हिंदुस्तानी संगीत १ - गोलाकार स्वरसोपान

   रें  गं     मं  धं  नीं      रे           नी     र्रे  र्ग     र्म  र्ध  र्नी     रे     
सां  रें  गं मं  पं  धं  नीं सा  रे  ग म  प  ध  नी र्सा  र्रे  र्ग र्म  र्प  र्ध  र्नी सा  रे  ग


आमचे संगीत क्षेत्र धर्मातीत आहे. येथे हिंदू-मुस्लिम भेद/दुरावा/द्वेष नाही, असेल तर प्रेमच आहे. त्या प्रेमाला साक्षी ठेवून "श्री गणेशाय सरस्वत्यै चैव नमः" (बुद्धिदाता व कलावाणीदेवता यांना नमन) व "बिस्मिल्ला निर्रहमानुर्रहीम" (म्हणजे - त्या परमकृपाळू ईश्वराच्या नावाने सुरुवात करूया) हे दोन्ही चिंतून विषयाला आरंभ करतो.
या लेखात स्वरांचा एकूण आवाका पहायचा आहे. प्रत्येक आवाजाला काही कंपनसंख्या असते. इथे तांत्रिक तपशीलात शिरायचे नाही पण आपल्याला गाता येतात अशा स्वरांना काही मर्यादा आहे. तरीही बहुतकरून सर्वांच्या गायनक्षमतेचा आवाका पेटीच्या स्वरपट्टीत मावू शकतो.  
बहुतेक वाद्यांच्या स्वरपट्टीत किंवा स्वरपटात ४०-४२ च्या आसपास कळी (कीज़) किंवा सूर असतात. कधी अधिकही असतात पण त्यांची आपल्याला गरज नाही.
आता तुमच्या वाद्याची संगीतकळपट्टी व वर एक रंगीत स्वरपट्टी दिलेली आहे हे दोन्ही निरखून पहा. वाद्यातले सूरच मी अक्षरात मांडले आहेत.
वाद्याला बऱ्याचश्या पांढऱ्या व त्याहून थोड्या कमी काळ्या पट्ट्या असतात.
पांढऱ्या पट्ट्यांचे सूर मी खालच्या ओळीत दिले आहेत व काळ्या पट्ट्यांचे सूर वरच्या ओळीत दिले आहेत. हे वाद्यात दिसते तसेच आहे.
यात एक गोष्ट लक्षात येते - सारेगमपधनी या सात स्वरांचा गट (सध्या फक्त पांढऱ्या पट्ट्या पहा) - याला सप्तक म्हणतात - एकामागून एक असा पुन्हा-पुन्हा येतो आहे. पण तेच तेच स्वर पुन्हा-पुन्हा कशाला?
कारण सर्वात पहिल्या स्वराची कंपनसंख्या (फ़्रिक्वेन्सी/पिच) सर्वात कमी आहे व ती क्रमाक्रमाने वाढत चालली आहे. संगीतात याला आपण स्वर खालून वर जातो असे म्हणतो. प्रत्यक्ष ऐकताना खालचा स्वर घोगरा/जाड/गंभीर/पुरुषी व वरचा स्वर उत्तरोत्तर किरटा/बारीक/स्त्रैण वाटतो.
हे सर्व एखाद्या गोलाकार जिन्यासारखे आहे. पायऱ्या चढत जाताना आपण पुन्हा-पुन्हा एकाच ठिकाणी आल्यासारखे वाटते पण आपण वर गेलेलो असतो. तसाच हाही एक गोलाकार स्वरसोपान (स्वरांचा जिना) आहे. ओळीने स्वर वाजवत गेल्यास जाणवेल की आपण वरवर चढतो आहोत पण स्वर तेच आहेत.
[काही लोक याला स्पायरल जिना म्हणतात, पण गणिती काटेकोर भाषेत बोलायचे तर त्याला हेलिकल जिना म्हणावे लागेल.]
*** हा तुमच्या या अभ्यासवर्गशिबिरातला पहिल्या परीक्षेचा क्षण आहे. इथेच तुम्हाला समजेल की तुम्हाला स्वरांतील फरक व साम्य कळते की नाही.
इथे थोडे थांबा आणि तपासून पहा, वर दिलेली गोष्ट तुम्हाला जाणवते आहे की नाही.


