रंगावर परतून घ्यावा.

परतलेला कांदा + परतलेला नारळ + दळलेला गरम मसाला मिक्सर मध्ये घालून त्याची एकदम मुलायम पेस्ट करून घ्यावी.

मटण शिजल्यावर त्यात वरील मुलायम पेस्ट, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मटण खळखळून उकळावे.

जेवताना वरून पुन्हा कोथिंबीर भुरभुरून घ्यावी.

शुभेच्छा....!

हे मटण दाटसर किंवा थोडे पातळ कसेही केले तरी मस्त लागते.
दाटसर मटणाबरोबर तांदुळाची भाकरी, पोळी, भात, अप्पम चांगले लागते.
पातळ मटण पावाबरोबर छान लागते.
कुठल्याही प्रकारात मटण तिखट असावे आणि बरोबर कच्चा कांदा is must.
कुठल्याही सामिष भोजनात एखादी कोशिंबीर लज्जत वाढविते.

 

माझा स्वयंपाकी.