कविता

आंघोळीला नाही नाही म्हणणार्‍या लहान मुलाप्रमाणे शब्द
कागदावर उतरायला नको नको म्हणतात तेव्हा
मी आईप्रमाणे मिनतवार्‍या करू लागतो.
आई जशी मुलाला खाऊ चॉकलेट किंवा अजून कसलं
आमिष दाखवते,
तसं मी शब्दांना प्रसिद्धीचं आमिष दाखवतो
किंवा
आई जशी मुलाला 'घाणेरडा-घाणेरडा' म्हणून चिडवते
तसं मी स्वत:ला स्वत्:च्या सिद्धहस्ततेविषयी डिवचत राहतो
किंवा कधी (अंतिम उपाय म्हणून)
आई डोळ्यांत पाणी आणून थंडपणे मुलाकडे पाहत राहते
तेव्हा मूल निमूटपणे न्हाणीघरात जातंच जातं
तसंच मीही डोळे मिटून घेतो क्षणभर...
मूल रडू आरडू लागलं तरी आई आंघोळ घालतेच
आणि नंतर त्या रुसलेल्या पण सजलेल्या रुपड्याला
विजयी समाधानाने काजळतीट करण्यात मग्न होते
तसा मी कवितेखाली माझी सही कोरण्यात दंग होतो!

परंतु कधी -
आंघोळीला नाही नाही म्हणणार्‍या लहान मुलाप्रमाणे शब्द
कागदावर उतरायला नको नको म्हणतात तेव्हा
वडिलांच्या शांत-कोरड्या-आळशी-समजूतदार आवाजात
मी इतकंच म्हणतो,
"राहू दे करील तो नंतर!!!"