एका रंगाचे सगळे स्वर मिळून एक सप्तक होते, अशी अदमासे ३। सप्तके येथे दिसत आहेत. वेगवेगळ्या सप्तकातले स्वर वेगळे दिसावेत म्हणून मी रंगांचा वापर केला आहे, पण कोणाकोणाकडे रंगीत मुद्रकफीत असेलच असे नाही म्हणून याउप्पर काही चिन्हांचाही प्रयोग केला आहे.
हे चिन्हांकन मी या लेखांपुरते स्वतःच्या/ मनोगतावरील टंकनसोयीला अनुकूल असे बनवलेले आहे. ते संगीताच्या इतर पुस्तकात दिलेल्यापेक्षा वेगळे असणार आहे हे ध्यानात असू द्यावे.
तरीही प्रयत्न केला आहे की शक्यतो ते इतर ठिकाणी दिलेल्याच्या निदान विरुद्ध तरी जाऊ नये. (तसे चुकून झाले असल्यास तज्ज्ञांनी दाखवून द्यावे व योग्य उपाय/बदल सांगावा. माझ्याहाती संदर्भग्रंथ नाही हे आधीच स्पष्ट केले आहे.)
आता या सप्तकांची तांत्रिक नावे व सविस्तर विवरण (फक्त पांढऱ्या पट्ट्या /खालच्या ओळीतले स्वर घेतले आहेत, पण काळ्या पट्ट्यांनाही हेच लागू आहे)-
पहिले सप्तक - मंद्र सप्तकसां  रें  गं मं  पं  धं  नीं  - निळ्या रंगात - अनुस्वारयुक्त अक्षरे
दुसरे सप्तक - मध्य सप्तक -  सा  रे  ग म  प  ध  नी  - साध्या काळ्या रंगात - वेगळे चिन्ह नाही, साधी नेहमीची अक्षरे
तिसरे सप्तक - तार सप्तक -  र्सा  र्रे  र्ग र्म  र्प  र्ध  र्नी - लाल रंगात - रफारयुक्त अक्षरे
चौथे सप्तक - अतितार सप्तकसा  रे  ग  - तपकिरी/मरून रंगात - तिरकस अक्षरे
(या लिखित अनुस्वार व रफार यांचा उच्चार गाताना करायचा नाही)
आपल्यापैकी प्रत्येकाच्या आवाजाचा आवाका (रेंज) वेगवेगळा असतो. बहुतेकांचा आवाज १॥ ते २ सप्तकांत आरामशीरपणे म्हणजे न ताणता चालतो.
महान गायकांचा आवाज बहुधा तिन्ही सप्तकांत संचार करू शकतो, जसे लताबाई. ही दैवी देणगी म्हणावी लागेल.
पण एखाद्या गायकाच्या आवाजाचे रेंज/आवाका कमी असला तरी त्याचे श्रेष्ठत्व, त्याच्या गायनाचा दर्जा कमी होतोच असे मात्र नाही. असे दोष त्याची प्रतिभा अन्य मार्गांनी भरून काढू शकतेच.
(येथे तुमच्या आवाजाचा आवाका तुम्ही तपासून पाहू शकता.)

स्वरांनाही नावे आहेत -
सा - षड्ज
रे - रिषभ
ग - गंधार
म - मध्यम
प - पंचम
ध - धैवत
नी - निषाद
अशी नावे का आहेत याची ग्रंथांत वेगवेगळी स्पष्टीकरणे आलेली आहेत (उदा. रिषभ म्ह. वृषभ म्ह. बैलाचे ओरडणे, इ.) पण त्याला काही शास्त्रीय आधार आहे असे मला वाटत नाही. त्याविषयी डोकेफोड व्यर्थ आहे व तिची गरज नाही.

सा/षड्ज हा सर्व संगीताचा, गायनाचा, मूलाधार मानला जातो. तो सर्वात महत्त्वाचा आहे आणि बाकी सगळे त्यावर आधारलेले आहे.


बाकीचे स्वर तात्पुरते सोडा व फक्त मध्य सप्तकातल्या पांढऱ्या स्वरावर लक्ष केंद्रित करा .
आपल्यापैकी बहुतेकांना "सा रे ग म प ध नी र्सा" हे सुरात म्हणता येते. आता  हेच स्वर (पाढऱ्या पट्ट्या) याच क्रमाने वाजवून पहा. तुम्हाला जे लक्षात आहे किंवा म्हणता येते आणि हे वाजवलेले एकच आहे ना? खात्री पटली की पुढे चला.


-------------------------------------------------------
तळटीप १ - प्रास्ताविकात म्हटले होते की जवळ संगीतकळपट्टीवाले वाद्य असले तर त्याचा शिकताना फायदा होईल. बऱ्याच लोकांनी कुठले मॉडेल हवे, सेटिंग कसे हवे याविषयी विचारणा केली. याचे उत्तर मी त्या लेखाच्या प्रतिसादात सविस्तर दिले आहे. येथे त्याची थोडक्यात पुनरावृत्ती करतो. माझ्या दृष्टीने विशिष्ट मॉडेल/सेटिंग याला येथे फारसे महत्त्व नाही. सेटिंग अखंड सूर वाजणारे व्हायोलिन वगैरे असेल तर बरे. पियानोचा सूर एकदा पटकन वाजून बंद होतो, लक्षात राहत नाही म्हणून नको.
तळटीप २ - मी पेटी वा तत्सम वाद्याची मागणी केली खरी. पण हे सर्वांनाच सोयीचे होत नाही असे दिसते आहे. तेव्हा मी अशा वाद्याशिवायसुद्धा विषय समजेल असे लिहिण्याचा /सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. तरीही वाद्य जवळ असल्यास अधिकस्य अधिकं फलम् हेही खरेच.
तळटीप ३ - स्वरचिन्हाच्या बाबतीत - भातखंडे पठडी वेगळी आहे, पलुस्कर पठडी आणखी वेगळी आहे. गोंधळ अपरिहार्य वाटतो. शिवाय टंकित करण्यात समस्या वाटल्या. अभ्यासू विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन लवचिक धोरण ठेवण्याची आवश्यकता आहे. या सर्व भिन्न नोटेशन्सचा काही त्रास सहन करावा लागणारच आहे त्याला माझा उपाय नाही. या लेखांपुरतेच पहायचे असल्यास अडचण भासू नये, पण इतर गुरूंशी / ग्रंथांशी तुलना करायला गेलात तर खड्ड्यात पडलातच म्हणून समजा. धोक्याचा इशारा देणे माझे कर्तव्य आहे!